नवीन लेखन...

‘श्रीं’चे सदगुण

अनंतचतुर्दशी मावळली. घरोघरीच्या गजाननाच्या मातीच्या मूर्ती आता विसर्जित झाल्या आहेत. हळूहळू वातावरणातला जल्लोष मावळेल. परततानाची रिकामी तबकं पाहून डोळे किंचित भरून येतील. दरवर्षी हे सारं असंच होतं.

दरवर्षी गणेश चतुर्थीला नवा उत्साह – अनंत चतुर्दशीला नवी हुरहूर !

हे दहा दिवस गजाननाचं ध्यान करण्याचे. जिकडे नजर पडेल तिकडे

त्याचं सगुण रूप या दिवसात समोर उभं असतं. सगुण रूपाची उपासना करायची, ती त्यातल्या निर्गुण ब्रह्माची प्रचीती येण्यासाठी. पण हे झालं अध्यात्माच्या दृष्टीनं. इतक्या सूक्ष्मात न जाता वरवर साधा विचार केला तर असं म्हणता येईल की, त्या त्या देवतेच्या मूर्तीची पूजा करायची ते तिचं चरित्र आठवण्याकरिता.

त्या देवतेचे सद्गुण आपल्यात यावेत यासाठी. राम, कृष्ण यांच्या मूर्ती पाहिल्या की त्यांचं चरित्र डोळ्यासमोर येतं. कुठल्या प्रसंगी या व्यक्ति कशा वागल्या नि त्यामुळं देवत्वाला पोचल्या हा विचार मनात येतो. गजाननाची मूर्ती हेच त्याच्या सद्गुणांचे प्रतिक आहे. त्याचा एकेक अवयव, त्याच्या एकेका गुणाचं प्रतिक आहे.

गणपती’ म्हणजे ॐ कारस्वरूप परब्रह्म. त्याच्या या रूपाचं वर्णन अथर्वशीर्षात आलं आहे. पण आपण एवढ्या खोलात न शिरता समाजमनातली गजाननाची प्रतिमा पाहिली तर असं म्हणता येईल की, ‘गजानन’ हा विद्येचा देव म्हणजे विद्यार्थ्यांचा बालकुमारांचा देव. म्हणूनच त्याचं हत्तीचं मस्तक त्याच्या प्रचंड बुद्धिमत्तेचं प्रतिक आहे. ही बुद्धिमत्ता दोन गोष्टींनी येते. त्यातली एक म्हणजे बहुश्रुतता.

पूर्वी ‘ज्ञान’ हे पुस्तक वाचून नव्हे तर ज्ञानवृद्ध, बयोवृद्धांकडून ऐकून मिळवलं जायचं. म्हणून ज्ञानी व्यक्तीला ‘बहुश्रुत’ म्हणत. या बहुश्रुततेचं प्रतिक त्याचे हे मोठे कान ! आज ‘वाचन’ हे ज्ञानाचं माध्यम आहे. म्हणून बुद्धिमान व्हायचं तर खूप वाचन हवं. पण वाचन पुरेसं नाही. वाचनाइतकंच आजही ऐकणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच विचारवंतांनी आपलं आयुष्य चिंतन-मनन यात घालवून जे मिळवलेलं

असतं ते अनेक पुस्तकाचं सार असतं. एवढंच कशाला कधीकधी साध्या, सामान्य माणसानंही आयुष्याची वाट चालताना काही मिळवलेलं असतं. हे अनुभवाचे बोल आपल्या वाटेवर दिवे होऊन तेवतात. आजचा तरुणवर्ग वाचणं आणि ऐकणं या गोष्टी खरंच गंभीरपणे करतो का? जे वाचलं जातं, ते खरंच ‘सकस’ असतं का? आणि ‘ऐकणं’ ही गोष्ट तर आणखीनच दुर्मिळ होत आहे. मुळात घरातले संवाद संपले, मोठ्यांचं बोलणंच संपलं तर लहानाचं ऐकणं संपलं यात नवल नाही. त्यामुळे बहुश्रुतपणाचा गुण कमी होत आहे.

गजाननाचे अत्यंत लहान डोळे हे त्याच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीचे प्रतिक आहेत. बुद्धिमत्तेसाठी आवश्यक असणारी ही दुसरी गोष्ट, पूर्वी अध्ययन पूर्ण झाल्यानंतर विद्याथ्र्यनि तीर्थयात्रा कराव्यात हा नियम होता. त्यामुळे देशोदेशींच्या लोकजीवनाचं, समाजरीतीरिवाजांचं निरीक्षण करता येई. त्यामधूनही ज्ञान मिळे.

आज आजूबाजूला पाहणं आपण विसरत आहोत.

कान आणि डोळे उघडे असले तरी गणपतीचं तोंड सोंडेंनं झाकलेलं असतं.

यातून मितभाषीपणा सुचवला आहे. खरी ज्ञानी व्यक्ति कमी, योग्य तेवढंच बोलत असते.गणपती हा एकच देव असा आहे की, ज्याच्या हातात मोदक आहे. खाद्यपदार्थ हातात असलेला हा एकच देव. हा बालकुमारांचा देव असल्यामुळे या वयात भरपूर पौष्टिक पदार्थ खाऊन शरीरसंपदाही कमावली पाहिजे असंच जणू त्याला सुचवायचं असतं. त्याचं मोठं पोट त्याची क्षमाशीलता दाखवतं. अपराध पोटात घालण्याची त्याची वृत्ति आणि अपार माया याचंच ते प्रतीक आहे. उंदीर हा सतत काहीतरी कुरतडणारा प्राणी. आपल्या जीवनात संशय

असाच आपल्याला कुरतडत असतो. त्या संशयावर गजाननानं मात केली आहे. त्याला आपल्या ताब्यात आणलं आहे.ॐ ‘कारातला ‘म’कार हा क्रियाशीलतेचे रूप आहे. ॐकार उच्चारताना जे ‘म’कार अधिक लांबवतात, ते सतत क्रियाशील असतात तर अ आणि

उ चा उच्चार करणारे तत्त्वचिंतनात मग्न राहतात. म्हणूनच गणपतीचं अधिष्ठान असेल, तिथे सतत काही ना काही क्रिया, चळवळ, उपक्रम घडतच राहतात. ही क्रियाशीलता व्यक्त करण्याचाच मार्ग लेझीम, ढोल वाजवत काढल्या जाणाऱ्या मिरवणुका, नृत्य, गायन हाही आहे.

गजाननाची मूर्ती पाहताना हे सारे सद्गुण आठवले पाहिजेत आणि ते आपल्यात यावेत यासाठी प्रयत्नही करायला हवेत. मूर्तीवर हळद-कुंकू टाकणं, ती फुलांनी सजवणं, तिला स्नान घालणं नि नैवेद्य दाखवणं हे सारे बाह्योपचार आहेत. आपलं लक्ष त्या देवतेकडे केंद्रित करण्यासाठी ते महत्त्वाचे आहेत. पण वर्षानुवर्ष फक्त मूर्ती पूजत राहिलं नि आपल्यात काहीच बदल झाला नाही तर उपयोग काय? कारण शेवटी संस्कृती म्हणजे विकास, प्रगल्भता. ही संस्कृती आपल्या अंगी येणार नसेल तर सांस्कृतिक उपक्रम कशाला म्हणायचं?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..