नवीन लेखन...

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबध्द – अध्याय सत्रावा – श्रध्दात्रयविभागयोग

अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशोऽध्यायः

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
श्रध्दात्रयविभागयोग नावाचा सत्रावा अध्याय.


अर्जुन उवाच ।
ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः ।
तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्त्वमाहो रजस्तमः ॥ १

अर्जुन म्हणाला‚
विधिवत् ना तरि श्रध्दापूर्वक योगि यज्ञ करिती
निष्ठा त्यांची कशी गणावी? सात्विक‚ राजस‚ तमसी? १

श्रीभगवानुवाच ।
त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा ।
सात्त्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु ॥ २

श्री भगवान म्हणाले‚
त्रिगुणांच्या अनुषंगे ठरते देहधारिची निष्ठा
ऐक कशी ते आता सांगतो तुज मी‚ कुंतीसुता २

सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत ।
श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः ॥ ३

प्रकृतिस्वभावानुरूप श्रध्दा मनुजाची‚ भारत
ज्याची श्रध्दा जिथे तसा तो स्वत: असे घडत ३

यजन्ते सात्त्विका देवान्यक्षरक्षांसि राजसाः ।
प्रेतान्भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः ॥ ४

सत्वगुणी पूजिति देवांना‚ राजस यक्षांना‚
तामसगुणी जन वंदन करिती भूतप्रेत यांना ४

अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनाः ।
दम्भाहङ्कारसंयुक्ताः कामरागबलान्विताः ॥ ५

दंभ‚ गर्व ज्यांच्यामधि भरला अन् कामासक्ती
असे अडाणी शास्त्रबाह्य अन् घोर तपे आचरिती ५

कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः ।
मां चैवान्तःशरीरस्थं तान्विद्ध्यासुरनिश्चयान् ॥ ६

अशा तपाने कष्टविती देहस्थ महाभूतां-
पर्यायाने मला‚ असति ते असुरवृत्ति‚ पार्था ६

आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः ।
यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु ॥ ७

आहाराचे जसे मानिती तीन विविध वर्ग
तसे यज्ञ‚ तप‚ दानाचेही, ऐक सांगतो मर्म ७

आयुःसत्त्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धनाः ।
रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सात्त्विकप्रियाः ॥ ८

(आहार)
सत्वगुणींना प्रिय ऐसा आहार वाढवी प्रीती‚
समृध्दी‚ बल‚ आरोग्य‚ आयु‚ सुख‚ सात्विकवृत्ती
पौष्टिक असुनी रसाळ आणि स्निग्ध असे अन्न
दीर्घकाल ठेविते मनाला शांत अन प्रसन्न ८

कट्वम्ललवणात्युष्णतीक्ष्णरूक्षविदाहिनः ।
आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः ॥ ९

आंबट‚ खारट‚ कटू‚ झणझणित‚ तिखट‚ दाहकारक
अन्न आवडे राजसगुणीना‚ शोकरोगदायक ९

यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत् ।
उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम् ॥ १०

शिळे, निरस‚ दुर्गंधियुक्त अन सडलेले‚ उष्टे‚
अपवित्र असे अन्न तामसी लोकां प्रिय असते १०

अफलाङ्क्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य इज्यते ।
यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्त्विकः ॥ ११

(यज्ञ)
आस फलाची न धरुन केला यज्ञ विधीपूर्वक
शांतपणे, संतुष्ट मने, तो यज्ञ असे सात्विक ११

अभिसन्धाय तु फलं दम्भार्थमपि चैव यत् ।
इज्यते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसम् ॥ १२

दंभ माजवुन फलाभिलाषा धरून होर्इ यजन
तो यज्ञ असे‚ भरतश्रेष्ठा‚ राजस हे जाण १२

विधिहीनमसृष्टान्नं मन्त्रहीनमदक्षिणम् ।
श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते ॥ १३

कसाबसा उरकला यज्ञ, दक्षिणा प्रसाद न देता
मंत्रांवाचुन अन् श्रध्देवाचुन, तो तामस‚ पार्था १३

देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवम् ।
ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते ॥ १४

(तप)
देव, ब्राह्मण, गुरु, विद्वज्जन यांना वंदुनिया
विशुध्द ब्रह्माचरण, अहिंसापूर्ण तपश्चर्या
पवित्रतेने, विनम्रतेने, सद् भावे करती
शास्त्रामध्ये अशा तपाला ‘कायिक तप’ म्हणती १४

अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् ।
स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते ॥ १५

सत्यप्रिय हितकारि असुनि जे उद्वेगजनक नसे
अशा भाषणाला पार्था ‘वाचिक तप’ संज्ञा असे १५

मनः प्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः ।
भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते ॥ १६

प्रसन्नवृत्ती, सौम्य स्वभाव अन् मितभाषण‚ संयम‚
शुध्द भावना‚ या सर्वांना ‘मानस तप’ नाम १६

श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः ।
अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्त्विकं परिचक्षते ॥ १७

तिन्हि प्रकारची तपे केलि जर निरिच्छ श्रध्देने
तर धनंजया‚ तपांस ऐशा सात्विकांत गणणे १७

सत्कारमानपूजार्थं तपो दम्भेन चैव यत् ।
क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम् ॥ १८

मानासाठी अथवा दांभिकतेपोटी केलेले
क्षणकालिक ते तप ठरते, त्या ‘राजस’ म्हटलेले १८

मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः ।
परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम् ॥ १९

स्वत:स पीडाकारी अथवा इतरांही मारक
मूर्खपणे केलेले ऐसे तप ‘तामस’ नामक १९

दातव्यमिति यद्दानं दीयतेऽनुपकारिणे ।
देशे काले च पात्रे च तद्दानं सात्त्विकं स्मृतम् ॥ २०

(दान)
योग्य काळ स्थळ आणि पात्रता पूर्ण पारखून
परतफेडिची आस न धरता केलेले दान
पवित्र ऐसे कर्तव्यच ते मानुन केलेले
त्या दानाला ‘सात्विक’ ऐसे असते गणलेले २०

यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः ।
दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम् ॥ २१

फेड म्हणुनि वा हेतु ठेवुनी वा नाराजीत
केल्या दाना शास्त्रामध्ये ‘राजस’ म्हणतात २१

अदेशकाले यद्दानमपात्रेभ्यश्च दीयते ।
असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम् ॥ २२

अयोग्य काळी, स्थळी, अपात्रा, अन् करुनि अवज्ञा
दान दिले जे शास्त्रांत तया ‘तामस’ ही संज्ञा २२

ॐतत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः ।
ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा ॥ २३

ओम् तत् सत् हे तीन शब्द परब्रह्म वर्णितात
तसेच ब्राह्मण, वेद, यज्ञ हे त्यांतुन अवतारत २३

तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपःक्रियाः ।
प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनाम् ॥ २४

यज्ञ, दान, तप या सर्व कृतींच्या आचरणात
ब्रह्मवादि ‘ओम्’ उच्चारच प्रारंभी करतात २४

तदित्यनभिसन्धाय फलं यज्ञतपःक्रियाः ।
दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकाङ्क्षिभिः ॥ २५

तत् शब्दातुन सूचित होते निरपेक्षा वृत्ती
यज्ञ, दान, तप करताना तत् म्हणती मोक्षार्थी २५

सद्भावे साधुभावे च सदित्येतत्प्रयुज्यते ।
प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थ युज्यते ॥ २६

सत्त्वशील अस्तित्व होतसे ‘सत्’ मधुनी व्यक्त
त्यास्तव उचित अशी कर्मेही सत् मधि गणतात २६

यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते ।
कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते ॥ २७

यज्ञ, तपस्या, दान यांत स्थिरवृत्ती सत् असते
त्यांच्यास्तव कर्तव्य कर्म जे तेही सत् ठरते २७

अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् ।
असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह ॥ २८

श्रध्दाविरहित यज्ञ, तपस्या, आणि अपात्री दान
असत् म्हणुनि त्यां ना येथे ना परलोकी स्थान २८

इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशोऽध्यायः

अशा प्रकारे येथे श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
श्रध्दात्रयविभागयोग नावाचा सत्रावा अध्याय पूर्ण झाला.

— मुकुंद कर्णिक

Avatar
About मुकुंद कर्णिक 31 Articles
मी स्थापत्य अभियांत्रिकी शास्त्रातील पदवीधारक असून जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी भारताबाहेर आखाती प्रदेशात आलो तेव्हापासून इथेच वास्तव्याला आहे. इथल्या तीन कंपन्यांमध्ये काम करून २०११ मध्ये सेवानिवृत्त झालो. गद्य, पद्य या दोन्ही प्रकारात मी लेखन करतो. एक छापील पुस्तक (लघु कादंबरी) प्रकाशित झाली आहे. त्याशिवाय एक कथासंग्रह आणि एक कवितासंग्रह ई-पुस्तक स्वरूपात प्रसिध्द झाले आहेत. माझ्या स्वतःच्या तीन ब्लॉग्जमधून तसेच इतरही ब्लॉग्जमधून लेखन सुरू आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..