३० एप्रिल….. ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे उर्फ खळे काका यांचा जन्मदिवस ! “सर्व सर्व विसरू दे गुंतवू नको पुन्हा” हे गाणं म्हणता म्हणताच ज्यांच्या संगीतात , लयीत आणि तालात आपण गुंतत जातो ते खळेकाका !
” गोरी गोरी पान” ते “लळा जिव्हाळा शब्दच खोटे”, “या चिमण्यांनो परत फिरा रे” ते “ऊन असो वा असो सावली”, “चुकचुकली पाल एक” ते “शुक्रतारा”, “लाजून हसणे अन” ते “कळीदार कपूरी पान”
किती किती गाणी आठवावीत जी आपण आपल्या मनाच्या अत्तरकुपित साठवून ठेवली आहेत त्याचा हवा तेव्हा सुगंध घ्यायला !
“ताक धीना धीन” या मुंबई दूरदर्शन च्या मेगा फायनल च्या बक्षीस वितरण समारंभास खळे काका स्वतः उपस्थित होते साल होतं २०००. मी आणि माझ्या सहकारी सौ प्रज्ञा लेले, मुंबई मेगा फायनलचे विजेते ठरलो होतो, त्यावेळी झालेल्या खळे नामक परीस स्पर्शाची आठवण आजही मनात ताजी आहे !
खळे काकांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !
आज खळे काकांवर मी लिहिलेली ती कविता खास तुमच्यासाठी पुन्हा रिपोस्ट करत आहे !! जरूर प्रतिक्रिया दया !
“शुक्र तारा” जो संगीतातला
लय तालाशी खेळे
मोहक रचना सुरावटींनी
तृप्त करिती ते खळे II धृ II
सुगम भासती रचना ज्यांच्या
गाण्या परी कठीण
मुखड्या वरूनी अंतऱ्यातला
प्रवास गूढ गहन
“राजहंस” जो संगीतातला
सुरम्य ज्याचे तळे
मोहक सुंदर सुरावटींनी
तृप्त करिती ते खळे II १ II
“ऊन असो वा असो सावली”
गाणी जी रिझवीती
“सर्व सर्व विसरू दे” म्हणताना
“आनंद तरंग” उठती
“अभंगी तुक्याच्या” तल्लीन
“जे का रंजले गांजले”
मोहक रचना सुरावटींनी
तृप्त करिती ते खळे II २ II
“चंद्र पुनवेचा” दिसे कुठे ती
“चंदाराणी उदास”
“निज माझ्या नंदलाला रे”
अंगाई बाळास
कुणी षोडशा हरवून पाही
“प्रतिबिंब पाण्यातले”
मोहक रचना सुरावटींनी
तृप्त करिती ते खळे II ३ II
इथेच “भेटे अंतर्यामीचा
कान्हो वनमाळी”
इथेच राधेसाठी सुस्वर
“बाजे रे मुरली”
“किलबिल किलबिल पक्षी बोलती”
गाणे मनातले
मोहक रचना सुरावटींनी
तृप्त करिती ते खळे II ४ II
बाज्याची पेटी विकण्याची कधी
वेळ जयांवर आली
त्याच श्रीनिवासावरी पुढे श्री
सरस्वती बरसली
त्याच्या गाणे आमुची अवस्था
“अजी मी ब्रह्म पाहिले”
मोहक रचना सुरावटींनी
तृप्त करिती ते खळे II ५ II
“जाहल्या काही चुका अन
सूर काही राहिले”
“ओठातल्या ओठात वेडे
शब्द माझे राहिले”
“रात्री तरी गाऊ नको ग”
“गेले ते दिन गेले”
मोहक रचना सुरावटींनी
तृप्त करिती ते खळे II ६ II
नतमस्तक मी तुझ्या पुढे रे
असा श्रीनिवासा
तुझ्या संगीते सुगंध येई
मातीच्या वासा
तुझ्या मुळे रे मन”आकाशी
फुलती चांदण मळे”
मोहक रचना सुरावटींनी
तृप्त करिती ते खळे II ७ I
काव्यरचना ©✍?
प्रमोद मनोहर जोशी जळगाव 9422775554, 8830117926
कविता कॉपी राईट अंतर्गत आहे
Leave a Reply