श्री. मुसा शेख. माझे मित्र. खरं तर मित्र म्हटलं, की मग समवयस्क असणं हे ओघानेच येतं. मैत्री होते ती साधारण एकाच वयाच्या आणि बऱ्याचदा एकाच परिसरात राहाणारांमधे किंवा अशीच कुठे कुठे राहाणारांची कुठेतरी भेट होते, तारा जुळतात आणि पुढे मैत्रही जुळते. माझ्या आणि मुसाजींमधे असं काहीच न घडताही आमचं मैत्र जुळलं..
मुसाजींच्या आणि माझ्या वयात साधारणत: ८ ते १० वर्षांचं अंतर. मुसाजी पोलिसांत नोकरी करुन निवृत्त झालेले, तर मी निवृत्तीपासून अद्याप बराच लांब. मुसाजी मराठवाड्यातील उस्मानाबादचे, तर मी कायम मुंबंईत. पण तरीही आम्ही जवळ आलो, ते केवळ शब्दांमुळे..!
त्याचं झालं असं, की मी गेल्या वर्षी माझे मराठवाड्यातले आणखी एक शब्दमित्र श्री. अनिरुद्ध जोशी यांच्या विनंतीवरुन तेथील एक अग्रगण्य स्थानिक दैनिक ‘दै. एकमत’ मधे ‘मन की बात’ नांवाचा काॅलम लिहायचो. जवळपास वर्षभर हा काॅलम मी लिहिला. या काॅलमला मराठवाड्यात भरपूर प्रतिसाद मिळाला व अश्याच अनेक न पाहिलेल्या-न भेटलेल्या माझ्या काही वाचकांचे माझ्याशी सूर जुळले. मराठवाड्यातील सर्व थरातील विचाराने समृद्ध असलेल्या अनेकांशी माझी पुढे अतुट शब्दमैत्री जुळली, त्यातील एक श्री. मुसा शेख..
मध्यंतरी देशात वंदे मातरम ‘बोलणार’ आणि ‘बोलणार नाही’ असे दोन पक्ष निर्माण झाले होते. ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’ बोलणं किंवा न बोलणं हा देशातील बाकी सर्व प्रश्न बाजुला पडून राष्ट्रीय महत्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. नेहेमीप्रमाणे त्याला धार्मिक आणि राजकीय रंगही दिला गेला होता. या पार्श्वभुमीवर मी ‘दै. एकमत’मधे ‘जयहिन्द’ या अभिनादनावर एक लेख लिहिला होता. आपण नेहेमी जे गुड माॅर्निंग, गुड नाईट किंवा नमस्कार, हाय, हॅलोसारखी अभिनादनं मॅनर्स म्हणून वापरतो, त्या ऐवजी सर्वांनी सर्वकाळ ‘जयहिन्द’ बालायला काय हरकत आहे, असा त्या लेखाचा अर्थ होता. हा लेख मुसासाहेबांना खुप आवडला आणि त्यांनी मला तसं सांगायला फोन केला. (तिथपासून ते आजतागायत मला आणि इतर कोणालाही अभिवादन करताना मुसाजी आवर्जून ‘जयहिन्द’ म्हणतात). हा आमचा पहिला दुरस्थ परिचय आणि मग त्यापुढे मी काही लिहून फेसबुकवर पोस्ट केलं, की श्री. मुसाजींची आवर्जून प्रतिक्रिया येऊ लागली, ती आजतागायतं. पटलेल्या गोष्टींचं भरपूर कौतुक तर न पटलेल्या गोष्टींवर चर्चा हे मुसाजींचं वैशिष्ट्य. फेसबुक, व्हाट्सअॅपवर आमचं बोलणं व्हायचं, तसंच अधे मधे फोनवरही बोलणं व्हायचं, पण आमची प्रत्यक्ष भेट कधी झाली नव्हती..!
पुढे जाण्यापूर्वी थोडसं विषयांतर. १४ एप्रिल हा भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस. डाॅ. आंबेडकरांचं आणि माझं काय नातं आहे कुणास ठाऊक, पण माझ्या आयुष्यतील महत्वाच्या घटना त्यांच्या जन्म आणि मृत्यूच्या दिवसाशी संबंधीत आहेत. तिनच घटना सांगतो. मी बॅंकेच्या नोकरीत असताना मी नोकरीत कायम झाल्याचं पत्र मला मला ६ डिसेंबरला मिळालं. माझं लग्न ६ डिसेंबरला झालं आणि मला पहिली मुलगी झाली ती १४ एप्रिलला.
परवाच्या १४ एप्रिलला अश्याच दोन आनंदाच्या घटना घडल्या. या दिवशी सकाळीच मला देवगडनिवासी माझे शब्दमित्र श्री. मकरंद फाटक यांनी पाठवलेली हापूस आंब्यांची पेटी मिळाली. कधीही न भेटलेल्या मित्राकडून मला निरपेक्ष भावनेने मिळालेली ही आजवरच्या आयुष्यतली पहिली भेट. त्या आंब्यांची अवीट चव तोंडात घोळत असतानाच श्री. मुसा शेख माझ्या घरी आले. लिहिणाराला त्याचं वाचणारा हा पांडुरंगाच्या दर्शनासारखंच, किबहूना त्याहीपेक्षा काहीस जास्त असतं. मुसाजीना माझ्या घरात पाहून मला सावता माळ्याच्या शेतात त्याला भेटायला आलेला पांडुरंग आठवला.
सराळी माझ्या घरी आलेले मुसाजी दुपारी ३-३.३० पर्यंत माझ्याशी आणि माझ्या बायकोशी बोलत बसले होते. विविध विषयवारची त्यांची माहिती, त्यावरची त्यांची मतं, राजकारण, धर्म, समाज अशा विविध विषयावर आमच्या मनसेक्त गप्पा झाल्या. माझ्या पत्नीचा त्यांना जेवायचा आग्रह आणि त्यावर त्यांतं ‘मी जेवायलाच आलोय’ असं हक्काने बोलणं मला स्पर्शून गेलं. या व्यक्तीचं मराठीवरचं प्रभुत्व, कोणत्याही विषयांकडे पाहाण्याची त्यांची विलक्षण समज, संस्कृतचं ज्ञान, लहानपणी शाळेच्या पुस्तकात असलेल्या आणि अद्याप तोंडपाठ असलेल्या कविता, धर्माॅची मिनांसा मला आश्चर्यचकीत करुन गेली..आणि अशी समृद्ध व्यक्ती माझ्यासारख्या सामान्य माणसाने कधीतरी लिहिलेलं सर्वकाही बारकाईने लक्षात ठेवते आणि त्यावर माझ्याशी चर्चाही करते, हे ऐकून मला आश्चर्य वाटलं (बायकोला जरा जास्तच..) आणि मला माझ्या जबाबदारीची जाणिवही झाली..
जेवून, थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही जुहूला गेलो. समुद्रावर फिरण्यासाठी नव्हे, तर व्हिक्टोरीया राणीचा मखर शोधण्यासाठी. २०१६ साली मी मुंबईच्या व्हिक्टोरीया राणीच्या पुतळ्याचा मखर जुहूला एका बंगल्यात असल्याचं लिहिलं होतं आणि या मखराचा शोध घ्यायला सोबत कोणी येतंय का, असं विचारलं होतं. माझ्या त्या आवाहनाला तेंव्हा फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता पण परवा दोन वर्षांनी मुसासाहेब थेट उस्मानाबादेहून मला मदत करण्यासाठी आले होते. त्यांच्या नोकरीची सुरुवातीची वर्ष मुंबईत गेल्याने, त्यांच्या मुंबईवरच्या प्रेमाने त्यांना तो शोध घेण्यासाठी पाठवलं होतं. मुसाजींच्या पोलिसी नजरेने जुहूचा तो बंगला बरोबर शोधून काढला, पण तो मखर काही तिथे सापडला नाही..
सकाळी ११ पासून सुरु झालेली आमची भेट सायंकाळी ६ वाजता संपली. मकरंदजींनी पाठवलेले देवगडचे आंबे, आमरसाच्या माध्यमातून मुसाजींद्वारे उस्मानाबादेपर्यंत पोचले..शब्दांनी जोडली गेलेली ही नाती मला कोणत्याही इतर नात्यांपेक्षा जास्त मैल्यवान वाटतात..
देवाने याउप्पर मला इतर काही नाही दिलं तरी माझी काही तक्रार नाही, कारण मला मकरंदजी, मुसाजी आणि अशाच काही निस्वार्थ मित्रांचं जे देणं सरस्वतीच्या आशीर्वादाने मिळालंय, ते कुठल्याही लक्ष्मीपुत्राच्या नशिबात नाही..
— ©️ नितीन साळुंखे, मुंबई
9321811091
Leave a Reply