नवीन लेखन...

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय सहावा – आत्मसंयमयोग

अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः ॥

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
आत्मसंयमयोग नावाचा सहावा अध्याय.


श्रीभगवानुवाच ।
अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः ।
स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः ॥ १

श्रीभगवान म्हणाले‚
फलप्राप्तीची आस न धरता कर्मे जो करतो
तो संन्यासी, कर्मयोगिही‚ न जो अकर्मी तो १

यं संन्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पाण्डव ।
न ह्यसंन्यस्तसङ्कल्पो योगी भवति कश्चन ॥ २

जाण पांडवा‚ एकत्व वसे सांख्य, कर्मयोगी
फलकामना त्यागल्याविना बने न कुणि योगी २

आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते ।
योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते ॥ ३

योगी होण्याच्या इच्छेचे मूळ कर्म असते
योगारूढ झाल्यावर त्याचे शमन मूळ बनते ३

यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते ।
सर्वसङ्कल्पसंन्यासी योगारूढस्तदोच्यते ॥ ४

विषयासक्तीविरहित करूनी निरिच्छ आचरण
सर्व कामना त्यागी जो तो ‘योगारूढ’ जाण ४

उद्धरेदात्मनाssत्मानं नात्मानमवसादयेत् ।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥ ५

स्वत: स्वत:ला उध्दारावे खचून ना जाता
स्वत:चे स्वत: शत्रू असतो अन् स्वत:च भ्राता ५

बन्धुरात्माssत्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः ।
अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् ॥ ६

स्वमन जिंकिता त्याशी जुळते बंधुसम नाते
पराजिताच्या मनांत केवळ शत्रुत्वच उरते ६

जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः ।
शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः ॥ ७

मनास जिंकी त्याचा आत्मा स्थिर शांती लाही
शीतउष्ण‚ सुखदु:ख‚ मान वा अपमानांतरिही ७

ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः ।
युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः ॥ ८

ज्ञान नि विज्ञानाने ज्याचा आत्मा तृप्त असे
त्याला अध्यात्मी योगी ही ख्याती प्राप्त असे
स्थिर बुध्दीने विजय इंद्रियांवरती मिळवोनी
दगड, माति अन् सोने याना समान तो मानी ८

सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु ।
साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ॥ ९

जिवलग मित्र‚ तसे बंधु, अन् उदास‚ मध्यस्थ
साधू अथवा पापी आणिक सुष्ट तसे दुष्ट
या सर्वाना समानतेने जो साधू वागवि
त्या समबुध्दियोग्याचे स्तर विशेष सर्वस्वी ९

योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः ।
एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः ॥ १०

एकचित्त होउन योग्याने एकांती जावे
निरिच्छ राहुन पाश सोडुनी योग आचरावे १०

शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः ।
नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम् ॥ ११

स्वच्छ आणि मध्यम उंचीचे स्थान निवडावे
दर्भावर हरिणाजिन‚ त्यावर वस्त्र अंथरावे ११

तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः ।
उपविश्यासने युञ्ज्याद्योगमात्मविशुद्धये ॥ १२

अशा आसनावरी बसावे आवरुन चित्तेंद्रियां
आत्मशुध्दिस्तव करण्यासाठी उचित योगक्रिया १२

समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः ।
सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् ॥ १३


पाठ‚ मान‚ अन् डोके ठेवुनि ताठ‚ बसावे स्थिर
अविचलित‚ लावुनि नाकाच्या अग्रावर नजर १३

प्रशान्तात्मा विगतभीर्ब्रह्मचारिव्रते स्थितः ।
मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः ॥ १४

भीतिमुक्त अन् शांत मनाने ब्रह्मचर्य पाळावे
आणिक माझ्या ठायी अपुले मन केंद्रीत करावे १४

युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः ।
शान्तिं निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति ॥ १५

अशा प्रकारे करण्याने योगाचे आचरण
माझ्याशी एकरूपतेचे मिळेल निर्वाण १५

नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः ।
न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ॥ १६

अति खाणे‚ काही ना खाणे‚ अति निद्रा‚ जाग्रणे
योगसिध्दि न होण्यामागे ही सारी कारणे १६

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥ १७

यथा उचित आहार विहार अन् माफक विश्रांती
यांचे अवलंबन केल्याने सुखद योगप्राप्ती १७

यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते ।
निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा ॥ १८

मना आवरुन आणिक राहुन आत्म्याशी निष्ठ
उपभोगाप्रत निरिच्छ बनतो म्हणति त्यास ‘युक्त’ १८

यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता ।
योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः ॥ १९

वारा नसता जशी दिव्याची वात संथ तेवते
मन आवरता योग्याचेही ध्यान स्थिर बनते १९

यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया ।
यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति ॥ २०

बध्द मना योगाभ्यासाने उपरति होते जधि
स्वत:स बघुनी स्वत:त, आत्मा होतो आनंदी २०

सुखमात्यन्तिकं यत्तद् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम् ।
वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः ॥ २१

जेव्हा त्या इंद्रियांपलिकडिल असीम सौख्यात
स्थिरावतो योगी, तो होतो कधिहि न तत्वच्युत २१

यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः ।
यस्मिन्स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते ॥ २२

ज्या स्थितीमधि अधिक सुखाचा लोभ न तो धरतो
वा अति दु:खद घटनेनेही विचलित ना होतो २२

तं विद्याद् दुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम् ।
स निश्चयेन योक्तव्यो योगोऽनिर्विण्णचेतसा ॥ २३

असा दु:खसंयोगवियोगच ‘योग’ म्हणुनि ज्ञात
कंटाळा न करावा याचे पालन करण्यात २३

सङ्कल्पप्रभवान्कामांस्त्यक्त्वा सर्वानशेषतः ।
मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः ॥ २४

मनोवासना पूर्णपणाने टाकाव्या त्यागुनी
इंद्रियांस आवर घालावा आपण चहुकडुनी २४

शनैः शनैरुपरमेद् बुद्ध्या धृतिगृहीतया ।
आत्मसंस्थं मनः कृत्वा न किञ्चिदपि चिन्तयेत् ॥ २५

धैर्य बाळगुनि हळू हळू मग बुध्दि शांतवावी
आत्म्यामध्ये मन गुंतवुनी चिंता न करावी २५

यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम् ।
ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ॥ २६

चंचल मन जर स्वैर व्हावया होइल अनावर
निश्र्चयपूर्वक आत्म्यातच त्या बांधावे सत्वर २६

प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् ।
उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम् ॥ २७

असे मनाला शांत करूनच ‘युक्त’ योगी मिळविती
दोषमुक्त निष्पाप ब्रह्ममय उत्तम सुखप्राप्ती २७

युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः ।
सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुते ॥ २८

अशा प्रकारे पापमुक्त अन् आत्मतुष्ट योगी
ब्रह्ममीलनामधि मिळणारे अतीव सुख भोगी २८

सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।
ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः ॥ २९

आत्मा ज्याचा योगयुक्त तो समदृष्टी राही
सर्व जिवांमधि स्वत:‚ स्वत:मधि सर्व जीवां पाही २९

यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति ।
तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ॥ ३०

मी सर्वांभूती‚ अन सारे मम ठायी मानतो
अशास मी ना अंतरतो‚ ना तो मज अंतरतो ३०

सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः ।
सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते ॥ ३१

एकत्वाने सर्वांभूती असलेल्या मज भजतो
तो योगी रत नितकर्मीं तरि मज ठायी वसतो ३१

आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन ।
सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः ॥ ३२

स्वत:सारखे सर्वां लेखी सुखात वा दु:खात
अशा युक्त योग्याची गणना सर्वोत्कृष्टात ३२

अर्जुन उवाच ।
योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन ।
एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात्स्थितिं स्थिराम् ॥ ३३

अर्जुन म्हणाला‚
हे मधुसूदन‚ समत्वतेचा योग तुवां सागितला
चंचलतेमधि टिकण्याजोगा मला न जाणवला ३३

चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद् दृढम् ।
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ॥ ३४

चंचल मन हे बलिष्ठ असते‚ कठिण तया रोखणे
जसे कुणाही अशक्य असते वा~याला बांधणे ३४

श्रीभगवानुवाच ।
असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् ।
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ॥ ३

श्रीभगवान म्हणाले‚
यात नसे शंका, चंचल मन दुष्कर वळवाया
पण, अभ्यासाने, वैराग्याने बधेल, कौंतेया ३५

असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः ।
वश्यात्मना तु यतता शक्योऽवाप्तुमुपायतः ॥ ३६

मनावरी ताबा नसला तर योग हा अशक्य
प्रयत्नपूर्वक मिळवुनि ताबा योगप्राप्ति शक्य ३६

अर्जुन उवाच ।
अयतिः श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः ।
अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति ॥ ३७

अर्जुन म्हणाला‚
असुनहि श्रध्दा यत्नाअभावी योगातुन ढळतो
हे श्रीकृष्णा, नर ऐसा मग कुठल्या गतीस जातो ? ३७

कच्चिन्नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति ।
अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि ॥ ३८

ब्रह्मप्राप्तिमार्गातुन भ्रष्ट अन् गोंधळलेला तो
नभात फुटल्या मेघापरी का तोहि नष्ट होतो ? ३८

एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्यशेषतः ।
त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते ॥ ३९

संशय हा माझा, भगवंता, तुम्हीच दूर करा
निरसन करणारा तुम्हाविण नसे कुणी दुसरा ३९

श्रीभगवानुवाच ।
पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते ।
न हि कल्याणकृत्कश्चिद् दुर्गतिं तात गच्छति ॥ ४०

श्री भगवान म्हणाले‚
इहलोकी वा परलोकिही तो नष्ट नाहि होत
कल्याणप्रद कर्में करि त्या दुर्गति ना प्राप्त ४०

प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वतीः समाः ।
शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ॥ ४१

पुण्यकर्म करणाऱ्यांजैसा तो स्वर्गी जाई
दीर्घकाळ राहुनी तिथे मग पुनर्जन्म घेई
पुनर्जन्मही अशा घरी जे शुध्द नि श्रीमंत
योगभ्रष्ट असुनिही असा तो ठरे भाग्यवंत ४१

अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् ।
एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम् ॥ ४२

किवा बुध्दीवंत योगि या घरी जन्मा येई
जन्म असा अतिदुर्लभ, पार्था, ध्यानी तू घेई ४२

तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम् ।
यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन ॥ ४३

या जन्मीहि मिळे तया गतजन्मामधले ज्ञान
ज्यायोगे तो मिळवू पाहिल सिध्दी, कुरूनंदन ४३

पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः ।
जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्तते ॥ ४४

पूर्वजन्मिच्या ज्ञानाने तो जिज्ञासू होई
योगाकर्षण त्याला वेदांपलीकडे नेई ४४

प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः ।
अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम् ॥ ४५

जन्मोजन्मी प्रयत्न करूनी पापमुक्त होत
सिध्दी मिळुनी योगी तो मग जाई शांतिप्रत ४५

तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः ।
कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन ॥ ४६

तपस्व्याहुनी, विद्वानाहुनि, कर्मठांहुनी श्रेष्ठ
योगी असतो असा, पार्थ, तू योगी बनणे इष्ट ४६

योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना ।
श्रद्धावान्भजते यो मां स मे युक्ततमो मतः ॥ ४७

अशा सर्व योग्यात ठेवुनि श्रध्दा मजलागी
भजतो जो मज त्यास मानि मी सर्वोत्तम योगी ४७

इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः ॥

अशा प्रकारे येथे श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
आत्मसंयमयोग नावाचा सहावा अध्याय पूर्ण झाला.

— मुकुंद कर्णिक

Avatar
About मुकुंद कर्णिक 31 Articles
मी स्थापत्य अभियांत्रिकी शास्त्रातील पदवीधारक असून जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी भारताबाहेर आखाती प्रदेशात आलो तेव्हापासून इथेच वास्तव्याला आहे. इथल्या तीन कंपन्यांमध्ये काम करून २०११ मध्ये सेवानिवृत्त झालो. गद्य, पद्य या दोन्ही प्रकारात मी लेखन करतो. एक छापील पुस्तक (लघु कादंबरी) प्रकाशित झाली आहे. त्याशिवाय एक कथासंग्रह आणि एक कवितासंग्रह ई-पुस्तक स्वरूपात प्रसिध्द झाले आहेत. माझ्या स्वतःच्या तीन ब्लॉग्जमधून तसेच इतरही ब्लॉग्जमधून लेखन सुरू आहे.

1 Comment on श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय सहावा – आत्मसंयमयोग

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..