नवीन लेखन...

श्री संत  दामाजीपंत

श्री दामाजी पंत, महान विठ्ठल भक्त
होवून गेला एक संत, मंगळवेढे गावी  ।। १।।

जेथे असे प्रभूभक्ति, तेथे वसे दया, क्षमा, शांति
दुरितांसाठी मन कळवळती, त्यांचे हृदयीं  ।। २।।

विचार गरीबांचे मनी,  सेवा दीनांची करूनी
भाव विठ्ठला चरणी,  अर्पिले असे ।। ३।।

नाम घेतां विठ्ठलाचे,  काम करीता जनांचे
आनंदी भाव तयांचे, मनीं येई ।। ४।।

दामाजीची कथा ऐकूनी, भान जाई हरपूनी
प्रभू येई सेवक बनूनी, भक्तासाठीं ।।५।।

दामाजीपंत मामलेदार, मोठा त्यांचा अधिकार
म्हणून ते जिम्मेदार सरकारात ।।६।।

धान्याची भरती कोठारे, ठेवूनी त्यावरी पहारे
अधिकार दामाजीस सारे, धान्याच्या वाटपाचे ।।७।।

राज्यात परिस्थिती दुष्काळीं, पडूं लागले भूकबळीं
दु:खी जनता सगळी,  हा: हा कार माजला  ।।८।।

समोर धान्यांच्या राशी, बाहेर लोक मरती उपाशी
सहन न होई दामाजीसी, बघूनी हे सारे ।।९।।

राजानें हुकूम देऊन, धान्य ठेवले सांठवून
न वापरावे सामान्य जन,  त्या धान्यासी ।। १०।।

धान्याचे साठे बहूत, करूनी लोकांसी वंचित
दु:खी त्यासी बघत,  हर्ष होई राजासी ।।११।।

लोकांसी बघूनी भूके,  दामाजीस होई दु:खे
कसे हे संत देखे,  शांत राहूनी ।।१२।।

विठ्ठल नाम मनीं, कोठारे दिली उघडूनी
भूकेल्यास दाना-पाणी,  देई दामाजीपंत ।।१३।।

लोकांस आनंदी बघूनी भान जाय हरपूनी
नाचू लागला तल्लीन होऊन, विठ्ठलाचे भजन करीं ।।१४।।

सारे कोठार लुटविले,  प्रत्येक जीवा प्रभू संबोधले
त्यांच्या आनंदी एकरूप झाले, दामाजीपंत ।।१५।।

दुसऱ्याच्या आनंदाचे भाव, स्वत:चे मनी घेई ठाव
तेथेची जाणावा देव,  हेच असती सत्य ।।१६।।

भुकलेले व्याकूळ जीव, मिळता धान्यराशी ठेव
उचंबळून येती आनंदी भाव, नाचू लागली सारी ।।१७।।

दामाजीस न राही भान, तल्लीन होती नाच नाचून
विठ्ठल नामाचा गजर करून,  तादात्म्य झाले प्रभूशी ।।१८।।

बातमी कळली राजाला, क्रोध मनी आला
अटक करण्या हुकूम दिला, दामाजी पंतासी ।।१९।।

प्रभूची लीला न्यारी, ज्याचे तो तारण करी
कुणी न त्यासी मारी,  सांभाळ करी भक्ताचा ।।२०।।

काटा रूते भक्तचरणी,  येई पाणी प्रभू नयनीं
नाते घ्यावे समजोनी,  प्रभू भक्ताचे ।।२१।।

भक्त असता संकटी,  धावून येती पाठी
सुटका करती जगत्‍जेठी,  पाठीराखा बनून ।।२२।।

विश्वाचा अधिनायक,  भक्तासाठी बने सेवक
हेच भक्तीचे गूढ एक,  समजोनी घ्यावे  ।।२३।।

समजण्या हे सारे, उघडावी मनाची द्वारे
वाहू द्या भक्तीचे वारे,  अंतर्मनी तुमच्या  ।।२४।।

सेवक होवूनी जगत्‍जेठीं,  घेवूनी घोंगडी पाठी
हातीं घेती काठी,  राज दरबारी आला ।। २५।।

मज म्हणती विठू सेवक,  दामाजीचा मी हस्तक
धान्यराशी विकूनी ठीक,  आणली असे ती रक्कम ।।२६।।

उलटी करूनी घोंगडी,  मोहरांची रास पाडी
थक्क करूनी सोडी,  राजाला  ।।२७।।

चकीत झाला राजा,  विस्मयीत होई प्रजा
कसा देवू मी सजा,  दामाजी पंतासी  ।।२८।।

दामाजीचा आदर करी,  जाणूनी विठ्ठल त्याचे उरी
लोळण घेतले चरणा वरी, दामाजी पंताच्या  ।।२९।।

करमणूकीची आहे कथा, समजण्या वाटते कठीणता
पाहीजे मनोभावाची उच्चता, कळण्यास हे तत्त्वज्ञान  ।।३०।।

दामाजीची कहाणी, दान धर्माचे प्रतीक म्हणोनी
दुरीतांचे दु:ख, जाणोनी ग्रहण करावी सर्वांनी  ।।३१।।

डॉ. भगवान नागापूरकर
१६-१५११८३

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..