नवीन लेखन...

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय तेरावा – क्षेत्रक्षेत्रज्ञविभाग योग

अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः ॥

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
क्षेत्रक्षेज्ञत्रविभागयोग नावाचा तेरावा अध्याय


अर्जुन उवाच ।
प्रकृतिं पुरुषं चैव क्षेत्रं क्षेत्रज्ञमेव च ।
एतद्वेदितुमिच्छामि ज्ञानं ज्ञेयं च केशव ॥ १

अर्जुन म्हणाला‚
“पुरुष‚ प्रकृती‚ ज्ञेय‚ ज्ञान अन् क्षेत्र, क्षेत्रज्ञ
काय सर्व हे मजसि कळो ही मनिषा‚ मधुसूदन” १

श्रीभगवानुवाच ।
इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते ।
एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ॥ २

श्रीभगवान म्हणाले‚
“कौंतेया‚ या शरिरासच रे क्षेत्र असे म्हणती
अन शरिरा जाणी जो त्याची क्षेत्रज्ञ अशी ख्याती २

क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत ।
क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम ॥ ३

साऱ्या क्षेत्रांचा‚ पार्था‚ क्षेत्रज्ञ मीच हे जाण
क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जाणणे म्हणजे माझे ज्ञान ३

तत्क्षेत्रं यच्च यादृक्च यद्विकारि यतश्च यत् ।
स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु ॥ ४

क्षेत्र काय‚ ते कसे असे‚ अन काय विकार तयाचे
कशी निर्मिती होर्इ त्याची‚ कुणा ज्ञान हो त्याचे
क्षेत्रज्ञाचा प्रभाव कैसा क्षेत्रावरती पडतो
ऐक‚ पांडवा‚ थोडक्यात मी वर्णन आता करतो ४

ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ।
ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः ॥ ५

कितिक ऋषींनी गीतांद्वारे छंदबध्द रीतीने
किती प्रकारे वर्णन याचे केले निश्र्चिततेने ५

महाभूतान्यहङ्कारो बुद्धिरव्यक्तमेव च ।
इन्द्रियाणि दशैकं च पञ्च चेन्द्रियगोचराः ॥ ६

पंच महाभूतांसह गर्व, मति, प्रकृति अक्षय
दशेंद्रिये, मन, शब्द, स्पर्श, रस, रूप गंध विषय ६

इच्छा द्वेषः सुखं दुःखं सङ्घातश्चेतना धृतिः ।
एतत्क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम् ॥ ७

सुखदु:खे, कामना, द्वेष, चैतन्य, धैर्य तत्वे
या साऱ्या समुदायामधुनी क्षेत्र आकारा ये ७

अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम् ।
आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः ॥ ८

विनम्र,अन् स्थिर दंभरहित मति‚ सरळपणा‚ शुचिता‚
क्षमा‚ अहिंसा‚ गुरूसेवा‚ मननिग्रह अन् ऋजुता ८

इन्द्रियार्थेषु वैराग्यमनहङ्कार एव च ।
जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम् ॥ ९

निगर्वि वृत्ती‚ विषयविरक्ती‚ इंद्रियसंयमन
जनन‚ मरण‚ वार्धक्य‚ व्याधि या दोषांचे ज्ञान ९

असक्तिरनभिष्वङ्गः पुत्रदारगृहादिषु ।
नित्यं च समचित्तत्वमिष्टानिष्टोपपत्तिषु ॥ १०

कुटुंबीय अन घरदाराप्रति पूर्ण अनासक्ति
इष्टअनिष्टांच्या प्राप्तीमधि राहे समवृत्ती १०

मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी ।
विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि ॥ ११

अनन्यभावे अढळपणानें मम भक्ती करणे
जमाव टाळुन एकांताचा ध्यास मनी धरणे ११

अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् ।
एतज्ज्ञानमिति प्रोक्तमज्ञानं यदतोऽन्यथा ॥ १२

अध्यात्माचा बोध तसा तत्वज्ञानाचा शोध
या साऱ्यांचे नाव ज्ञान‚ रे‚ इतर सर्व दुर्बोध १२

ज्ञेयं यत्तत्प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वामृतमश्नुते ।
अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते ॥ १३

आता सांगतो ज्ञेय काय ते ज्याने अमृत मिळते
ज्ञेय अनादि परंब्रह्म जे सत् वा असत् हि नसते १३

सर्वतः पाणिपादं तत्सर्वतोऽक्षिशिरोमुखम् ।
सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति ॥ १४

हात‚ पाय‚ डोळे‚ डोकी‚ अन् तोंडे दाहि दिशाना
तसे सर्वव्यापी ज्ञेयाला कान सर्व बाजूना १४

सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् ।
असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च ॥ १५

ज्ञेयामध्ये सर्व इंद्रिये आभासात्मक असती
त्यांच्याविरहित निर्गुण तरि ते गुणभोक्ते गुणपती १५

बहिरन्तश्च भूतानामचरं चरमेव च ।
सूक्ष्मत्वात्तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत् ॥ १६

चराचरांच्या अंतर्यामी अन् बाहेरहि ते आहे
जवळ असुनिही दूर सूक्ष्म ते, कुणीहि त्यास ना पाहे १६

अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितम् ।
भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च ॥ १७

सर्वांभूती विभागून तरि ब्रह्म असे अविभक्त
उद्गमदाते‚ प्रतिपालक‚ अन् तरि संहारक तत्व १७

ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते ।
ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम् ॥ १८

अंधाराच्या पलीकडिल ते तेजहि तेजान्वित
तेच ज्ञान अन् ज्ञेय तेच ते सर्वां हृदयी स्थित १८

इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः ।
मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते ॥ १९

पार्था‚ हे वर्णन मी केले क्षेत्र‚ ज्ञान‚ ज्ञेयाचे
जाणुन घेउन मम भक्तानें मजमधि समावयाचे १९

प्रकृतिं पुरुषं चैव विद्ध्यनादी उभावपि ।
विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसम्भवान् ॥ २०

आता सांगतो‚ पुरुष‚ प्रकृती दोन्हि अनादी असती
प्रकृतीपासुन होते पार्था गुण विकार उत्पती २०

कार्यकारणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते ।
पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते ॥ २१

देह‚ इंद्रिये यांच्या करणी प्रकृतीतुनी होती
सुखदु:खाच्या उपभोगास्तव पुरुषाची नियुक्ती २१

पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान्गुणान् ।
कारणं गुणसङ्गोऽस्य सदसद्योनिजन्मसु ॥ २२

पुरुष प्रकृतीच्या संगातुन भोगी तिच्या गुणां
गुणोपभोगातून येर्इ मग भल्याबुऱ्या जन्मा २२

उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः ।
परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन्पुरुषः परः ॥ २३

देहामध्ये असतो साक्षी अनुमोदक भर्ता
तोच महेश्र्वर‚ परमात्माही तोच‚ जाणि पार्था २३

य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह ।
सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते ॥ २४

पुरुष आणि प्रकृती गुणांसह हो ज्याला अवगत
कसेहि वर्तन असो तया ना पुनर्जन्म लागत २४

ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना ।
अन्ये साङ्ख्येन योगेन कर्मयोगेन चापरे ॥ २५

कोणी ध्यानाने अनुभवती आत्मा स्वत:तला
कुणी सांख्य वा कर्मयोग आचरुन जाणती त्याला २५

अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वान्येभ्य उपासते ।
तेऽपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः ॥ २६

अन्य कुणी ज्यां स्वत:स न कळे, ऐकति लोकांचे
आणि भजति मज तेहि जाती तरुनि मरण साचे २६

यावत्सञ्जायते किञ्चित्सत्त्वं स्थावरजङ्गमम् ।
क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात्तद्विद्धि भरतर्षभ ॥ २७

चल वा अचल असे जे जे ते होर्इ निर्माण
क्षेत्राच्या अन् क्षेत्रज्ञाच्या संयोगातुन, जाण २७

समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम् ।
विनश्यत्स्वविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति ॥ २८

सर्व भूतमात्रांच्या ठायी समानता पाही
सर्वांच्या नाशानंतरही अविनाशी राही
अशा परम र्इश्र्वरास ज्याने मनोमनी पाहिले
त्याच महाभागाने‚ पाथा‚ र्इशतत्व जाणिले २८

समं पश्यन्हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम् ।
न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम् ॥ २९

सर्वांमध्ये समानतेने राहणाऱ्या र्इश्र्वरा
जाणुनि रोखी मनास, जाण्यापासुन हीन स्तरा
सन्मार्गावर चालुन आपुली घेइ करून उन्नती
अशा महामन मानवास, रे‚ लाभे उत्तम गती २९

प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः ।
यः पश्यति तथात्मानमकर्तारं स पश्यति ॥ ३०

प्रकृतीकडुन कर्मे होती, आत्मा नाकर्ता
हे जो जाणी तयें जाणिले खरे तत्व, पार्था ३०

यदा भूतपृथग्भावमेकस्थमनुपश्यति ।
तत एव च विस्तारं ब्रह्म सम्पद्यते तदा ॥ ३१

वैविध्यामधि भूतांच्या जो पाही एकत्व
एकत्वातुन होर्इ विस्तृती हे जाणी तत्व
विविधतेतुनी एकता, तशी एकीतुन विस्तृती
या जाणीवे नंतर होते ब्रह्माची प्राप्ती ३१

अनादित्वान्निर्गुणत्वात्परमात्मायमव्ययः ।
शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते ॥ ३२

अनारंभ‚ निर्गुण‚ परमात्मा‚ जरी शरीरस्थ
कर्म ना करी आणि न होर्इ कर्मदोषलिप्त ३२

यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते ।
सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते ॥ ३३

जसे सर्वव्यापी नभ नसते सूक्ष्मसेहि लिप्त
तसाच आत्मा राहि शरीरी अन् तरिहि अलिप्त ३३

यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः ।
क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत ॥ ३४

एक सूर्य जैसा जगताला साऱ्या प्रकाशवी
तसाच‚ पार्था‚ सर्व शरीराला आत्मा उजळवी ३४

क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवमन्तरं ज्ञानचक्षुषा ।
भूतप्रकृतिमोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम् ॥ ३५

ज्ञानचक्षुनी भेद जाणिती क्षेत्र नि क्षेत्रज्ञाचा
आणि भौतिक प्रकृतिपासुन मार्गहि मोक्षाचा
ज्ञानाचे वापरून डोळे हे सारे बघती
महाभाग ते‚ कुंतिनंदना‚ ब्रह्मिभूत होती.” ३५

इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः ॥

अशा प्रकारे येथे श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग नावाचा तेरावा अध्याय पूर्ण झाला

— मुकुंद कर्णिक

Avatar
About मुकुंद कर्णिक 31 Articles
मी स्थापत्य अभियांत्रिकी शास्त्रातील पदवीधारक असून जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी भारताबाहेर आखाती प्रदेशात आलो तेव्हापासून इथेच वास्तव्याला आहे. इथल्या तीन कंपन्यांमध्ये काम करून २०११ मध्ये सेवानिवृत्त झालो. गद्य, पद्य या दोन्ही प्रकारात मी लेखन करतो. एक छापील पुस्तक (लघु कादंबरी) प्रकाशित झाली आहे. त्याशिवाय एक कथासंग्रह आणि एक कवितासंग्रह ई-पुस्तक स्वरूपात प्रसिध्द झाले आहेत. माझ्या स्वतःच्या तीन ब्लॉग्जमधून तसेच इतरही ब्लॉग्जमधून लेखन सुरू आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..