यद्यद्वेद्यं वस्तुसतत्त्वं विषयाख्यं
तत्तद्ब्रह्मैवेति विदित्वा तदहं च।
ध्यायन्त्येवं यं सनकाद्या मुनयोऽजं
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।९।।
भगवंताच्या सर्वव्यापी स्वरूपाचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,
यद्यद्वेद्यं वस्तुसतत्त्वं विषयाख्यं – या जगतामध्ये विषय स्वरूपात ज्या ज्या गोष्टींना जाणता येते त्या समस्त पदार्थांना,
आपल्याला ज्ञान होण्याचे पाच मार्ग आहेत. त्याच्या साधनांना आपण पंचज्ञानेंद्रिय असे म्हणतो.
डोळ्यांनी आपल्याला एखाद्या पदार्थाचे रूप पाहता येते. कानांनी आपल्याला एखाद्या गोष्टीचा शब्द श्रवण करता येतो.
जीभेने आपल्याला एखाद्या पदार्थाचा रस घेता येतो. नासिकेने गंध तर त्वचेने स्पर्श घेता येतो.
यासाठी या सर्व पदार्थांना विषय असे म्हणतात.ते ज्ञानेंद्रियांची विषय होतात.
अशा स्वरूपात या जगातील ज्या ज्या कशाची आपल्याला जाणीव होते,
तत्तद्ब्रह्मैवेति विदित्वा – त्यात या सर्व गोष्टींना ब्रह्म जाणावे.
अर्थात या सर्व गोष्टीत भगवान श्री विष्णूच नटले आहेत असे समजावे.
तदहं च – तेच माझे स्वरूप आहे असे समजावे.
अर्थात समष्टी पातळीवर ज्याला परब्रह्म म्हटल्या जाते तेच व्यष्टी पातळीवर जीवात्मा स्वरूपात माझे चैतन्य स्वरूप आहे.
मी त्यापेक्षा भिन्न नाही हे समजावे.
ध्यायन्त्येवं यं सनकाद्या मुनयोऽजं – अशा स्वरूपात सनकादिक मुनींनी ज्यांचे ध्यान केले आहे, अर्थात अशा जीव ब्रह्मैक्य स्वरूपाचे चिंतन करावे.
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – त्या संसार रुपी अंध:काराचा विनाश करणार्या भगवान श्रीविष्णूंचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply