ओत प्रोतं यत्र च सर्वं गगनान्तं
योऽस्थूलानण्वादिषु सिद्धोऽक्षरसंज्ञः।
ज्ञातातोऽन्यो नेत्युपलभ्यो न च वेद्य
स्तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।३९।।
विष्णू शब्दाचा अर्थच व्यापक असा आहे. या संपूर्ण चराचर ब्रम्हांडात, त्यातील अणूरेणूत तेच चैतन्य भरलेले आहे. असे सर्वत्र भरून सुद्धा ते दहा अंगुल शिल्लकच आहे. त्या तत्त्वाचा परम व्यापक अवस्थेचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,
ओत प्रोतं यत्र च सर्वं गगनान्तं – जे तत्व या जगामध्ये अगदी आकाशाच्या अंतापर्यंत देखील सर्वत्र ओतप्रोत भरलेले आहे. ज्याच्या शिवाय दुसऱ्या कशाचेही अस्तित्वच वास्तविक नाही.
योऽस्थूलानण्वादिषु – जे स्थूलापासून अणू पर्यंत म्हणजे मोठ्या मोठ्या गोष्टी पासून लहानातील लहान गोष्टी पर्यंत व्यापलेले आहे.
सिद्धोऽक्षरसंज्ञः – ज्याला अक्षर शब्दाने सिद्ध केले जाते. शास्त्रात अक्षर हा शब्द ओंकारा साठी वापरला जातो. अर्थात ज्या तत्वाला निर्गुण निराकार ओंकार रूपातच ओळखता येते.
ज्ञातातोऽन्यो नेत्युपलभ्यो न च वेद्य – ते स्वतः ज्ञाता असल्याने त्याला जाणण्याचा अन्य कोणताही मार्ग उपलब्ध नाही किंवा त्याला वेगळेपणाने जाणता येत नाही.
डोळ्याच्या द्वारे संपूर्ण जग पाहता येते. पण डोळ्यांनी डोळा पहिला असे होऊ शकत नाही. डोळ्याला दुसरा कोणी पाहू शकत नाही. ज्या अर्थी आपल्याला गोष्ट दिसते त्या अर्थी पाहणारा डोळा कार्यरत आहे. याच स्वरूपात डोळा जाणता येतो. अशीच भगवंताची रचना आहे.
तो स्वतःच सर्व जाणणारा असल्यामुळे त्याला जाणण्याचा बाहेरून कोणताही मार्ग नाही.
त्याच्याशी एकरूप होणे हाच एकमेव मार्ग आहे. अशा त्या,
स्तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – संसार रुपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या श्रीहरीचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply