आमच्या परिचयाच्या एका कुटुंबातील विवाह सोहळ्याचे निमंत्रण आले. पत्रिकाच खूप छान होती. एखादी छोटी पेटी असावी तशी होती. त्या पेटीमध्ये रेशमी खलित्यावर अतिशय आकर्षक पद्धतीने मजकूर छापला होता. पण मजकूर हा हस्तलिखित स्वरुपाचा होता, म्हणजे असे की त्या कुटुंबातील एका ओळखीच्या माणसाचे अक्षर खूप चांगले आहे. त्याने तो मजकूर लिहिला, तो स्कॅन केला आणि मग तो पत्रिकेवर मुद्रित झाला होता. सहज म्हणून विचारले, “या पत्रिकेची किंमत किती हो? ” त्यांनी पटकन उत्तर दिले, “फार नाही, सव्वा दोनशे रुपये. ” “सव्वा दोनशे? बापरे.” मी मनात विचार करू लागलो की ते कुटुंब म्हणजे बडं प्रस्थ आहे. किमान दोनशे तीनशे कुटुंबांना आमंत्रण असणार. सव्वा दोनशे गुणिले तीनशे .. बापरे, एवढा खर्च फक्त पत्रिकेवर? म्हणजे लग्न म्हणजे बॉलिवूड वेडिंग असणार बहुधा. माझे मन नकळतपणे लग्नसमारंभ या विषयावर विचार करु लागले. हल्ली लग्न म्हणजे एक इव्हेंट झालाय, असे म्हणायला हरकत नाही. कारण अनेक कंपन्या आहेत की ज्या लग्नव्यवस्थेचे कंत्राट घेतात. म्हणजे असं की, एकदा का साखरपुडा ठरला की साखरपुड्याच्या सभागृह आरक्षणापासून ते अगदी लग्नाचे सभागृह बुक करणे आणि इतके कमी पडते की काय म्हणून हल्ली लग्नाला एखादी थीम घेतली जाते. म्हणजे असे की, पोशाखाची थीम जर ‘पेशवाई’ असेल तर एखाद्या वेशभूषाकार व्यक्तीला बोलावले जाते आणि ती व्यक्ती वधूपक्षाकडील व वरपक्षाकडील सख्या नातेवाईकांचे आणि अर्थातच वधू आणि वराचे पोशाख डिझाईन करुन देते. हल्ली ‘लग्नपूर्व ‘ फोटोग्राफी हा एक नवीनच प्रकार उदयाला आला आहे. नियोजित विवाह असो की प्रेम विवाह, काही फोटोग्राफर लग्नाच्या पूर्वी मुलाला आणि मुलीला समुद्र किनाऱ्यावर किंवा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी नेतात आणि त्यांचे विविध पोशाखातील फोटो शूट पण करतात. कालांतराने ते फोटो ‘फेसबुक’वर अपलोड होतात आणि मग त्या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले की सगळे खुश ! लगीन खरेदीचा उत्साह तर फारच दांडगा. पैठणी हवी मग चक्क मुंबई ते येवला असा प्रवास सुद्धा केला जातो. हौसेला मोल नसते हे खरे. लग्नाआधी मेंदी आणि संगीत हवेच आणि काही ठिकाणी ‘ब्याचलर पार्टी’ सुद्धा हवीच असते. हल्ली केळवणंसुद्धा आधुनिक पद्दतीने हॉटेलमध्ये होतात. मेंदी संगीत सुद्धा हॉटेलमध्येच. कारण मुंबईत समारंभ घरच्या घरी आयोजित करणे अशक्यच आहे.
आता मुद्दा आला लग्नाच्या दिवशीचा. मुळात नवऱ्या मुलाला लग्न लागल्यावर उचलणे हा प्रकार मराठी लग्नात नसतो, पण गेली काही वर्षे तो प्रकार कुठून आपल्यात आला माहीत नाही. गुरुजी चक्क माईकवरुन जाहीर करु लागले की “नवऱ्या मुलाला उचलू नये. ” एकदा या गमतीच्या प्रकारात वरमाला घालण्यासाठी वधूच्या भावांनी वधूला उचलले आणि वधू धडपडली आणि खाली पडली, तिचा पाय मुरगळला.
‘हम आपके है कौन’ चित्रपटापासून मराठी कुटुंबातसुद्धा मुलीकडच्या लोकांनी नवऱ्याचे बूट लपवणे प्रकार सुरू झाला आहे. अशाच एका लग्नात मुलीच्या मैत्रिणींनी मुलाचे बूट एका गाडीत लपवले. मानाची पंगत सुरू होणार होती, पण मुलाचे बूट काही सापडेनात. चौकशी करता कळले की ज्या गाडीत बूट लपवले, ती गाडी निघून गेली. मुलीचे वडील जावयाला म्हणाले की मी तुला नवीन बूट देतो, पण जेवायला चल. नवरा बसला हटून की मला तेच बूट हवेत. या प्रकारात दोन तास पंगत खोळंबली आणि तिथे वेगळेच ‘संगीत मानापमान’ झाले.
रिसेप्शनची वेळ असते सात ते दहा. पण मेकअप आणि त्यानंतर दांपत्याचे फोटो काढणे या प्रकारात एवढा वेळ जातो की समोर आलेले निमंत्रितसुद्धा कंटाळतात. मग आधी भोजन करु आणि मग वधूवरांना भेटू, असे ठरवले जाते. भोजन झाले की रांग एवढी मोठी असते की कित्येक लोक वधूवरांना न भेटताच निघून जातात. काही ठिकाणी जेवणात तर एवढे पदार्थ असतात की काय खाऊ आणि काय नको, असे होऊन जाते. राजस्थानी पदार्थांपासून ते अगदी ‘दुबई तडका’ पर्यंत सर्व पदार्थ असतात. अशा ठिकाणचा दर सहज विचारला तर कळले की एक डिश फक्त अठराशे रुपये. ‘पैसा बोलता है..’
असो. लग्न कसे करावे, कशा पद्धतीने करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. लग्नानंतर काही जमातीत वरातीची सुद्धा प्रथा आहे. पण नुकताच असा काहीतरी नियम येतोय की म्हणे या वरातींना बंदी येणार आहे. पण मग त्यामुळे ज्या लोकांचे पोट वरात’ या व्यवसायावर अवलंबून आहे, त्यांचे काय होणार? कोणाच्या तरी मनात येतो आणि नियम होतो, पण तो नियम करताना सारासार विचार केला जातो का? याचाही विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. तेव्हा ‘शुभमंगल साSSवधान..’
– गणेश आचवल
9833268391
athatharvbharadwaj@gmail.com
संकलन : विनोद सुर्वे
Leave a Reply