नवीन लेखन...

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय सातवा – ज्ञानविज्ञानयोग

अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी ज्ञानविज्ञानयोग नावाचा सातवा अध्याय.


श्रीभगवानुवाच ।
मय्यासक्तमनाः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः ।
असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ॥ १

श्री भगवान म्हणाले
माझ्या ठायी चित्त लावुनी माझ्या मदतीने
कर्मयोगामधली‚ पार्था‚ करता आचरणे
माझ्याविषयी मिळवशील जे नि:शंकित ज्ञान
त्याबद्दल मी सांगतो तुला आता करी श्रवण १

ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः ।
यज्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते ॥ २

विज्ञानासह ज्ञानकथन मी करीन पूर्णतया
जे जाणुनि तुज अन्य काहि ना उरेल जाणाया २

मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये ।
यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः ॥ ३

हजारांमधी एक नर करी यत्न सिध्दिसाठी
अशामधि एकासच लाभे मजविषयी माहिती ३

भूमिरापोऽनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च ।
अहङ्कार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ॥ ४

पृथ्वी, पाणी, अग्नि, वायू, नभ, मन, मति, गर्व
या आठांमधि विभागली मम प्रकृति रे पांडव ४

अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् ।
जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत् ॥ ५

दुय्यम ही प्रकृती, हिच्याहुन श्रेष्ठ दुजी आहे
धनंजया जीवरी जगत् हे आधारून राहे ५

एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय ।
अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा ॥ ६

सर्व जीव हे या दोघीतुन होती उत्पन्न
मी जीवांचा आरंभ तसा मीच असे मरण ६

मत्तः परतरं नान्यत्किञ्चिदस्ति धनञ्जय ।
मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ॥ ७

माझ्याखेरिज, हे धनंजया, दुजे काहि नाही
माळेमधि ओवल्या मण्यांसम सारे मज ठायी ७

रसोऽहमाप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः ।
प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु ॥ ८

पाण्यातिल रस, कौंतेया मी, शशिसूर्याची प्रभा‚
वेदांतिल ॐकार मी‚ तसा हुंकारहि मी नभा ८

पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ ।
जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु ॥ ९

पुरुषातिल पौरुष्य मीच, मी तेज अनलाचे
धरित्रिचा मी गंध, प्राण मी, तप मी तापसिचे ९

बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् ।
बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ॥ १०

जाण अर्जुना, सर्व जिवांचे मीच असे बीज
बुध्दिमतांची बुध्दी अन् तेजस्वींचे तेज १०

बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम् ।
धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ॥ ११

विषयवासनाविरहित रे मी बलवंतांचे बल
भरतर्षभ, मी काम जिवां जो धर्मा अनुकूल ११

ये चैव सात्त्विका भावा राजसास्तामसाश्च ये ।
मत्त एवेति तान्विद्धि न त्वहं तेषु ते मयि ॥ १२

सात्विक, राजस, तामस हे जे गुण मनी वसती
मी न त्यामधि पण ते सारे माझ्यामधि असती १२

त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् ।
मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम् ॥ १३

त्रिगुणांनी त्या मोहित होउनि हे सारे जगत
त्यापलिकडल्या मज परमात्म्या जाणुन ना घेत १३

दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया ।
मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥ १४

ही दैवी त्रिगुणात्मक माया आहे अति दुस्तर
शरण मला येती ते तरूनि जाती तिच्या पार १४

न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः ।
माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः ॥ १५

या मायेतुन ज्ञान जयांचे झाले रे नष्ट
शरण मला ना येति नराधम, मूढ आणि दुष्ट १५

चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन ।
आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ ॥ १६

भजति मला ते चौघे, केलें पुण्यकर्म ज्यांनी –
रोगग्रस्त, जिज्ञासु, धनार्थी, तसेच जे ज्ञानी १६


तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते ।
प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रियः ॥ १७

यांमध्येही भक्त, जयाने कर्मयोग जाणला –
असा ज्ञानी, मी प्रिय त्याला अन् तो प्रियतम मजला १७

उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् ।
आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् ॥ १८

हे सारे मम भक्त चांगले, तरि माझ्या ठायी
ज्ञानी, मज उत्तमगति जाणुन, सामावुनी जाई १८

बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते ।
वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः ॥ १९

अनेकदा जन्मुनि जो जाणी, मी सर्वेसर्वा
आणि मिळे मज, असा महात्मा दुर्लभ रे पांडवा १९

कामैस्तैस्तैर्हृतज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः ।
तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया ॥ २०

अनेक लोभी आपआपले मत अनुसरतात
मजला सोडुनि अन्य दैवते नियमित भजतात २०

यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति ।
तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ॥ २१

जो ज्या देवावरती श्रध्दा ठेवाया बघतो
त्याला त्या श्रध्दास्थानाशी मीच स्थिर करतो २१

स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते ।
लभते च ततः कामान्मयैव विहितान्हि तान् ॥ २२

श्रध्दापूर्वक तो त्या देवाचे मग करि पूजन
मीच नेमलेले फल मिळवी त्या पूजेतून २२

अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् ।
देवान्देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि ॥ २३

फलप्राप्ती ही नाशवंत हे ना जाणति वेडे
ते त्या देवांकडे जाति, मम भक्त येति मजकडे २३

अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः ।
परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ॥ २४

मूढांना ना कळत रूप मम शाश्र्वत, अव्यक्त
अज्ञानाच्या पोटि समजती मजला ते व्यक्त २४

नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृतः ।
मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् ॥ २५

मायाच्छादित स्वरूप माझे नाहि कुणा दृष्य
मूढ नेणिती की मी शाश्र्वत, अजन्म, अदृष्य २५

वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन ।
भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ॥ २६

मृत, हयात, वा यायचेत, त्या सर्वा मी जाणी
आणि अर्जुना, तरीहि मजला जाणतो न कोणी २६

इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत ।
सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप ॥ २७

इच्छा-द्वेषाच्या द्वंद्वातुन जन्मे जो मोह
त्या मोहाने भ्रमिष्ट होती रे सारे जीव २७

येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम् ।
ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः ॥ २८

जे पुण्यात्मे या द्वंद्वातुन मुक्ति मिळवतात
ते दृढनिश्र्चयपूर्वक माझी भक्ती करतात २८

जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ।
ते ब्रह्म तद्विदुर्कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम् ॥ २९

जन्ममृत्युच्या फेऱ्यातुन जे इच्छितात मुक्ती
माझ्या आधारे त्यां होई ब्रह्मज्ञानप्राप्ती २९

साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः ।
प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः ॥ ३०

मी अधिभूत, मी अधिदैव, मीच अधियज्ञ
या विश्र्वासावरती करिती कर्मे जे सुज्ञ
ठामपणे ते सर्वेसर्वा मला मानतात
निर्वाणाच्या क्षणातही ते मलाच स्मरतात ३०

इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः

अशा प्रकारे येथे श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
ज्ञानविज्ञानयोग नावाचा सातवा अध्याय पूर्ण झाला

Avatar
About मुकुंद कर्णिक 31 Articles
मी स्थापत्य अभियांत्रिकी शास्त्रातील पदवीधारक असून जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी भारताबाहेर आखाती प्रदेशात आलो तेव्हापासून इथेच वास्तव्याला आहे. इथल्या तीन कंपन्यांमध्ये काम करून २०११ मध्ये सेवानिवृत्त झालो. गद्य, पद्य या दोन्ही प्रकारात मी लेखन करतो. एक छापील पुस्तक (लघु कादंबरी) प्रकाशित झाली आहे. त्याशिवाय एक कथासंग्रह आणि एक कवितासंग्रह ई-पुस्तक स्वरूपात प्रसिध्द झाले आहेत. माझ्या स्वतःच्या तीन ब्लॉग्जमधून तसेच इतरही ब्लॉग्जमधून लेखन सुरू आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..