आज नवरात्रीचा दुसरा दिवस..देवी ब्रह्मचारिणीचा.. देवी ब्रह्मचारिणी म्हणजे देवी पार्वती. शंकरदेवांना प्राप्त करण्यासाठी पार्वतीने घोर तपश्चर्या केली..साहजिकच या काळात ती शुभ्रवस्त्र परीधान करीत असे.. म्हणूनच आजच्या दिवशी महिला पांढरेवस्त्र परीधान करून देवी ब्रह्मचारिणीची पूजा करत आहेत.. रस्त्यावर,फेसबुक,व्हॉट्सऐपवर स्त्रियांचे पांढ-या साड्यांमधील सुरेख फोटो पाहून मला मात्रं अनेक वर्षांपूर्वीची घटना आठवली.. साधारण पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे..
लग्न होऊन सोलापुरात आले त्याला पाच-सहा वर्षे झाली होती.. त्या काळात साडीची प्रथा आजच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात होती.
विवाहित स्त्रिया शक्यतो साड्या नेसत असत. त्या दिवशी मला काही खरेदीसाठी नवीपेठेत जायचे होते.उन्हाळ्याचे दिवस होते..सोलापुरचा उन्हाळा अतिशय कडक ..त्यामुळे मी पांढरी साडी नेसले..पांढरा रंग माझा अतिशय आवडता..त्यातून मी नेसलेली पांढरीशुभ्र,आकाशी रंगाच्या फुलांची नक्षी असलेली शिफॉनची साडी तर माझी फार लाडकी.. याच साडीवर माझ्या नव-याने मला पसंत केलेलं. पांढरी साडी ,पांढरं ब्लाऊज, मोत्याचं मंगळसूत्रं,मोत्याच्या बांगड्या,मोत्याचं कानातलं घालून मी छान तयार झाले..माझा रंगही पांढरा म्हणावा असाच… पांढरी पर्स खांद्यावर अडकवली नि स्वत:वर खूश होत पांढ-या चपला घालून बाहेर पडू लागले.. ” मी हॉस्पिटलला निघालो आहे तुला जाता जाता सोडून जाईन ” नवरा गाडीचं दार उघडत बोलला..
मी अजूनच खूश होत गाडीत विराजमान झाले.
प्रथम लायब्ररीत पुस्तक बदलायचं होतं. नव-यानं लायब्ररीपाशी गाडी थांबवली.तेवढ्यात एक मुलगा मोग-याचे गजरे विकायला घेऊन आला..कधी नव्हे ते नव-याने गजरा विकत घेतला..नि मी तो केसात माळला..अधिकस्य अधिकं फलम्… मी लायब्ररीपाशी उतरले नि नवरा त्याच्या कामाला निघून गेला.. लायब्ररीत पाय ठेवला नि तिथले लोक माझ्याकडे टकामका पाहू लागले..स्त्रिया,पुरुष माझ्याकडे एकटक पहात होते नि माझं लक्ष त्यांच्याकडे गेल्यावर पटकन नजरा वळवत होते.. ” मी फारच सुंदर दिसत असणार.उगीच का इतके लोक वळून वळून माझ्याकडे पहातायत !! ” मी स्वत:वर अजूनच खूश झाले… आज लायब्ररीयननी नेहमीपेक्षा फारच लवकर नोंद करून पुस्तक माझ्या हातात दिलं .. मी वाचनालयातून बाहेर पडून दुकानाकडे चालू लागले.. पुन्हा रस्त्यावर तोच अनुभव… रस्त्यावरचे लोक थांबून-थांबून ,वळून -वळून माझ्याकडे पहात होते.. माझी नजरा-नजर झाली की वेग वाढवून भराभरा निघून जात होते..
” मी यांना एखादी सिनेमातील हिरॉईन वाटत असणार ” मी स्वत:शीच हसले नि हिरॉईनच्या थाटात चालू लागले.
दुकानातही अगदी असाच अनुभव आला..प्रत्येकजण माझ्याकडेच पहात होता..त्यांच्या नजरेत एक विचित्र उत्सुकता,आश्चर्य..असलं काहीतरी दिसत होतं.. जवळील माणसं लांब जाऊन माझ्याकडे रोखून पहात होती.. दुकानात सगळ्यांना मागे सारून दुकानदाराने मला हव्या असलेल्या वस्तू काही मिनिटांत दिल्या. माझ्याजवळ सुटे पैसे नव्हते..ते माफ करून टाकले.. मी दुकानातून बाहेर पडताना दुकानातील गि-हाईके, विक्रेते मालकासहीत दाराशी गोळा झाले होते.. आता मी एखादी लोकप्रिय अभिनेत्री असल्यासारखं माझं मलाच वाटू लागलं नि मी स्वत:शी हसत घरी परतण्यासाठी रिक्षा शोधू लागले.
एक रिक्षा जवळ आली.मी त्या रिक्षाला हात केला .रिक्षाचा वेग कमी झाला.रिक्षावाल्याने माझ्याकडे पाहिले नि दुप्पट वेगाने तो निघून गेला.. असेच तीन-चार रिक्षांच्या बाबतीत झाले..
” किती मगरूर झालेत हे रिक्षावाले ”
मला भयंकर राग आला.. मी चालत चालत थोडी पुढे गेले.एक रिक्षा थांबलेली होती.त्या रिक्षातून उतरलेल्या बाईंकडून रिक्षावालेकाका पैसे घेत होते. मी त्या रिक्षात बसले.
त्या काकांनी रिक्षा सुरू केली.
” कुठे जायचय?”
” ला
काकांनी मला आरशात पाहिलं नि तत्क्षणी मागे वळून पाहिलं..
काका दचकल्याचा मला भास झाला..
” ओ बाई खाली उतरा.*****ला रिक्षा जात नाही ” काका घाम पुसत बोलले नि त्यांनी रिक्षा थांबवली.
” जात नाही म्हणजे ? तुम्हीच नेणार नं ? मी आजिबात खाली उतरणार नाही.. कशी रिक्षा जात नाही ते पहातेच ” …मी चंडिकेचा अवतार धारण करताक्षणी काकांना अजूनच घाम फुटला नि त्यांनी रिक्षा विमानापेक्षाही सुसाट वेगाने सोडली..
मी सांगितलेल्या ठिकाणी रिक्षा थांबली. मी उतरून पैसे देत होते पण काका क्षणभरही न थांबता ,पैसे न घेताच दुप्पट वेगाने निघून गेले..
आता मात्रं मी बुचकळ्यात पडले..
घरी आले..
कपडे बदलले..
जेवायला अजून अवकाश होता..
सकाळच्या गडबडीत पेपर वाचायचा राहिला होता.
पेपर उघडला…
ठळक मथळा होता —
श्वेतांबरेमुळे सोलापुरकरांत भीतीचे वातावरण गेल्या दोन दिवसांत पांढ-या कपड्यांतील एक सुस्वरूप महिला सोलापुरात फिरत आहे. ती दिवसा,रात्री पुरुषांना विशेषत: रिक्षावाले, कारचालक यांना भुलवून त्यांच्या रिक्षात,गाडीत बसते..आणि नंतर ती त्या पुरुषाला गावाबाहेर नेऊन मारून टाकते.. ही महिला हडळ असल्याचे बोलले जात आहे..
त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे … मला सगळा उलगडा झाला.. दर काही दिवसांनी पसरणा-या अफवेपैकी ही अफवा काही दिवसांतच विरून गेली… पण त्यानंतर आजतागायत माझी पांढरे कपडे घालण्याची मात्र कधीही हिम्मत झाली नाही…
नीला महाबळ गोडबोले
सोलापूर
Leave a Reply