यस्मादन्यन्नास्त्यपि नैवं परमार्थं
दृश्यादन्यो निर्विषयज्ञानमयत्वात्।
ज्ञातृज्ञानज्ञेयविहीनोऽपि सदा ज्ञ
स्तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।४।।
भगवान श्रीविष्णूंच्या परब्रह्मस्वरूपाचे सात्विक निरूपण करताना आचार्य श्री म्हणतात,
यस्मादन्यन्नास्त्यपि – ज्यांच्या शिवाय अन्य काहीही नाही . अर्थात जे काही आहे असे जाणवते त्या सर्व स्वरूपात भगवानच नटलेले आहेत.
नैवं परमार्थं – त्यांच्या शिवाय दुसरा परमार्थ नाही. अर्थ शब्दाचा अर्थ आहे मिळवण्याची गोष्ट. परम अर्थ म्हणजे मिळवण्याची सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट. शेवटी मिळवण्याची गोष्ट आहे भगवंताची एकरूपता. त्यामुळे त्यांना परमार्थ म्हटले आहे.
दृश्यादन्यो निर्विषयज्ञानमयत्वात् – भगवंताचे स्वरूप निर्विषय असल्याने म्हणजे ज्ञानेन्द्रिय यांनी त्याला प्राप्त करणे शक्य नसल्याने भगवंताला दृश्या पेक्षा वेगळे असे म्हटले जाते.
ज्ञातृज्ञानज्ञेयविहीनोऽपि – कोणत्याही गोष्टीचे ज्ञान होण्यासाठी, ते ज्ञान ज्याला होते तो ज्ञाता, ज्याचे होते ते ज्ञेय आणि जे होते ते ज्ञान अशा तीन गोष्टी लागतात. यांना शास्त्रात त्रिपुटी असे म्हणतात. भगवान या तीनच्या पलिकडे आहेत.
सदा ज्ञ – तरी ते सदैव असलेले अस्तित्व आहे. अर्थात पंचज्ञानेंद्रियांनी त्यांचे ज्ञान होत नाही याचा अर्थ ते शून्य नाही.
पंचज्ञानेंद्रियांनी फक्त बाहेरच्या सगुण साकार गोष्टींचाच अनुभव घेता येतो. ती त्यांची मर्यादा आहे. भगवंताचे स्वरूप निर्गुण-निराकार असल्याने त्याला अशा प्रकारे जाणता येत नाही. मात्र करता येत नसले तरी तो नाही असे नाही.
स्तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – संसार रुपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या त्या श्रीहरीचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply