यं विज्ञानज्योतिषमाद्यं सुविभान्तं
हृद्यर्केन्द्वग्न्योकसमीड्यं तटिदाभम्।
भक्त्याराध्येहैव विशन्त्यात्मनि सन्तं
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।४२।।
अंतरंगी ज्या श्रीहरी तत्त्वाची साधकाला अनुभूती येते त्या तत्त्वाच्या अद्वितीय स्वरूपाचे वर्णन प्रस्तुत श्लोकात आचार्य श्रींनी केलेले आहे.
कसे आहे हे तत्व? ते म्हणतात,
यं विज्ञान – हे विज्ञानाचे स्वरूप आहे. अर्थात त्याच्यापाशी ज्ञान गळून पडते. ज्ञानेन्द्रियांनी घेतल्या जाणाऱ्या बाहृय अनुभवांना सोडून अंतरंगी स्थिर झाल्यावरच त्याचा अनुभव येतो.
जगातील बाह्य पदार्थांचा इंद्रियांच्या द्वारे जो अनुभव घेतला जातो त्याला सामान्यतः ज्ञान असे म्हटले आहे. असे ज्ञान जेव्हा गळून पडते तेव्हा त्या अवस्थेला अध्यात्मात विज्ञान असे म्हणतात.
अशा स्वरूपात बाह्य ज्ञान गळून पडल्यानंतर अंतरंगी परमात्म्याची अनुभूती येत असल्याने त्याला विज्ञान असे म्हणतात.
ज्योतिषमाद्यं – ते आद्य चैतन्य तत्त्व आहे. आद्य शब्दातच अंतिम ध्येय असा पण भाव गृहीत आहे
सुविभान्तं – ते अत्यंत तेजस्वी आहे. सगळ्यांना प्रकाशित करणारे आहे. त्याचा चैतन्याने सर्व संचालित होते. त्याच्या प्रकाशातच सर्व बाबींचे ज्ञान होते.
हृद्यर्केन्द्वग्न्योकसमीड्यं – त्याच्या हृदयात सूर्य, चंद्र आणि अग्नी एकवटलेले आहेत.
तटिदाभम् – एखाद्या विद्युल्लते प्रमाणे ते तेजस्वी आणि बलशाली आहे.
भक्त्याराध्येहैव – केवळ भक्तीचा द्वारेच त्याला प्राप्त करता येते.
विशन्त्यात्मनि सन्तं – साधू संत सज्जन आपल्या जीवन यात्रे च्या शेवटी याच तत्वात विलीन होतात.
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – त्या संसाररुपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या भगवान श्रीहरींचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply