नवीन लेखन...

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय तिसरा – कर्मयोग

अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः ॥

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
कर्मयोग नावाचा तिसरा अध्याय.


अर्जुन उवाच ।
ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन ।
तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥ १

अर्जुन म्हणाला‚
“कर्मापेक्षा श्रेष्ठ बुध्दि हे तुझेच म्हणणे ना ?
तरि युध्दाच्या घोर कर्मी मज लोटिशी‚ जनार्दना ? १

व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे ।
तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ॥ २

दुटप्पी तुझ्या उपदेशाने कुण्ठित मति होई
निश्र्चित एकच मार्ग सांग जो श्रेयस्कर होई.” २

श्रीभगवानुवाच
लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ ।
ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेण योगिनाम् ॥ ३

श्री भगवान म्हणाले‚
“हे कौंतेया दोन मार्ग मी वर्णन केले तुजसाठी
संन्याशाचा ज्ञानमार्ग अन् कर्मयोग योग्यांसाठी ३

न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते ।
न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति ॥ ४

कर्मारंभ न करण्याने ना होइ मुक्ती प्राप्त
अन् संन्यासी होउनदेखिल सिध्दी दुरापास्त ४

न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ।
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः ॥ ५

असो कुणीही‚ कर्मावाचुन बसूच ना शकतो
निसर्गनियमे बध्द कार्यरत असा सदा असतो ५

कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् ।
इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते ॥ ६

देखाव्याला इंद्रियसंयम‚ मनात जप जास्त
अशा नराला केवळ ‘दांभिक’ ही संज्ञा रास्त ६

यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन ।
कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते ॥ ७

मनी संयमित राहुनि करि जो कर्मप्रारंभ
निश्रित होतो खास प्रतिष्ठेचा त्याला लाभ ७

नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः ।
शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येदकर्मणः ॥ ८

रिकामेपणे उगा न बसता कार्य तू करावे
श्रेयस्कर तुज स्वधर्मातले कर्म आचरावे
जाण अर्जुना क्रमप्राप्तही असे काम करणे
कर्म न करता अशक्य होइल उदराचे भरणे ८

यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः ।
तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर ॥ ९

यज्ञाखेरिज इतरहि कामे या लोकी‚ पार्थ
नि:संगपणे तीहि करावी जैसी यज्ञार्थ ९

सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः ।
अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक् ॥ १०

यज्ञासह घडवुनी विश्र्व त्वष्टा होता वदला
यज्ञची करिल इच्छापूर्ती प्रदान तुम्हाला १०

देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु वः ।
परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ ॥ ११

देवांना प्रिय यज्ञ करूनिया खूष करा त्याना
तोषवतिल ते तुम्हास‚ श्रेयस्कर हे दोघांना ११

इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः ।
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव सः ॥ १२

यज्ञाने संतुष्ट देव हे फल सर्वां देती
परत तया जो न देइ त्याची ‘चोरां’मधि गणती १२

यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः ।
भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् ॥ १३

यज्ञानंतर उर्वरीत जे त्यावर उपजीवितो
तो नर होतो पापमुक्त अन् मोक्ष प्राप्त करतो
पण जे केवळ स्वत:चसाठी शिजवतात अन्न
अन् स्वत:च भक्षितात ते‚ ते खाती पापान्न १३

अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः ।
यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥ १४

जिवास पोशी अन्न‚ जया करी पाउस निर्माण
जन्म पावसाचा यज्ञातुन‚ कर्मांतुन यज्ञ १४

कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम् ।
तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् ॥ १५

कर्म निघाले ब्रम्हापासुनि‚ ब्रह्म ईशरूप
सर्वव्यापि ब्रह्म म्हणूनच यज्ञाचे अधिप १५

एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः ।
अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति ॥ १६

यज्ञ कर्मचक्राला या जे अव्हेरती‚ पार्थ
पापी लंपट आयुष्य त्यांचे हो केवळ व्यर्थ १६

यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः ।
आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते ॥ १७

पण स्वत:मधि मग्न राहुनी स्वत:तची तुष्ट
ऐशांसाठी कार्य न उरते काही अवशिष्ट १७

नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन ।
न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः ॥ १८

ऐसा सज्जन करे काही वा काहीही न करे
कारण भवतालामधि त्याला स्वारस्यच ना उरे १८

तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर ।
असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥ १९

म्हणुनी पार्था, कर्म करी तू अलिप्त राहून
अनासक्त कर्माचरणामधि आहे कल्याण १९

कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः ।
लोकसङ्ग्रहमेवापि सम्पश्यन्कर्तुमर्हसि ॥ २०

जनकासम जन सिध्दि पावले आचरून कर्म
लोकाग्रणि होण्यास्तव तुजला उचित नित्यकर्म २०

यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥ २१

पुरूषश्रेष्ठ जे जे करतो ते इतर लोक करिती
प्रमाण मानी तो जे त्याला सगळे अनुसरिती २१

न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन ।
नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥ २२

पार्था‚ या तिन्हि लोकी मजला कर्तव्यच नुरले
अथवा काही मिळवायाचे असेहि ना उरले
तरीही पहा कर्मावाचुन राहतो न कधि मी
सदैव असतो‚ हे पार्था‚ मी मग्न नित्यकर्मी २२

यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः ।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ २३

ध्यानी घे, मी राहिन निष्क्रिय जर आळस करूनी
निष्क्रिय बनतिल जनही सारे मजला अनुसरूनी २३

उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम् ।
सङ्करस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः ॥ २४

अन् त्या निष्क्रियतेतुन त्यांचा होइल जो नाश
ठरेन कारण मीच अर्जुना त्यांच्या नाशास २४

सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत ।
कुर्याद्विद्वांस्तथासक्तश्चिकीर्षुर्लोकसङ्ग्रहम् ॥ २५

अजाणते जन करिती कर्में होउनिया लिप्त
लोकाग्रणिने तशिच करावी राहोनि अलिप्त २५

न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम् ।
जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन् ॥ २६

कर्ममग्न पण अजाणत्याना कमी न लेखावे ।
अविकारिपणे कसे करावे कर्म‚ दाखवावे ॥
स्वत: तसे आचरून करावे प्रवृत्त तयाना ।
हेच असे कर्तव्य ज्ञानी अन् लोकाग्रणिना ॥ २६

प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः ।
अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते ॥ २७

प्रकृतिच्या त्रिगुणानी सारी कर्मे होत असतां
अहंकारि अन् अज्ञानी म्हणे‚ तोच असे कर्ता २७

तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः ।
गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ॥ २८

सुजाण जाणी गुण कर्मातील अध्याहृत द्वैत
गुणातुनि गुण येती जाणुनि राही अविचलित २८

प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु ।
तानकृत्स्नविदो मन्दान्कृत्स्नविन्न विचालयेत् ॥ २९

त्रिगुणांच्या मोहात राहति निमग्न अज्ञानी
सोडुन द्यावा पाठपुरावा त्यांचा सूज्ञानी २९

मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा ।
निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ॥ ३०

मजवरती सोपवुनी चिंता तू परिणामांची
नि:शंक सुरू करी प्रक्रिया या संग्रामाची ३०

ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः ।
श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ॥ ३१

नि:शंकपणे जे माझ्या आदेशां अनुसरती
कर्मबंधनातुन ते श्रध्दावंत मुक्त होती ३१

ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् ।
सर्वज्ञानविमूढांस्तान्विद्धि नष्टानचेतसः ॥ ३२

मत्सरामुळे नकार देती करण्या अनुसरण
ते अविवेकी मूढ पावती नाश खचित जाण ३२

सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि ।
प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति ॥ ३३

सुजाणही वागती आपुल्या स्वभावानुसार
तसेच जीवहि सर्व‚ काय मग करायचा जोर? ३३

इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ ।
तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ ॥ ३४

विषयवासनांमध्ये वसती प्रीति अन् द्वेष
आधीन त्यांच्या कधी न व्हावे‚ दोन्ही रिपुरूप ३४

श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ॥ ३५

कितिहि भासले सोपे परधर्माचे अनुकरण
धर्म आपला पाळावा जरि नसला परिपूर्ण
स्वधर्मातले मरणे देखिल श्रेयस्कर ठरते
परधर्मीं घुसमटून जगणे भीतिप्रद असते.” ३५

अर्जुन उवाच ।
अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः ।
अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥ ३६

अर्जुन म्हणाला‚
“इच्छा नसतानाही करिती लोक पापकर्म
कोणाच्या बळजबरीने? मजसी करी कथन मर्म” ३६

श्रीभगवानुवाच ।
काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः ।
महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ॥ ३७

श्री भगवान म्हणाले‚
“रजोगुणातुन जन्म घेति जे क्रोध आणि काम
तेच मुळाशी असती याच्या, शत्रू अति अधम ३७

धूमेनाव्रियते वह्निर्यथादर्शो मलेन च ।
यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम् ॥ ३८

अग्नि धुराने‚ दर्पण धुळिने‚ नाळेने गर्भ
वेढले जसे तसे वेढले या रिपुनी सर्व ३८

आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा ।
कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च ॥ ३९

सर्वभक्षि अग्नीसम आहे रिपू कामरूपी
तये टाकिले झाकोळुन रे तेज ज्ञानरूपी ३९

इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते ।
एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् ॥ ४०

बुध्दि आणि मन तशी इंद्रिये तिन्हीत हा वसतो
ज्ञाना झाकुन टाकुन मनुजा सदैव मोहवितो ४०

तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ ।
पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम् ॥ ४१

म्हणुनि अर्जुना विषयवासनांचे करि संयमन
अन् ज्ञानाच्या‚ विज्ञानाच्या रिपुचे करि दमन ४१

इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः ।
मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः ॥ ४२

इंद्रियांहुनी थोर असे मन‚ मनाहुनीहि मती
मतीहुनीही थोर असे त्या परमात्मा म्हणती ४२

एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना ।
जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् ॥ ४३

परमात्म्याला जाण‚ पार्थ‚ अन् स्वत:स आवरूनी
कामस्वरूपी शत्रूचा तू टाक अंत करूनी.” ४३

इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः ॥

अशा प्रकारे येथे श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
कर्मयोग नावाचा तिसरा अध्याय पूर्ण झाला.

— मुकुंद कर्णिक

Avatar
About मुकुंद कर्णिक 31 Articles
मी स्थापत्य अभियांत्रिकी शास्त्रातील पदवीधारक असून जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी भारताबाहेर आखाती प्रदेशात आलो तेव्हापासून इथेच वास्तव्याला आहे. इथल्या तीन कंपन्यांमध्ये काम करून २०११ मध्ये सेवानिवृत्त झालो. गद्य, पद्य या दोन्ही प्रकारात मी लेखन करतो. एक छापील पुस्तक (लघु कादंबरी) प्रकाशित झाली आहे. त्याशिवाय एक कथासंग्रह आणि एक कवितासंग्रह ई-पुस्तक स्वरूपात प्रसिध्द झाले आहेत. माझ्या स्वतःच्या तीन ब्लॉग्जमधून तसेच इतरही ब्लॉग्जमधून लेखन सुरू आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..