मराठीतले शुद्धलेखन या विषयावर आजकाल बर्याच जणांकडून तावातावाने चर्चा केलेली बघण्यात येते. काही तथाकथित “शुद्धलेखन प्रसारक मंडळी” आपले विचार सर्वसामान्यांवर अक्षरश: लादतानाही दिसतात. शुद्ध मराठीचा आग्रह खरंतर योग्यच आहे. पण तो दुराग्रह होऊ नये, कारण त्यामुळे कदाचित सामान्य माणूस भाषेपासून दूर पळण्याचा धोका आहे.
आजची तरुण पिढी अशुद्ध मराठी लिहिते असा नेहमीच आरोप केला जातो. पण असे का याचा विचार कोणी केलाय का? आज दहावीत असलेला मुलगा साधारण पंधरा वर्षांचा. म्हणजेच विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकाच्या अखेर जन्मलेला. त्याने जर अशुद्ध मराठी लिहिले तर तो पूर्णपणे त्याचा दोष मानता येईल? त्या छोट्याशा मुलाला कळायला लागल्यापासून तो संगणकाचा वापर करतोय. हाताने लिहिण्याची त्याची सवय पार मोडलीय.
शुद्धलेखन-अशुद्धलेखन यासंदर्भात आजच्या पिढीवर मोठी टीका होते. ऱ्हस्व-दीर्घ योग्य पद्धतीने लिहिता आलं तर छानच नाही तर त्यामुळे अडत काहीच नाही. वयाच्या पाचव्या आणि सहाव्या वर्षांपासून कम्प्युटरवर लिहायला सुरुवात केल्यावर बिचारा कम्प्युटरच आमचं स्पेलिंग सुधारायला शिकला. शाळेमध्ये स्पेलिंग चुकल्याने मार्क जातात एवढंच आमच्यासाठी महतवाचे. त्या मार्काच्या मागे धावता-धावता भाषेचं सौंदर्य जपणं काय असतं हेच आम्हाला कधी कळलं नाही.
एखादी भाषा वापरायला जेवढी सोपी तेवढी ती वापरण्याचं प्रमाण जास्त असतं. संस्कृतप्रचुर मराठीपासून आजची तरुण पिढीची मराठी असा बराच मोठा आणि थक्क करणारा प्रवास या भाषेने केलाय. संस्कृतप्रचुर मराठी आता वापरात नाही म्हणून आक्षेप घेतला जात नाही. मग मराठी बोलताना किंवा लिहिताना इंग्रजी आणि हिंदी शब्द वापरून भाषा जर प्रवाही रूप धारण करत असेल तर तिला असं का अडवायचं? भाषेचा इतिहास तर असं सांगतो की भाषा ही कोणा एकाची किंवा कोणत्या एकाच ठिकाणावरूनची नसतेच मुळी. वापरणाऱ्या लोकांच्या प्रमाणे त्यात भेसळ होत जाते.
आजच्या पिढीला हे भाषेचं सौंदर्य समजावून देण्यासाठी प्रयत्न केला आहे? योग्य स्पेलिंग्ज आणि शुद्धलेखनामुळे भाषेचं सौंदर्य जोपासलं जातं हा विचार पटत नाही. सणांना तर हटकून मराठी एसएमएस फॉरवर्ड केले जातात. नॉन मराठी मंडळीही खास मराठी एसएमएस पाठवतात. भाषा शुद्ध असावी ही इच्छा आम्हाला मान्य आहे पण तो जेव्हा अतिआग्रह होतो तेव्हा त्यापासून पळ काढण्याचे मार्ग शोधले जातात. म्हणजे मराठी भाषा बोलायची असेल तर शुद्धच बोला नाही तर बोलू नका अशी अट जर घातली तर मराठी न बोलण्याचा पर्याय स्वीकारला जाईल.
मराठी भाषा व्यवहारातून नामशेष होऊ नये यासाठी आमच्या पिढीकडून थोडे अधिक प्रयत्न व्हायला हवेत हे मान्य. थोडे वाचनसंस्कार पुढच्या पिढय़ांपर्यंत पोहोचवायला हवेत. पण यासाठी योग्य मार्गदर्शन मिळणं आवश्यक आहे. भाषा टिकवण्यासाठी केवळ आग्रह आणि अट्टहास उपयोगाचे नाहीत.
— निनाद अरविंद प्रधान
Leave a Reply