नवीन लेखन...

श्री क्षेत्र करवीर (कोल्हापूर)

कोलापुरं महास्थानं यत्र लक्ष्मी सदास्थिता।
मातुःपुरं द्वितीयं च रेणुकाधिष्ठितं परम् ।
तुळजापुरं तृतीयं स्यात सप्तशृंगं तथैव च ।।

देवी भागवतात उल्लेखिल्याप्रमाणे कोल्हापूरची महालक्ष्मी हे पूर्णपीठ असून अत्यंत प्राचीन शक्तिपीठ आहे. याला १०८ कल्पे झाली असे पुराणाचे मत आहे. कोल्हापुरला दक्षिणकाशी असे गौरवाने म्हटले जाते. येथे सतीचे तिन्ही नेत्र पडले म्हणून या ठिकाणाला शक्तिपीठाचे महात्म्य प्राप्त झाले. पद्मपुराण, स्कंदपुराण, मार्कंडेयपुराण, देवीभागवत इ. ग्रंथात या क्षेत्राचे उल्लेख आलेले आहेत. उत्तरेस काशी आणि दक्षिणेस करवीर अशी दोन क्षेत्रे मनुष्यांना संसारतापापासून मुक्त होण्याकरिता महाविष्णूने निर्माण केली आहेत, असे पुराणात म्हटले आहे. “वाराणस्यधिकं क्षेत्रं करवीरपुरं महत्’ या वचनानुसार करवीर क्षेत्र वाराणसीपेक्षा (काशी) श्रेष्ठ आहे. कारण काशी क्षेत्र मुक्ती देते परंतु करवीरक्षेत्र हे भुक्ती व मुक्ती दोन्ही देणारे आहे.

‘करवीरं विरुपाक्षं श्रीशैलं पांडुरंगकम् । श्रीरंग सेतुबंधश्च भुक्तिमुक्ति प्रदानिषट्।

करवीर क्षेत्राला करवीर, कोल्हापूर, करवीरपट्टर, पद्मावती, क्षुल्लकपूर अशी अनेक नावे आहेत. या प्रातांत पूर्वी कोल व चोल या कोळी जमातीची वस्ती होती. कौलासुर’ व त्याचा पुत्र ‘करवीर’ या राक्षसांना मुख्य नगरीच्या पूर्वेकडील त्र्यंबुली टेकडीवर महालक्ष्मीने ठार मारले. या राक्षसांच्या नावावरून करवीर हे नाव पडले असे म्हणतात. पद्मपुराणात तर असेही म्हटले आहे की, १०८ कल्पांचे हे क्षेत्र ‘महामातृक’ नावाने प्रसिद्ध असून भगवान श्रीविष्णू लक्ष्मीरूपाने येथे राहिले आहेत. आठ दिशांना आठ शिवलिंगे असून शेषशायी चारही महाद्वारांचे रक्षण करतात.

श्रीमहालक्ष्मीचे मंदिर कोल्हापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती आहे. मंदिर हेमाडपंथी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिर अत्यंत भव्य व सुबक असून बांधकामासाठी चुना वापरलेला नाही. मुख्य मंदिरासाठी निळसर काळे दगड वापरलेले असून ते अत्यंत घोटीव, गुळगुळीत आहे. मंदिर बाहेरून तारांकित आहे. मंदिराला पाच शिखरे असून मंदिर पाहताच क्षणी पाहणारा मंत्रमुग्ध होतो. मंदिराचा प्रकार अत्यंत विस्तृत असून पश्चिमाभिमुख आहे. मंदिराच्या चारी दिशांना प्रवेश दरवाजे असून पश्चिम प्रवेशद्वाराला महाद्वार’ असे म्हणतात. महाद्वारातून प्रवेश केल्यावर प्रथम गरुड मंडप व नंतर गणेश मंडप लागतो. पुढे श्रीमहालक्ष्मी मंदिर आहे. उजव्या हाताला महासरस्वतीचे मंदिर व डाव्या बाजूला महाकालिचे मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीमहालक्ष्मीची मूर्ती दगडी चबुतऱ्यावर उभी आहे. मूर्ती काळ्या रत्नशिलेपासून बनविलेली असून अत्यंत आकर्षक व नयनमनोहर आहे. स्कंदपुराणात मूर्तीचे स्वरूप पुढीलप्रमाणे वर्णिले आहे.

मातुलिंगं गदा खेटं पानपात्रं च ब्रिभती।
नागंलिंगं च योनी ब्रिभती नृप मूर्धनि ।।

चतुर्भुज मूर्तीच्या उजव्या हातात गदा व डाव्या हातात खेटक (ढाल) आहे. खालच्या उजव्या हातात मातुलिंग व डाव्या हातात पानपात्र आहे. श्रीमहालक्ष्मीची प्रतिदिनी त्रिकालपूजा, अभिषेक, महानैवेद्य अत्यंत काटेकोरपणे पार पाडल्या जातात. पहाटे बरोबर चार वाजता काकड आरतीसाठी घंटानाद होतो. भूपाळ्या, पदे, स्तोत्रे सहित काकडआरतीचा कार्यक्रम सकाळी ६ वाजेपर्यंत चालतो. नंतर सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत मुख्य पूजा होते. देवीला पंचामृती स्नान अभिषेक असतो. त्यानंतर ११ ।। च्या सुमारास महानैवेद्य असतो. या वेळी माध्यान्हपूजा असते. देवीचे उपवास वगळता अन्य वेळी महानैवेद्यात पुरणपोळी असतेच. दुपारी १ || च्या सुमारास देवीची अत्यंत आकर्षक अलंकारपूजा केली जाते. रात्री ८ वाजता सायंआरती व नंतर धुपारती होते. ठीक १० वाजता शेजारतीची घंटा होते. असा देवीपूजेचा नित्यक्रम काटेकोर पार पडतो.

शुक्रवार हा देवीचा उपवास दिन असतो. या दिवशी पुरणाचा महानैवेद्य संध्या. ७ वा. दाखवितात. दर शुक्रवारी रात्री श्रीदेवीची पालखी निघते. याशिवाय चैत्र वद्य प्रतिपदा (रथोत्सव), अक्षय तृतीया (आनंदोत्सव), आश्विन नवरात्रौत्सव, किरणोत्सव हे मुख्य नैमित्तिक उत्सव आहेत.

याशिवाय कोल्हापुरनगरीत अनेक लहानमोठी मंदिरे आहेत. कोल्हापूर गॅझेटीअर नुसार येथे सुमारे २५० मंदिरे आहेत.भगवान श्रीदत्तात्रेयांच्या नित्यफेरीतही कोल्हापुरला महत्त्वाचे स्थान आहे. येथे रोज दु.१२ वाजता भगवान श्रीदत्तात्रेय भिक्षेसाठी येतात असे मानले जाते. याशिवाय येथील रंकाळा तलाव हेही पर्यटकांचे आकर्षण आहे. कोल्हापूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध शहर असून बस, रेल्वेची सुविधा आहे. अशा या शुभदा, वरदा, सकलसौख्यदायिनी. जगन्माता करवीर-निवासिनी अंबामातेचे दर्शन घेऊन भाविकांनी आपले जीवन कृतकृत्य करून घ्यावे!

-सौ. मंजिरी कुलकर्णी

(‘संतकृपा’ या नियतकालिकात प्रकाशित झालेला लेख)

1 Comment on श्री क्षेत्र करवीर (कोल्हापूर)

  1. माझ्या कोल्हापुराची आणि महालक्ष्मी अंबाबाईची महती वाचून आनंद झाला आणि प्रसन्नता जाणवली. खूप छान वाटले.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..