श्रीकृष्ण जनार्दन जोशी यांचा जन्म १ ऑगस्ट १९१५ रोजी पुणे येथे झाला.
श्रीकृष्ण जनार्दन जोशी उर्फ ‘श्रीजं’च्या लहानपणी ‘सिटी पोस्टापलीकडे पुणे नाही आणि पुण्यापलीकडे महाराष्ट्र नाही’ असं म्हटलं जाई. त्यामुळे अंगात पुण्याबद्दलचा जाज्ज्वल्य अभिमान असलेल्या ‘श्रीजं’नी पुण्याबद्दल अत्यंत आपुलकीनं आणि प्रेमानं भरपूर लेखन केलं आहे.
‘श्रीजं’चे लेखन अत्यंत ताजं आणि टवटवीत असे. ‘पुण्यात दुमजली बस येते’, ‘हुजूरपागेच्या मुली’, ‘ओंकारेश्वर ओंकारेश्वरी गेले’,’ पीएमटी एक संकीर्तन’, ‘सदाशिव पेठ साहित्यपेठ’ अशांसारखी त्यांच्या लेखांची शीर्षकंही पुणेकरांना जवळची असत. पांढरपेशा समाजामध्ये गेल्या शंभर-दीडशे वर्षांत झालेलं परिवर्तन त्यांच्या बहुतेक कथांमधून त्यांनी अत्यंत लालित्यपूर्ण भाषेत केलं आहे. सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात गोविंदराव तळवलकरांनी ‘मटा’साठी, ‘मी पुण्याहून लिहितो की..’ अशी एक लेखमालाच त्यांच्याकडून वर्षभर लिहून घेतली होती. त्यांच्या ‘आनंदी गोपाळ’ आणि ‘रघुनाथाची बखर’ या त्यांच्या अत्यंत गाजलेल्या कादंबऱ्या! पुणेरी, भरती ओहोटी, जोशीपुराण, माझ्या साहित्याचा बॅलन्सशीट, श्रीकृष्णकथा भाग एक ते सहा, स्थावर, वृत्तांत, सुचलं..लिहिलं, सुलभा, ऐलमा पैलमा, ओलेता दिवस, सुलभा, सूर्यापोटी, मामाचा वाडा अशी त्यांची ५०हून अधिक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
श्री. ज. जोशी यांचे १३ जानेवारी १९८९ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply