नवीन लेखन...

श्रीकांत ठाकरे – एक स्वतंत्र विद्यापीठ

Shrikant Thakarey - An University

सिनेपत्रकार दिलीप ठाकूर यांनी श्रीकांत ठाकरे यांच्या वर लिहिलेला लोकप्रभा अंकातील लेख.

श्रीकांत ठाकरे यांच्याशी ‘मार्मिक’मधील त्यांचे सिनेप्रिक्षान वाचताना भेट होई. ‘शुद्धनिषाद’ नावाने ते प्रत्येक चित्रपटाची व्यवस्थित हजेरी घेत. शीर्षकापासूनच ते चित्रपटाची चंपी करीत. ‘शुद्धनिषाद’ यांची शैली-निरीक्षण, भाष्य टीका अगदी वेगळी व बिनतोड. त्यातून दिसणारे, भेटणारे श्रीकांतजी प्रत्यक्षातही तसेच थेट भाष्य करणारे असणार याची साधारण पूर्वकल्पना होती. पण त्यांच्याशी पहिली भेट माझ्यावरचा दबाव वाढवणारी ठरली.

१९७८ सालची गोष्ट. ‘संपादक’ मार्मिक, ७७ ए, रानडे रोड, शिवाजी पार्क, मुंबई २८ या पत्त्यावर प्रत्येक वेळी पत्र वा लेख पाठवण्याऐवजी प्रत्यक्ष तेथे जाऊन लेख द्यावा असा विचार करीत पत्ता शोधत शोधत तेथे पोहोचलो. तळमजल्यावरील दरवाजातच कांदे- बटाटेवाल्याकडून खरेदी करीत असलेली व्यक्ती म्हणजे श्रीकांत ठाकरे आहेत हे लक्षात यायला फारसा वेळ लागला नाही. त्यांच्याकडे लेख देता देता मी माझी ओळखही दिली. त्यावर पटकन त्यांच्यातील ‘ठाकरी बाणा’ जागा होत ते म्हणाले, ‘‘ये, जरा आत ये, अरे तुला एखादा मुद्दा सहजपणे मांडता येत नाही का? एक मुद्दा सांगायला सुरुवात करतोस तोच दुसरं काही तरी लिहितोस. बाळासाहेब पण कधी कधी वैतागतात तुझं वाचून..’’

श्रीकांत ठाकरे स्पष्टपणे सांगत असतानाच घरात हाफ पॅन्टमध्ये बसलेला मुलगा राज ठाकरे आहे हे माझ्या लक्षात आले. श्रीकांतजींशी प्रत्यक्षात झालेली माझी ही ‘पहिली भेट.’

भेटणारे श्रीकांतजी प्रत्यक्षातही तसेच थेट भाष्य करणारे असणार याची साधारण पूर्वकल्पना होती. पण त्यांच्याशी पहिली भेट माझ्यावरचा दबाव वाढवणारी ठरली. त्यांच्यासमोर तेव्हा मी काहीसा थरथरत होतो, हे मान्य करतो.

पण त्यानंतर त्यांच्याशी खूप जवळीक निर्माण होईल, त्यांच्या घरात एक साधा बेल वाजवून प्रवेश मिळेल, त्यांच्यासोबत अनेक चित्रपट पाहण्याचा व ते पाहताना काही गोष्टी जाणून घेण्याचा योग येईल असे कधीच वाटले नाही.

श्रीकांतजी असे त्यांना म्हणता म्हणता पप्पा कधी हक्काने हाक मारू लागलो व १० डिसेंबर २००३ रोजी त्यांचे निधन झाल्याचे समजताच आपला मोठा व खरा आधार गेल्याचे दुख कधी झाले हे कळलंच नाही..

‘मार्मिक’च्या दोन्ही कर जोडोनी या वाचकांच्या पत्रांच्या सदरासाठीचेही पत्र मी त्यांच्या घरी नेऊन देऊ लागलो, कधी लेख द्यायचो. बराच काळ त्यांच्या दरवाजा अथवा खिडकीतून हे देणे व्हायचे. तीन-चार र्वष हे असंच चाललं. क्वचित थोडासा त्यांच्या घरात जाई. तेव्हा आमच्या गप्पांत चित्रपट हाच महत्त्वाचा विषय असे. चित्रपटानेच मग आमच्यातील अंतर वेगाने कमी केले.

पप्पा बहुश्रूत अष्टपैलू होते. त्यांच्या सहवासात ती ओळख वाढत गेली. तत्पूर्वी ते व प्रभाकर निकळंकर यांनी मिळून निर्मिलेल्या ‘शूरा मी वंदिले’साठी पप्पांनी आपल्या संगीत नियोजनात मोहम्मद रफी यांच्याकडून गाऊन घेतलेल्या मराठी गीतांची लोकप्रियता सर्वदूर पोहोचली होती. रफीसाहेबांकडून मराठी गीते कशी गाऊन घेतली. त्यांना ‘ळ ’शब्द उच्चारता येत नसल्याने गीतरचनेत कशी काळजी घेतली, अशा गप्पांतून पप्पा उलगडत गेले.

पप्पांची रूपे अनेक. ते संगीतकार, व्यंगचित्रकार, पत्रकार, समीक्षक, उर्दूचे अभ्यासक असे करता करता त्यांचा आयुर्वेदाचे जाणकार अशीही एक ओळख झाली. काहीजण त्यांना भाई म्हणत.

एकाच माणसात इतक्या गोष्टी हे प्रचंड कौतुक व कुतूहलाचे होते.

‘मार्मिक’चा सगळा कारभारही ते एकहाती सांभाळत. तेव्हा ‘मार्मिक’ची छपाई प्रभादेवीच्या मातोश्री मुद्रणालयात होई व मालकी ठाकरे बंधूंची होती. पण शिवसेनाप्रमुख पक्षवाढीत व वादळे निर्माण करण्यात अथवा परतवून लावण्यात गुंतले असल्याने पप्पांनाच ‘मार्मिक’चा सगळा कारभार पाहावा लागे.

सततच्या भेटीगाठीतून काही गोष्टी घडत गेल्या. त्यांच्या याच घरात शिवसेनेची स्थापना कशी झाली, सीमाप्रश्नावरील आंदोलनात घरातले वातावरण अशा कितीतरी गोष्टी त्यांच्या दृष्टिकोनातून समजल्या. अर्थात, मग त्याही मागे जाणे स्वाभाविक होते. प्रबोधनकार, त्यांचा काळ, बाळासाहेब व पप्पांचे बालपण वगैरे गोष्टीतून पप्पा उलगडत गेले, पण ते कधीही पूर्ण सापडले नाहीत.

अनेकांना पप्पा गूढ व विलक्षण डिफिकल्ट वाटत म्हणून बरेचजण त्यांना टरकून असत. ही व्यक्ती समजण्यापलीकडची व संबंध ठेवण्यात महाअवघड असे अनेकांचे मत होते. पण पप्पांना वक्तशीरपणा, खरे बोलणे, प्रामाणिकपणा, बांधिलकी या गोष्टी आवडत. अन्यथा पप्पा समोरच्याला फाडून काढत.

शिवसेनाप्रमुखांचे बंधू यापेक्षा श्रीकांत ठाकरे अशी त्यांना स्वतंत्र ओळख होती. त्यांनी कधीही शिवसेना व शिवसेनाप्रमुखांचे बंधू या नात्याचा व शक्तीचा फायदा-गैरफायदा उठवला नाही. अन्यथा ते आपल्या चित्रपटांची ध्वनिफितीची संख्या वाढवू शकले असते. पण त्यांचा स्वत:च्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. त्यांनी संगीतकार म्हणून काम कमी केले, पण क्लासिक केले. पण त्यांचे कधीही म्हणावे तसे कौतुक झाले नाही. त्यांना संगीताची धुंदी होती. त्यांच्याशी गप्पा होत असतानाच ते एखादी तान घेत. ‘माझं घर’ या दुर्दैवाने पूर्ण न झालेल्या चित्रपटातील गाण्यासाठी त्यांनी अक्षरश अफाट मेहनत घेतली, आवर्जून त्यांनी ते गाणं अनेकांना ऐकवलं. पण हा चित्रपट पूर्ण न झाल्याचा त्यांना कायम खेद असे. त्यांच्याशी संबंध वाढतानाच वहिनी कुंदाजी, राज व त्याची बहीण ताई यांच्याशीही परिचय वाढत जाणे स्वाभाविक होते.

राज तेव्हा अमिताभचा निस्सीम भक्त होता. त्यामुळे वेळ काढून त्याच्या चित्रपटाची व्हिडीओ पाहणे त्याचा आवडता उद्योग होता. पण त्या या उद्योगात मार्मिकचं कव्हर लांबल्याने पप्पांची चिडचिड होई. घरातला राज हा एक वेगळा विषय आहे.

पप्पांशी नकळत शिष्याचे नाते झाले व त्यात एक जोडीदार संजय राऊत होता. संजय तेव्हा इंडियन एक्स्प्रेसमध्ये जाहिरात खात्यात होता व त्याची काही तरी करण्याची धडपड सुरू असे. आम्हा दोघांचा आणखी एक मित्र स्थानीय लोकाधिकार समितीमधील एक पदाधिकारी शरद पवार. आपण तिघांनी मिळून शुभ प्रकाशन नावाची संस्था काढून काही पुस्तके काढावी ही संजयची भन्नाट कल्पना. पण पप्पांच्या परवानगीशिवाय पुढचे पाऊल शक्यच नव्हते. ते त्यांच्या कानावर घालण्याची जबाबदारी माझ्यावर आली. पप्पा मला नाही बोलणे शक्यच नव्हते. मी, संजय व शरद अशा तिघांनी संजयच्या तेव्हाच्या घाटकोपरच्या घरी जेवणासह मीटिंग घेऊन प्रत्येकी, पाच हजार रुपये काढून ‘शुभ प्रकाशन’ स्थापन केले व पप्पांचे काही लेख व ‘शिवसेनाप्रमुख’ अशी दोन पुस्तके काढली. ती हातोहात संपलीदेखील.

अर्पणपत्रिकेत पप्पांना आम्ही आमचे गुरू म्हटल्यावरची पप्पांची प्रतिक्रिया काहीशी अस्पष्ट वाटली. आजही त्याचा अर्थ लागत नाही.

पप्पांच्या सहवासातील अशा असंख्य गोष्टी सांगता येतील.

पप्पांनी अगदी आठवणीने बिंदा ठाकरे यांच्या लग्नाची ‘नवशक्ति’त पत्रिका पाठवली. रमेश ठाकरे (आरोळीचे संपादक) आमच्या ‘नवशक्ति’च्या कार्यालयात दोन पत्रिका घेऊन आले, एक संपादक पु. रा. बेहरे यांना दिली व दुसरी मला दिली. तेव्हा मी प्रूफ रीडिंग खात्यात असूनही शिवसेनाप्रमुखांच्या मुलाच्या लग्नाची मला पत्रिका आल्याने अख्खे कार्यालय अवाक झाले. ही पत्रिका माझ्या संग्रहात आजही आहे.

पप्पांमुळेच मला हा आनंदाचा क्षण अनुभवता आला.

ताई व राज यांच्याही लग्नाला हजर राहणे मला लाभले. राजच्या लग्नाच्या रिसेप्शनला अमिताभ आल्याचा राजला झालेला आनंद आजही त्याच्या एक्स्प्रेशनसह आठवतोय.

पप्पांशी इतकं खूप जवळचे नाते बांधले जाऊनही आमच्या गप्पांत कधीही ‘शिवसेना’ हा विषय नसे. पप्पांसोबत बऱ्याचदा ‘मातोश्री’वर जाणे होई. पण फार क्वचित शिवसेवना हा विषय येई.

एकदा पप्पांसोबत मातोश्रीवर असतानाच मनोजकुमार आला. पप्पांकडून समजले की, तो नेहमीच येतो व एकदा त्याने बंगल्यावरील एका मूर्तीबद्दल नाराजी व्यक्त करीत ती काढायला सांगितली. त्यानंतर शिवसेनेला चांगले दिवस आले. १९८५ साली मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने मुसंडी मारल्याने मनोजकुमारचे शब्द खरे ठरले, हे राजही सांगेल.

एकदा पप्पांसोबत ‘मातोश्री’वर असतानाच अमिताभ बच्चन एका शानदार गाडीत आल्याचे पाहून दचकलो. काँग्रेसच्या खासदारकीचा त्याने राजीनामा दिला व बोफोर्स प्रकरणात त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याचे हे दिवस होते. अशा वातावरणात अमिताभ येथे कसा हे माझ्यासाठी प्रचंड कुतूहल व ‘ब्रेकिंग न्यूज’ होती. आता मी नवशक्तीत सब-एडिटर होतो. त्यामुळे मला ही बाय-लाइन स्टोरी देऊन खळबळ उडवता आली असती. पण या क्षणी पत्रकारापेक्षा पप्पांचा विश्वासू ही भूमिका पार पाडणे महत्त्वाचे वाटले.

पप्पांच्या सहवासातील अशा असंख्य गोष्टी सांगता येतील.

‘सामना’ सुरू होण्यापूर्वी त्यांनी ‘नवशक्ती’ सोडून आपल्या ‘घरच्या वृत्तपत्रा’त का येत नाहीस असे आवर्जून विचारले. पण पप्पांचे हक्काचे घर व ‘सामना’चे कार्यालय यात अंतर व फरक खूप आहे. या जाणिवेने मी ‘हो’ म्हणणे टाळले. १९९५ साली ‘युती’ सरकार स्थापन झाल्याच्या रात्रौ उशिरा पप्पांनी फोन करून, आता आपले सरकार आहे, काय हवे ते माग असे आवर्जून म्हटले. पण पप्पांकडून मला प्रेम व आधार याशिवाय काहीही नको असल्याने मी ‘हो’ म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. पप्पा सकळी सात ते रात्रौ बारा या वेळेत कधीही फोन करीत व थेट ‘मुद्दय़ाचे’ बोलत. पण फोनवर सापडलो नाही की बेचैन होत त्यांना एक तर काही सांगायचे असे अथवा एखाद्या सिनेमासंदर्भात तपशील हवा असे. ते लगेचच ‘सामना’त संजय राऊतला फोन करून माझा शोध लावत. एव्हाना संजय ‘सामना’च्या कार्यकारी संपादकपदी आला होता.

पप्पांसोबतचा माझा हा प्रवास केवढा तरी चौफेर व कमालीचा एक्सक्लुझिव्ह.

पप्पांना एकदा प्रचंड डिस्टर्ब झाल्याचे पाहिले. अन्यथा पप्पा म्हणजे रोखठोक व बेधडक. अगदी स्पष्ट बोलून समोरच्याला आडवा करत. अर्थात, त्यांना संगीतापासून स्वभावापर्यंत कसलीही भूक सहन होत नसे. त्यांना गृहीत धरण्याचेही आवडत नसे व त्यांच्याशी असलेल्या नात्याचा कोणी गैरफायदा उठवल्याचेही त्यांना सहन होत नसे. पण हे लक्षात न घेताच फटकळ वा तिरसट आहेत असे समज पसरले.

पप्पांनी खूप कष्टाने ‘मार्मिक’ वाचवला व वाढवला. पण एकदा अचानक त्यांच्याकडून ते सगळंच काम काढून घेऊन ‘शिवसेना भवन’मध्ये ‘मार्मिक’चे वेगळे कार्यालय स्थापन केले. ‘मार्मिक’च्या पंचविसाव्या वर्षी असा धक्का बसला हे पप्पांना पचवणे प्रचंड अवघड गेले. षण्मुखानंद हॉलमध्ये ‘मार्मिक’ सोहळ्यात पप्पा गॉगल लावून दु:ख विसरून वावरताहेत हे लपले नाही. मी व संजय राऊत त्यांना खूप आधार देण्याचा प्रयत्न करीत होतो. पप्पांना यातून बाहेर पडायला खूप वेळ लागला. ते प्रचंड मनस्वी असल्याचा प्रत्यय या काळात आला. या दिवसांत शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणाबद्दलचे त्यांचे सडेतोड मत पहिल्यांदा ऐकायला मिळाले.

‘सामना’ सुरू होताना पप्पांचे परीक्षणाचेही सदर सुरू झाले त्यामुळे पप्पा आता आम्हा समीक्षकाच्या टोळीस न्यू एक्सलसियर मिनी, न्यू इरॉस मिनी, लिबर्टी मिनी, ब्लेझ इत्यादी ठिकाणी येऊ लागले. पण ते, आमच्या ‘टोळीत’ असूनही स्वतंत्र असत, एकटे असूनही बलवान असत. त्यांचा दबदबा जाणवे, अस्तित्व जाणवे. रोखठोक समीक्षेसह आपल्या स्टाईलच्या ओळीने चार-सहा फोटोही ते देत. ‘अरे, चांगले फोटो देत जा रे’ अशी त्यांची आदेशवजा सूचना असे. कोणत्याही चित्रपटाचा फोटो पाहताक्षणीच त्यांना ओळी सुचत हे त्यांचे वैशिष्टय़. आणि त्या ओळींमुळे कोणी दुखावेल अथवा नाही, याचा कसलाही विचार न करणे त्यांची शैली.

फायद्यातोटय़ाच्या हिशोबाच्या पलीकडे जाऊन पप्पांशी माझे नाते होते. म्हणून तर १९९१ च्या लोकसभा, निवडणुकीत पप्पा बाळासाहेबांसोबत कोकण दौऱ्यावर असतानाही केवळ माझ्या लग्न समारंभाला हजर राहण्यासाठी ते दौऱ्यातून मधूनच आले. ते, कुंदाआई व शर्मिला ठाकरे असे तिघेही गिरगावच्या फडकेवाडीत आल्याने मी प्रचंड सुखावलो. त्यांच्याकडून यापेक्षा आणखी कशाचीही अपेक्षा नव्हती.

पप्पांच्या घरी उद्धवचीही अधूनमधून भेट होई. पप्पांना उद्धवजींबद्दल विशेष आस्था असल्याचे लपले नाही. त्यांनी दिलेली भेटवस्तू ते आवर्जून दाखवत, राजही त्यांना कधी वाढदिवसाच्या निमित्ताने, कधी विदेश दौऱ्यावरून येताना त्यांच्या आवडीची वस्तू आणे. पप्पा ते खूप उत्साहाने दाखवत.

ब्रश घेऊन एखादे व्यंगचित्र काढ, पुस्तक घेऊन उर्दूचा नवा शब्द शिक, पेटी घेऊन नवीन चाल काढ, व्हिडीओच्या काळात काही चित्रपट नव्याने बघ हा त्यांचा अखंड प्रवास सुरू होता. भारताचा क्रिकेट संघ पाकिस्तानाच्या दौऱ्यावर असताना तेथील स्थानिक समालोचक सतत ‘चेष्टा’ शब्द वापरत, तेवढय़ात शिवसेनाप्रमुखांनी पप्पांना फोन करून त्याचा अर्थ विचारला. पप्पांनी हा उर्दू शब्द असून त्याचा अर्थ प्रयत्न असा होतो असे म्हटले. ‘अशीही बनवाबनवी’ची सगळ्यांनी तारीफ केली, पप्पांनी मात्र एका दृश्यात कॅमेरा कसा हललाय हे लिहून आपले निरीक्षण नोंदवले. ‘शुभ बोल नाऱ्या’च्या परीक्षणाला त्यांना ‘काय घंटा बोलणार’ असे शीर्षक देण्याचा ‘ठाकरी बाणा’ दाखवला. ‘जा.. गीर’ हे देखिल त्यांचे शीर्षक.

अखेरच्या आजारपणाच्या काळातही हा ‘वाघ’ क्रियाशील होता. त्याही अवस्थेत त्यांनी चित्रपट व संगीत निर्मितीची हौस कायम ठेवली. कदम मॅन्शनवरून राज कृष्णकुंजवर राहायला आला, पप्पांना घरबसल्या जुने-नवे देशी-विदेशी चित्रपट पाहण्याची खूप चांगली संधी लाभली. आजारपण विसरून त्यांना ‘एकटे’पणही जाणवे.

अखेरच्या आजारपणाच्या काळातही हा ‘वाघ’ क्रियाशील होता. त्याही अवस्थेत त्यांनी चित्रपट व संगीत निर्मितीची हौस कायम ठेवली. कदम मॅन्शनवरून राज कृष्णकुंजवर राहायला आला, पप्पांना घरबसल्या जुने-नवे देशी-विदेशी चित्रपट पाहण्याची खूप चांगली संधी लाभली. आजारपण विसरून त्यांना ‘एकटे’पणही जाणवे. एकदा राज मला म्हणाला, ‘‘पप्पांशी गप्पा मारण्यासाठी वेळ काढून ये.’’ तेव्हा पप्पा हॉस्पिटलमध्ये होते. राजच्या सांगण्यानुसार तेथे गेलो, तेव्हाही ते संगीत, सिनेमा याच्याच जुन्या आठवणीत रमल्याचे पाहून खूप बरे वाटले.

२००३ च्या १० डिसेंबर रोजी दुपारी ‘नवशक्ती’त पोहोचलो तेव्हा बऱ्याचशा पत्रकारमित्रांचा ‘श्रीकांतजी गेले’ अशा निरोपाचा फोन येऊन गेल्याचे समजले.
एक संगीत यात्रा संपली म्हणावे की एक खडूस परंतु अभ्यासू समीक्षक हरपला असे म्हणावे काही कळेना. राज तेव्हा नाशिक दौऱ्यावर होता. तो अर्थातच मुंबईकडे निघाला. बाळासाहेबांना श्रीकांतजींच्या निधनाचे प्रचंड दु:ख झाल्याचे जाणवले.

पप्पांवर ‘नवशक्ती’च्या रविवारच्या अंकासाठी नेमके काय लिहावे याबाबत गोंधळ उडाला. खूप जवळच्या व्यक्तिवरचा मृत्यूलेख लिहिणे जास्त अवघड असते. कारण अशा व्यक्तीबद्दलची भावनिक बांधिलकी शब्दात उतरत नाही. एव्हाना पप्पांची ओळख राज ठाकरे यांचे पिता अशी झाली होती असेही नाही.
प्रबोधनकारांचा पुत्र ते राज ठाकरे यांचे पिता हा श्रीकांतजींचा प्रवास खूप मोठा, अनेक वळणावळणांचा, बराचसा स्वाभिमानी कधी चक्क तापटदेखील होता. पण त्यांचे अष्टपैलूत्व विशाल होते. एखाद्याच व्यक्तीला इतकी व अशी चौफेर वाटचाल शक्य असते. पप्पांच्या निधनानंतर काही वर्षांनी प्रभाकर निकळकरांचा फोन आला, श्रीकांतजींसोबत बनवलेल्या महानदीच्या तीरावर या चित्रपटाचा नटराज स्टुडिओच्या मिनी थिएटरमध्ये खास खेळ आहे. राजच्या आईने त्यासाठी तुम्हाला हजर राहायला सांगितलंय.. चित्रपट पाहत असताना पप्पांच्या झालेल्या पहिल्या भेटीपासूनचे अक्षरश: असंख्य छोटे-मोठे क्षण आठवत होतो. अलीकडेच राजच्या घराजवळच त्याच्या बहिणीची भेट झाली असता गप्पांच्या ओघात मी सहज बोललो, तुमच्या कुटुंबाशी सर्वाधिक काळ संबंध असणाऱ्या काही मोजक्या जणांत मी असेन. गप्पांच्या ओघात दोघांचेही पप्पांवरचे प्रेम व्यक्त झाले.

पण पप्पांचे मोठेपण व अष्टपैलूत्वाची ‘मनसे पिढी’लाही ओळख होणे गरजेचे आहे.

श्रीकांत ठाकरे हे स्वतंत्र विद्यापीठ आहे हे जगाला ओरडून सांगण्यासाठी हा एक छोटासा लेखप्रंपच.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.सिनेपत्रकार मा.दिलीप ठाकूर

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on श्रीकांत ठाकरे – एक स्वतंत्र विद्यापीठ

  1. खुप सुंदर लेख !
    संदर्भासाठी मनापासून आभार मा. संजीव वेलणकर

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..