श्रीकांत ठाकरे म्हणजे शब्दप्रधान स्वररचनेतील मोठे नाव. त्यांचा जन्म २७ जून रोजी झाला.
श्रीकांत ठाकरे, एक असं नाव ज्यामुळे मराठी संगीत सृष्टीला नव्या ढंगाची ताज्या दमाची आणि उ़डत्या चालीचा आविष्कार प्राप्त झाला; श्रीकांत ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला संगीतकार म्हणून तर होतेच; पण ते स्वत: उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, समीक्षक, पत्रकार आणि आयुर्वेदाचे अभ्यासक देखील होते.
ठाकरे कुटुंबीय म्हणजे कलेच्या प्रांगणात रममाण असणारे, सामाजिक बांधिलकीचा ध्यास घेतलेले आणि सृजनशील; अर्थात हे संस्कार प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या प्रत्येक आपत्यांवर केले. संगीतकार म्हणून श्रीकांत ठाकरे व्हॉयोलीन वादनात निपुण होते, सतत वेगवेगळ्या संगीताच्या चाली त्यांच्या मनात रुंजी घालत आणि यामुळे सुरेल गाण्यांची निर्मिती त्यांच्या हातून झाली. मराठी चित्रपटात पहिली ‘गझल’ आणण्याचा मान श्रीकांत ठाकरे यांना जातो. मोहम्मद रफींना त्यांनीच मराठीत आणले.
मोहम्मद रफी यांना मराठी गाण्यांची संधी मा.श्रीकांत ठाकरे यांच्यामुळेच मिळाली. श्रीकांत ठाकरे संगीतबद्ध केलेली अनेक गाणी लोकप्रिय आहेत यामध्ये “अगं पोरी सवाल दर्याला तुफान”, “नको आरती की नको पुष्पमाला”, “तुझे रुप सखे गुलजार”, “प्रभू तू दयाळू”, “शोधीसी मानवा राऊळी मंदिरी” सारखी अवीट भक्ती, भाव आणि कोळी गीतांचा समावेश, मराठी संगीत विश्वात श्रीकांत ठाकरे आणि मोहम्मद रफी ही संगीत-गायक जोडगोळी म्हणजे “कानसेनांसाठी” पर्वणीच आहेत; तसंच “गझल” हा गाण्यांचा प्रकार श्रीकांत ठाकरे यांच्या मुळे मराठीत रुजला.
उत्तरा केळकर, सुरेश वाडकर, शोभा गुर्टू, पुष्पा पागधरे सारख्या गायकांनी श्रीकांत ठाकरे यांच्या संगीताची सुरेलता वाढवली; “शूरा मी वंदिले”, “सवाई हवालदार”, “महानदीच्या तीरावर” सारख्या चित्रपटांची निर्मिती देखील मा.श्रीकांत ठाकरे यांनी केली. संगीत क्षेत्राच्या व्यतिरिक्त पत्रकारिता आणि चित्रपट संबंधी लेखन श्रीकांतजींनी केलं, यामध्ये नवीन चित्रपटांची समीक्षा असेल किंवा वैविध्यपूर्ण लेखन, त्यामध्येखास “ठाकरे टच” असायचा “परखड”, “सत्यता” आणि “वैचारिक” पैलू त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून मांडलेले दिसत;“मार्मिक” या मासिकात ६० व ७० च्या दशकात “शुद्ध निषाद” या नावाने “सिनेमाची समीक्षा” करणारे सदर लोकप्रिय ठरले.
श्रीकांत ठाकरे यांच्या व्यक्तीत्वाचे पैलू आणि चरित्र पट “जसे घडले तसे” या आत्मचरित्राच्या माध्यमातून वाचक आणि रसिकांना वाचायला मिळाला. श्रीकांत ठाकरे यांचे १० डिसेंबर २००३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ सागर मालाडकर
Leave a Reply