श्री गणेश सेंट्रल एशिया (मध्य आशिया)
सेंट्रल एशिया (मध्य आशिया) म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या खोतान पासून ७५ मैलावरील खाड्लीकार गावी ब्राझाक्लिक चर्चमध्ये १२.४ से.मी. x २५.५ से.मी. आकाराची दोन चित्रे आहेत. त्यातील हे एक गणेश-मूर्तीचे होय. हे ८ व्या शतकातील असून बर्लिन येथील संग्रहालयात (मुझियम) आहे.
ह्या मूर्तीच्या एका बाजूस चर्चच्या उत्सवाच्या सोहळ्याचे चित्र-चित्रित केलेले आढळते. गणेशाकडे पाहणारे दोन इराणीय घर्म प्रचारक, धर्म-प्रचारकांच्या पूर्ण वेषात आढळतात. श्री गणेशा समवेत वराह-रुपात भगवान श्री विष्णू, श्री ब्रम्हदेव व मागे भगवान श्री महादेव ह्या हिंदू देवतांची चित्रेही स्पष्ट दिसतात. एकूण चित्रांकित केलेल्या मूर्तीकडे पाहून सर्व धर्म समभावाचे प्रतिक असलेली मूर्ती असेच म्हणावे लागेल. तपकिरी किनार असलेले, फिकट हिरव्या रंगाने रंगविलेले हे चित्र अर्धवट फाटलेले आहे.
मागे तक्या (टेकण्यासाठी) असलेल्या आसनावर विराजमान झालेला श्री गणेश कवाली गाण्यासाठी बसलेल्या स्थितीत बसलेला आढळतो. डोक्यावरचा मुकुट चर्चच्या धर्मगुरूच्या डोक्यावरील मुकुटासारखा तीन पाकळ्यांचा आढळतो. मुकुटामधून आलेले केस कपाळावर दिसतात. डोक्याच्या मागील बाजूस इराण-अरब पद्धतीचा फेटा बांधलेला आढळतो. नील वर्णीय डोळे, दोन सरळ सुळे, मोठी सोंड, खांद्यापर्यंत लोंबणारे कान, हिरवे जरीकाठी पितांबर त्यावर उपरणे, उपरण्यावर पांढरा पट्टा, गळ्यात वेगळ्या पद्धतीचा मोत्यांचा हार, दंडात दागिने अतिशय सौंदर्यानी युक्त अशा सजलेल्या नटलेल्या, मूर्तीचे दर्शन आपणास घडते. दोन वरदहस्त असलेल्या गणेशाच्या एका हातात मोदक व एक हात मांडीवर आढळतो. ह्या देवतेच्या मागे प्रभावळही असलेली दिसून येते. ह्या विलोभनीय चित्राचे दर्शन घेत असताना कमरे खालील पायाचा भाग शरीराच्या मनाने कृश वाटतो पण या बद्दलचा उल्लेख मात्र कुठेही आढळत नाही. अशा या श्रीगणेशाला शतश: अभिवंदन.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply