मात्रातीतं स्वात्मविकासात्मविबोधं
ज्ञेयातीतं ज्ञानमयं हृद्युपलभ्य।
भावग्राह्यानन्दमनन्यं च विदुर्यं
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।८।।
परब्रह्म परमात्मस्वरूप असणाऱ्या भगवान श्रीविष्णूच्या त्या स्वरूपाचे वर्णन करताना आचार्यश्री पुढे म्हणतात,
मात्रातीतं – ते तत्त्व सर्व मात्रांच्या अतीत आहे. मात्रा शब्दाचा अर्थ मोजण्याची गोष्ट. भगवंत कोणत्याच स्वरूपात मोजता येत नाही . स्थलकाल अशा कोणत्याच सापेक्षता त्या तत्वाला लागू पडत नाहीत.
त्यामुळे परम अमर्याद असणाऱ्या त्या तत्त्वाला शास्त्राने मात्रातीत असे म्हटले आहे.
स्वात्मविकासात्मविबोधं – त्या परमात्म्याचा स्वतःच्या आत्म्याचा ठिकाणीच बोध करून घेता येतो. स्वतःला विकसित करून त्याच्या स्वरूपात विलीन करणे हाच त्याच्या ज्ञानाचा एकमेव मार्ग आहे.
ज्ञेयातीतं – व्यवहारात आपल्यापेक्षा भिन्न स्वरूपात ज्या गोष्टीची जाणीव होते त्याला ज्ञेय असे म्हणतात. भगवान अशा सर्व ज्ञेय पदार्थांच्या पलीकडे आहेत.
ज्ञानमयं – ज्ञान हेच भगवंताचे स्वरूप आहे. त्यामुळेच त्यांना चिन्मय असे म्हणतात.
हृद्युपलभ्य – भक्तीने च्या भगवंताचा हृदयात अनुभूती स्वरूपात लाभ करून घेता येतो.
भावग्राह्य – भक्तिभावाने ज्याला ग्रहण करता येते असे.
आनन्दं – परमानंद हेच ज्यांचे स्वरूप आहे असे.
अनन्यं च – ज्यांच्या समान अन्य कोणीही अस्तित्वातच नाही असे.
विदुर्यं – याच स्वरूपात ज्ञानी लोक ज्यांना जाणतात,
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – त्या संसाररूपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या भगवान श्रीविष्णूंचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply