(व्यास क्रिएशन्सच्या प्रतिभा दिपोत्सव २०१६ – विघ्नहरी भालचंद्र देव ह्यांनी लिहिलेला हा लेख)
मोरया आता गोसावी झाले. गो म्हणजे इन्द्रिये; त्यावर ताबा मिळवणारे गोस्वामी म्हणजे जितेंद्रिय योगी. त्यांना अष्टमहासिद्धी प्राप्त झाल्या. मोरगावला परतल्यावर त्यांचा दबदबा फार वाढला. अष्टौप्रहर लोक त्यांच्याकडे येऊ लागले. रंजल्या, गांजल्यांच्या अडीअडचणी दूर करताना त्यांना दिवसाचे चोवस तास पुरेनासे झाले. शेवटी वैतागून त्यांनी मोरगाव सोडले.
चिंचवड पांढर केव्हा वसली. हे इतिहासाला माहीत नाही; पण इ. स. १२१२ चे एक पत्र भदे यांच्याकडे उपलब्ध आहे. चिंचवडच्या देवाची पूजा करण्याचे काम भदे गुरवाकडे होते, त्याची नक्कल झाली म्हणून त्याचा एक भाऊबंद लक्ष्मण भदे याला शोधून चिंचवडला आणले आणि पूजेचे काम त्याला वंशपरंपरा लावून दिले. पण चिंचा-वडांच्या चिंचवडला खरे महत्त्व आले, ते श्रीमोरया गोसावींच्या मुळे. १६१६, १६१९, १६२० साली मलिकंबरने मोरया गोसाव्यांना मोरगाव, कुंभारवळण, चिंचोली या ठिकाणच्या जमिनी दिल्या; पण त्यावेळी मोरया गोसावी चिंचोलीला रहात असावेत, कारण सनदांत त्यांचा उल्लेख ‘सेकिन (राहणारे) चिंचोली’ असा आहे. १६२६, १६२७, १६२८ या काळात मात्र मोरया गोसावी नक्कीच चिंचवडला राहत होते; कारण त्या पत्रातून ‘सेकिन चिंचवड’ असा स्पष्ट उल्लेख आहे.
मलिकंबर, आदिलशाही, निजामशाही, शहाजीराजे भोसले यांच्या पत्रांचा आणि चिंचवडच्या मोरया गोसावी समाधि-मंदिरावरील शिलालेखाचा अभ्यास केला, तर असे वाटते की १६५७च्या सुमारास मोरया गोसावींनी संजीवन समाधी घेतली असावी. थोरल्या महाराजांची चिंतामणि समाधी १६९० च्या आसपास असेल. कर्नाटकात बिदर जिल्ह्यात शालि किंवा शालिग्राम असे गाव आहे. तेथे मोरया गोसावींचे पूर्वज शालिग्राम देशस्थ ऋग्वेदी हरितसगोत्री राहत होते. मोरया गोसावींच्या पूर्वी सात पिढ्या ते देशावर आले, असे काही अभ्यासकांचे मत आहे. तर काही असे म्हणतात की मोरया गोसावींचे वडील वामनभट शाळिग्राम पत्नी पार्वतीबाई बरोबर शाळिग्राम सोडून निघाले. संतान नाही, म्हणून दोघे उदास झाले होते. तीर्थयात्रा करीत ते मोरगावला पोचले, त्यांनी मोरयाची तपश्चर्या केली, मोरया प्रसन्न होऊन त्यांच्या पोटी आला, त्याचे नाव त्यांनी मोरया ठेवले. मोरयाला नयन भारती गोसावी नावाचे गुरू भेटले. त्यांनी मोरयाला अनुग्रह दिला, खडावा, पताका आणि कफनी देऊन थेऊरला तपश्चर्या करायला सांगितले. थेऊरला मुळामुठेच्या काठी मोरयाने बेचाळीस दिवस अनुष्ठान केले. साधनेच्या काळात एक वाघ त्यांच्यावर धावून आला. मोरयाला तो खाऊ शकला नाही. त्याची शिळा झाली. आजही थेऊरला नदीकाठी मोरयाच्या तपश्चर्येची हकीकत सांगायला ती शिळा हजर आहे. मोरयाला चिंतामणी प्रसन्न झाला. तुझा मुलगा म्हणून मी जन्म घेईन असे त्याने सांगितले.
मोरया आता गोसावी झाले. गो म्हणजे इन्द्रिये; त्यावर ताबा मिळवणारे गोस्वामी म्हणजे जितेंद्रिय योगी. त्यांना अष्टमहासिद्धी प्राप्त झाल्या. मोरगावला परतल्यावर त्यांचा दबदबा फार वाढला. अष्टौप्रहर लोक त्यांच्याकडे येऊ लागले. रंजल्या, गांजल्यांच्या अडीअडचणी दूर करताना त्यांना दिवसाचे चोवीस तास पुरेनासे झाले. शेवटी वैतागून त्यांनी मोरगाव सोडले. चिंचवडला पवनेच्या पलिकडे किबजाईच्या जंगलात ते साधना करू लागले. चिंचवडकरांनी त्यांना गावात आणले. सध्याचा मंगलमूर्ती-वाडा आहे. त्या ठिकाणी त्यांना झोपडी बांधून दिली.
पुनवळ्याच्या पाटलाला मोरया गोसावींच्या कृपेने मुलगा झाला. थेरगावच्या पवारांच्या आंधळ्या मुलीला दृष्टी प्राप्त झाली. बॉम्बे गॅझेटमध्ये असा उल्लेख आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे डोळे मोरया गोसावींनी बरे केले. दर महिन्याच्या विनायकी चतुर्थीला मोरया गोसावी मोरगावला जात. मोरयाची पूजा करत आणि पंचमीला पारणं करून परत येत. एकदा का नदीला फार पाणी होतं. मोरया एका कोळ्याच्या रूपात आला आणि मोरया गोसावींना नदीपार घेऊन गेला. एकदा मोरगावला पोचायला त्यांना फार उशीर झाला. मोरयाचे देऊळ बंद झाले. मोरया गोसावी बाहेर तरटीच्या झाडाखाली भजन करत बसले तर मोरया स्वतः बाहेर आला आणि त्यांच्यापुढे हजर झाला. असाच एकदा उशीर झाला, तर मोरयाच्या देवळाची कुलपे गळून पडली. मोरया गोसावींनी गाभाऱ्यात जाऊन मोरयाची यथासांग पूजा केली. एकदा यात्रेत त्यांना साप चावला, तर सापाचा उद्धार झाला. कात टाकावी तसा सापाचा देह टाकून त्याने दिव्य देह प्राप्त करून घेतला. असे शेकडो चमत्कार घडू लागले. मोरया गोसावी थकले. मोरगावची वारी होईना, तर मोरयाने त्यांना दृष्टांत दिला आणि भाद्रपद चतुर्थीला मोरगावच्या का नदीच्या गणेशकुंडात स्नान करून मोरया गोसावी अर्ध्य देत होते तर मोरया स्वतः मंगलमूर्ति होऊन त्यांच्या हातात आला. आज तो चिंचवडच्या मंगलमूर्ति-वाड्यात विराजमान झाला आहे. भाद्रपद-माघात तो घेऊन चिंचवडचे महाराज मोरगावला जातात.
मोरया गोसावींच्या साधुत्वाचा बोलबाला फार वाढला. चिंचवडला लांब-लांबून भक्त यायला लागले. माही-भादवीच्या वाऱ्यांना मोठा समाज जमू लागला. गोर-गरीब, फकीर-फुकरा, साधू-संन्यासी सगळ्याचा परामर्श मोरया गोसावी घेत. अन्न-सत्र, सदावर्त जोरात चालू झाले. चिंचवडहून कोणी उपाशी जात नसे. निजामशहा, आदिलशहा, शहाजीराजे, छत्रपती शिवाजीमहाराज सगळ्यांनी मोरया गोसावींना जमिनी दिल्या. रोख उत्पन्न दिले.
रावतच्या गोविंदराव कुलकर्ण्यांची मुलगी उमा हिच्याशी मोरया गोसावींचा विवाह झाला. थेऊरचा चिंतामणि उमाबाईंच्या पोटी जन्माला आला. गणेशोपासनेचे व्रत त्याच्या स्वाधीन करून मोरया गोसावींनी मार्गशीर्ष वद्य षष्ठी या दिवशी चिंचवडला जिवंत समाधी घेतली.
चिंतामणि महाराज थोर साधू होते. योगी होते. मोरयाचे साक्षात्कारी भक्त होते. एकदा त्यांच्याकडे समर्थ रामदास स्वामी आणि जगद्गुरु तुकाराम महाराज आले. जेवणाच्या वेळी संतांनी राम-जानकी आणि पांडुरंग-रुक्मीणींना बोलवले. ते आले. चिंतामणि महाराजांनी मोरयाला बोलावले. मोरया आला नाही; पण चिंतामणि महाराज स्वतःच चतुर्भुज मंडित, शुण्डदण्डविभूषित मोरया झाले. तुकाराम महाराजांनी त्यांना देव म्हणायला सुरुवात केली. तेच नाव त्यांच्या वंशाला प्राप्त झाले. वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय या दोघांनाही ही कथा थोड्याफार फरकाने माहीत आहे.
एक दिवस एक मुसलमान सरदार त्यांना बाटविण्यास मद्य-मांस घेऊन आला. याचा नैवेद्य दाखवा म्हणून त्याने आग्रह धरला. चिंतामणि महाराजांनी त्यावर तीर्थ शिंपडलं, तर मद्य-मांसाची दूध आणि फुले झाली. तो त्यांना शरण गेला. त्याच्या बीबीची असाध्य पोटदुखी चिंतामणी महाराजांनी बरी केली.
कृष्णाजी काळभोर यांना चिंतामणि महाराजांच्या कृपेने पुण्याची देशमुखी मिळाली म्हणून चिंचवडची आपली देशमुखी त्यांनी चिंतामणि महाराजांना दिली. यात्रेच्या वाटेवर त्यांना कोणी त्रास देऊ नये असे हुकूम सगळ्या अधिकाऱ्यांना गेले. चिंचवडकर देवांचे महत्त्व सारखे वाढत होते. त्यांचा मुलगा नारायण महाराज. संभाजीचा वध झाल्यावर राजमाता येसूबाईंना नगरच्या किल्ल्यात ठेवले. शाहूला औरंगजेबाने आपल्या बरोबर नेले. काही दिवस येसूबाई साहेबांना तनखा मिळाला. पुढे तो बंद झाला. खर्चाची फार तंगाई झाली. पाच-सात सहस्त्र ब्रह्मस्व झाले. कोणी कर्जही देईना. इंगळास वोळांबे लागले. नारायण महाराजांशिवाय क्लेशपरिहार करेल असा कोणी नव्हता. येसूबाईसाहेबांनी त्यांना पत्र लिहिले आणि ते अगदी स्वाभाविक होते. नारायण महाराजांचा अनुग्रह शिवाजी महाराजांनी घेतला होता. रघुनाथ पंडितांच्या राजव्यवहारकोशात याचा स्पष्ट उल्लेख आहे. संभाजी राजाराम यांची नारायण महाराजांवर श्रद्धा होती. १७०७ साली शाहूमहाराजांची सुटका झाली. ते छत्रपती झाले. त्यांनी चिंचवडला खूपच देणग्या दिल्या.
पेशवे तर गणपतीचे भक्तच होते. माधवराव पेशवे थेऊरला चिंतामणीच्या पायाशी विलीन झाले. त्यांनी अनेक गावे चिंचवडला दिली. जकातीची उत्पन्ने दिली. चिंचवडला येणाऱ्या मालाला जकात माफ केली. शिवाजी महाराजांनी चिंचवडच्या अन्नसत्रासाठी कोकणातून तांदूळ-मीठ इ. सरकारी साठ्यातून द्यायला सुरूवात केली. चिंचवडच्या गावांना कोणी उपद्रव देऊ नये म्हणून सगळ्यांना ताकीद दिली. संभाजी महाराजांनी तर अधिकाऱ्यांना अशी तंबी दिली की जर पुन्हा अशी बदराहो वर्तणूक झाल्याचा बोभाटा आला तर स्वामी जीवेच मारतील. कारण हे राज्य श्रींच्या कृपेचे होते. माधवराव पेशव्यांनी चिंचवडला टांकसाळ दिली होती. ‘खरा माल आणि पुरा तोल’ यामुळे चिंचवडचा अंकुशी रुपया बाजारात प्रतिष्ठा पावला होता.
मोरगावच्या यात्रेला चिंचवडहून महाराज निघाले की पेशवे गणेश खिंडीत सामोरे यायचे. दर्शन घेऊन मोहरा-शालजोड्या अर्पण करायचे. बंदोबस्ताला शिपाई बरोबर द्यायचे. शिधा-सामग्री द्यायचे आणि प्रसाद घेऊन चार पावलं पालखीबरोबर चालून मग आपल्या कामाला लागायचे. शिंदे, होळकर, दाभाडे, आंग्रे सगळ्यांनी चिंचवडला येऊन मंगलमूर्तीचे आणि महाराजांचे आशीर्वाद घेतले. वसईच्या मोहिमेसाठी चिंचवडच्या महाराजांनी नुसताच आग्रह धरला नाही तर दहा हजार रुपये कर्ज सुद्धा पेशव्यांना दिले. म्हणून वसई फत्ते झाल्यावर चिमाजी आप्पा प्रथम चिंचवडला आला. थेऊर, मोरगाव, सिद्धटेक या ठिकाणी मोठ्या घंटा आहेत, त्या चिमाजी आप्पाने वसईच्या मोहिमेत लुटून आणलेल्या आहेत.
चिंचवड पुण्याच्या अगदी जवळ. पुण्याला खूप धामधूम चालू असे. निजामाच्या स्वारीत बराच मुलूख बेचिराख झाला. १८०३ साली यशवंतराव होळकरांनी पुण्याच्या आसपास जाळपोळ केली. पण चिंचवडला कोणी धक्का लावला नाही. नाना फडणीसांनी इंग्रज वकिलाला चिंचवडजवळ थोपवून ठेवले होते. दुसऱ्या बाजीरावाने पेशवाईचा ताबा घेण्यापूर्वी आठ दिवस चिंचवडच्या वाड्यात मुक्काम ठेवला होता. त्यावेळी लॉर्ड वेलस्ली हाही चिंचवडला होता. त्या दोघांचा साक्षात् संपर्क नव्हता. पण बहुधा चिंचवडच्या महाराजांच्या मार्फत त्यांचा संवाद चालू होता. पेशवाई बुडाल्यावर दुसऱ्या बाजीरावाला इंग्रजांनी विठुऱ्याला ठेवले. त्याला भेटण्यासाठी दुसरे धरणीधर महाराज विठुऱ्याला गेले होते. त्या वेळी त्यांनी शिंदे, होळकर, पवार यांच्याही भेटी घेतल्या होत्या.
मोरया गोसावींच्या घरात सात पिढ्यापर्यंत साक्षात् मोरयाचा अंश होता. आठवा पुरुष दत्तक होता. त्यानंतर भाऊबंदकी फार वाढली. कोर्ट कचेऱ्या चालू झाल्या; सावकारी कर्जाचा बोजा वाढला; आणि शेवटी चिंचवडचे पब्लिक ट्रस्ट झाले. जिल्हा-न्यायाधीश विश्वस्तांच्या नेमणुका करू लागले. आता देवस्थानचा कारभार धर्मादाय आयुक्तांकडे आहे. पण पूजा अर्चा, अन्न सत्र-सदावर्त, यात्रा उत्सव नेहमीच्या दिमाखात साजरे होतात. मोरगाव- थेऊर सिद्धटेक या ठिकाणांची व्यवस्था चिंचवड देवस्थान करते. वेदपाठशाळेचा उपक्रम उत्तम प्रकारे चालू आहे. देवस्थानने चालू केलेले मोरया हॉस्पिटल स्वतःच्या पायावर उभे राहून रुग्णांची उत्कृष्ट सेवा करते. घाटावर मोरया गोसावींची संजीवन समाधि आणि इतर सत्पुरुषांच्या देहपातानंतर समाध्या आहेत. सगळीकडे असंख्य भाविक येतात. दर्शन करून तृप्त होऊन जातात.
-विघ्नहरी भालचन्द्र देव, चिंचवड
(व्यास क्रिएशन्सच्या प्रतिभा दिपोत्सव २०१६ ह्या श्री गणपती विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply