नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच आपले बालगंधर्व यांचा जन्म नागठाणे सांगली येथे २६ जून १८८८ रोजी झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात हुबेहुब रंगवलेल्या स्त्री भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारावर ही त्यांचं प्रभुत्व होतं.
भास्करबुवा बखले यांचे शिष्य बालगंधर्व हे मास्तर कृष्णराव यांचे गुरुबंधू होत. कारकिर्दीच्या चढत्या काळात त्यांचं गाणं ऐकून दस्तुरखुद्द बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळकांनी त्यांना ‘बालगंधर्व’ ही पदवी बहाल केली व पुढे ते त्याच नावाने जास्त प्रसिद्ध झाले.
बालगंधर्वांनी आपली रंगभूमीवरील कारकीर्द ‘किर्लोस्कर संगीत मंडळी’ या नाट्यसंस्थेत इसवी सन १९०५ साली प्रारंभिली. संस्था मुजुमदार व नानासाहेब जोगळेकर एकत्र चालवत असत परंतु १९११ साली नानासाहेब जोगळेकर यांचा देहावसान झालं व वादंग निर्माण झाल्यामुळे बालगंधर्वांनी ती नाट्यसंस्था सोडली. नंतर त्यांनी ‘गणेश गोविंद’ म्हणजेच गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्यासह एकत्र मिळून १९१३ साली गंधर्व संगीत मंडळ संस्था स्थापन केली. मात्र १९२१ मध्ये कर्जात सापडलेल्या या संस्थेचे नारायणराव हे एकमेव मालक होते. हे कर्ज त्यांनी त्यांच्या नाटकातून मिळालेल्या कारकीर्दितून सहा ते सात वर्षात पूर्ण फेडले. पुढे त्यांनी ही संस्था बंद केली. कालांतराने बालगंधर्वांनी प्रभात फिल्म कंपनीच्या धर्मात्मा नामक चित्रपटात संत एकनाथांची भूमिकाही केली. बालगंधर्वानी आपल्या भूमिका साकारून संगीत नाटक, नाट्यसंगीत यांसारखे कलाप्रकार महाराष्ट्रात मध्यमवर्गीयांमध्ये प्रचलित केले.
अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, वसंत शांताराम देसाई यांच्यासारख्या अनेक सुप्रसिद्ध नाटककारांनी लिहिलेली विविध संगीत नाटके बालगंधर्वांनी केली. परंतु १९०१ मध्ये श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या देहावसनानंतर मराठी संगीत नाट्य परंपरेला उतरती कळा लागली अशा वेळेस बालगंधर्वांनी संगीत नाट्य परंपरेला जिवंत ठेवत संपूर्ण महाराष्ट्रात या परंपरेत मोलाची भर घालत ती पुढे नेण्याचे महत्त्वाचं कार्य केलं. १९२९ साली झालेल्या २४ व्या मराठी नाट्य संमेलनाचे बालगंधर्व हे अध्यक्ष होते.
बालगंधर्वानी त्यांच्या कारकीर्दीच्या काळात अनेक संगीत नाटकातून भूमिका वठवल्या. त्यांच्या अनेक संगीत नाटकं पैकी काही संगीत नाटकांची सूची खालील प्रमाणे:
१) संगीत सौभद्र २) संगीत मृच्छकटिक ३) संगीत शाकुंतल ४) संगीत मानापमान ५) संगीत संशय कल्लोळ ६) संगीत शारदा ७)संगीत मूकनायक ८) संगीत स्वयंवर ९) संगीत विद्याहरण १०) संगीत एकच प्याला ११) संगीत कान्होपात्रा.
बालगंधर्वांनी संगीत शाकुंतल नाटकात ‘शकुंतला’ व संगीत मानापमान नाटकात ‘भामिनी’ या भूमिका साकारल्या होत्या आणि याच भूमिकांमुळे त्यांचं एक प्रतिभावंत कलाकार म्हणून सर्वत्र नाव झालं.बालगंधर्वांनी स्वयंवर या नाटकात रुक्मिणीची भूमिका, संगीत शारदा या नाटकात शारदेची भूमिका, मृच्छकटिक या नाटकात वसंत सेनेची भूमिका साकारली होती. १९५५ मध्ये त्यांनी एकच प्याला नाटकात साकार केलेली ‘सिंधू’ ही त्यांची शेवटची भूमिका ठरली. त्यानंतर त्यांनी रंगभूमीवरून निवृत्ती घेतली.
१९५५ मध्ये संगीत क्षेत्रात सर्वोच्च समजला जाणारा संगीत अकादमी पुरस्कार बालगंधर्वांना मिळाला. १९६४ मध्ये बालगंधर्वांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला.
बालगंधर्वांची चरित्र पुस्तकं खालील प्रमाणे आहेत.
१) बालगंधर्व द नॉनपॅरेल थेस्पियन (मोहन नाडकर्णी, इंग्लिश भाषा) २) असा बालगंधर्व (कादंबरी, लेखक अभिराम भडकमकर) (या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ह. ना. आपटे हा पुरस्कार मिळाला आहे) ३) बालगंधर्व अॅंड दी मराठी थिएटर (लेखक: ज्ञानेश्वर नाडकर्णी, इंग्रजी भाषा)
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर हे नाट्यगृह सुद्धा आजच्या तारखेला १९६८ मध्ये सर्वांसाठी खुलं करण्यात आलं. या नाट्यगृहाचे वास्तुसाठी झालेला भूमिपूजन हे बालगंधर्वांच्या हस्ते करण्यात आलं होतं. जी वास्तू उभारण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांची मोलाची साथ लाभली या वास्तूचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक नाटककार आचार्य अत्रे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं.
बालगंधर्वांचा कारकीर्दीचा काळ हा साधारणत: १९०५ ते १९५५ इतका होता. १९०५ च्या काळात स्त्रियांना रंगभूमीवर काम करण्यास मनाई असल्याने बालगंधर्वांनीच स्त्रियांच्या भूमिका साकारून संपूर्ण रसिक प्रेक्षकांच्या मनावर जादू केली.
अशा या दिग्गज कलाकारास आपल्या समूहातर्फे जन्मदिनाचे औचित्य साधून मानाचा मुजरा.
– आदित्य दि. संभूस.
Leave a Reply