कायस्थ प्रभू समाजाच्या कायस्थ वैभव मधून
आपली भारतभूमी ही साधुसंतांच्या वास्तव्याने पावन झालेली मंगलभूमी आहे. ईश्वरी साक्षात्कार हेच सर्वोच्च मूल्य मानून त्याच्या प्राप्तीसाठी ज्यांनी आपले संपूर्ण जीवन वाहिले अशा हजारो सत्पुरुषांची ही कर्मभूमी आहे.
जगाच्या कल्याणासाठी ज्यांनी देह कष्टविले, जननिंदा सोसली, उपेक्षा सहन केली परंतु परोपकाराचा मार्ग सोडला नाही अशा ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, रामदास अशा एकापेक्षा एक ज्येष्ठ व श्रेष्ठ विभूतींचा हा देश आहे. जे जे भेटले भूत । ते ते जाणिले भगवंत अशी त्यांची भावना असते. भेटणाऱ्यांच्यातील दोष, अमंगळ दूर करुन त्यांना शुध्द करुन, निर्मळ करुन परमार्थाला लावतात. स्वतः उद्धरुन दुसऱ्यांचा उद्धार करतात. जे जे आपणांसी ठावे ते ते इतरांना शिकवून जगाला शहाणे करण्याचे कार्य ते करीत असतात.
अशा या थोर महात्म्यांची परंपरा आपल्या चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाजालाही लाभली आहे. अशाच एका परंतु प्रसिध्दीपराडःमुख योगी पुरुषाची ओळख या लेखात करुन देत आहे. या योग्याचे नाव आहे प.पू. देवेंद्रनाथ उर्फ विजयकुमार सखाराम सुळे.
परमपूज्य देवेंद्रनाथ हे आधुनिक काळात होऊन गेलेले उच्चविद्याविभूषित नाथपंथीय महायोगी होते. त्यांचा जन्म १६ जून १९३७ रोजी पेण, जि. रायगड येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणापासून अनेक हालअपेष्टा सहन करीत त्यांनी मुंबईमधील जे. जे. स्कूल ऑफ आर्टस मधून स्थापत्यशास्त्राची पदवी (आर्किटेक्ट) मिळवली.
शिक्षणानंतर त्यांनी नोकरी व व्यवसाय सुरु केले. मे १९६९ मध्ये त्यांचा विवाह भारती आंबेगावकर (बडोदे) यांच्याशी झाला. त्यांना राजश्री व निलेश ही दोन मुले आहेत.
नोकरी करीत असताना त्यांचा संबंध डॉ. मुखर्जी या योगी अरविंदांच्या शिष्याबरोबर आला व त्यांचे मन अध्यात्माकडे ओढले जाऊ लागले. योगी मुखर्जीनी सांगितल्याप्रमाणे ते नित्य शिव-उपासना करीत असत.
दक्षिण भारतीय कर्नाटकमधील मंत्रालयम येथील सद्गुरू टी. राघवेन्द्र स्वामींचा अनुग्रह त्यांना लाभला. स्वामी राघवेन्द्रांची अखंड उपासना करुन त्यांच्याकडून गुरूदिक्षा घेतली. मंत्रालयम येथील गुरुंच्या संजीवन सामाधीतील मृत्तिका मंत्रालयमपासून अहमदनगर जिल्ह्यातील बेहेरवाडी येथे साडेसातशे कि.मी. आपल्या चाळीस शिष्यांबरोबर पायी अनवाणी चालत अकरा दिवसांत आणून त्यांची विधीवत स्थापना केली व आपले पूर्ण जीवन नाथकार्यासाठी समर्पित करण्याचे ठरविले. नाथ संप्रदायाच्या अतिशय दुर्मिळ इतिहासाचा संपूर्ण भारतभर फिरून त्यांनी सखोल अभ्यास केला व १९७५ साली श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते अलख निरंजन या वार्षिकाचे प्रकाशन करुन या संप्रदायाचा प्रसार सुरु केला. व या अंकाच्या माध्यमातून नाथ संप्रदाय आधुनिक जगापुढे ठेवला.
कानिफनाथांनी त्यांना दृष्टांत देवून हे नाथपंथीय कार्य त्यांच्या समाधीस्थळी मढी येथे करण्याचा आदेश दिला. व त्याप्रमाणे देवेंद्रनाथांनी नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी या क्षेत्री आपले नाथकार्य सुरु केले.
साधकांसाठी साधना, साधनेतून जीवब्रह्म सेवा व जीवब्रह्म सेवेतून आत्मउद्धार या त्रीसूत्रीवरच नाथ संप्रदायाचा पाया रचलेला आहे. म्हणूनच त्यांनी मढी येथे वैदिकपूजा, जीवब्रह्मसेवा व हठयोग शिबिरे सुरु केली.
हठयोगाद्वारे व जीवब्रह्मसेवेद्वारे त्यांनी मढी येथे अनेक रोग्यांवर योगिक उपचार करुन त्यांना व्याधीमुक्त केले. निरनिराळ्या राज्यामधून भाविक व व्याधीग्रस्त नाथपंथीय योगिक प्रक्रियेद्वारे उपचार करुन घेण्यासाठी दर अमावस्येला मढी येथे गर्दी करु लागले. दिवसेंदिवस मढीला यात्रेचे स्वरुप येऊ लागले. देवेंद्रनाथांच्या नाथकार्याचा प्रचार व प्रसार हळूहळू सर्वत्र पसरू लागला. अनेक व्याधीमुक्तांचे अनुभव अलख-निरंजन या अंकात येऊ लागले. देवेंद्रनाथांच्या आशीर्वादाची दिव्य अनुभूती आजही आपल्याला अलख-निरं जनमध्ये वाचावयास मिळते. शिवयागासारखा महान यज्ञ त्यांनी मढी येथे केला. या यज्ञासाठी नेपाळ नरेशांचे पुरोहित स्वामी नरहरी महाराज यांनी पौरोहित्य केले. १९८१ मध्ये नेपाळ येथ झालेल्या विश्व हिंदू परिषदेमध्ये त्यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. नाथ कार्याबरोबरच तेथील गोर-गरीब जनतेच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठीही त्यांनी अनेक कामे केली. श्री. कानिफनाथ पेपर मिल हे त्यांच्याच प्रयत्नांचे उदाहरण.
देवेंद्रनाथांनी निरनिराळ्या ठिकाणी हठयोगी शिबिरे घेतली. शाळा-कॉलेजेसमधून नाथसंप्रदायावर प्रवचने दिली. बघता-बघता प्रवचने, शिबिरे यांच्या माध्यमातून शेकडो शिष्य, साधक, सेवाभावी लोकांचा संप्रदाय निर्माण झाला व त्यांनी नवनाथ देवस्थान सेवा मंडळ, ट्रस्ट स्थापन केला. शैव वैष्णव व शाक्त अशा तीनही उपासना नाथपंथामध्ये असून पूज्य देवेंद्रनाथांनी देह ठेवेपर्यंत अखंडपणे गुरूसेवा व इशसेवा केली. अल्पावधीतच देवेंद्रनाथांची किर्ती सर्वत्र पसरु लागली. अहोरात्र जनसेवेचा ध्यास नाथकार्याचा प्रचार व प्रसार जीवब्रम्हसेवा ह्या सर्वांसाठी स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे २ मे १९८२ रोजी आपल्या कार्यक्षेत्री मढी येथे समाधी घेतली. मढी येथील कानिफनाथांच्या समाधीसमोरच मयुर टेकडीवर त्यांचे समाधी मंदिर त्यांच्या भक्तांनी बांधले आहे.
प. पू. देवेंद्रनाथांनी दिलेल्या आदेशानुसार आजही दर अमावस्येला मढी, कळवा (ठाणे), पाथर्डी, श्रीरामपूर, बोल्हेगाव, संगमनेर, कोपरगाव इ. ठिकाणी जीवब्रह्मसेवा नित्यनेमाने चालू आहेत. महाराजांच्या दिव्यत्वाची व आशीर्वादाची अनुभूती हजारो जण घेत आहेत. अशा या महान नाथपंथी विभूतीला माझे कोटी कोटी प्रणाम.
। अलख निरंजन । जय आदेश ।
– श्री. मकरंद भालचंद्र सुळे, अलिबाग
Leave a Reply