सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव यांची ओळख महाराष्ट्रातील व्यासंगी-प्राच्यविद्यापंडित व मराठी कोशसाहित्यकार, महामहोपाध्याय अशी होती.डॉ. श्री. व्यं. केतकर यांच्या ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश मंडळा’त सहसंपादक म्हणून त्यांची १९२१ मध्ये नियुक्ती झाली. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १८९४ पुणे येथे झाला. महाराष्ट्रीय ज्ञानकोशातील वेदविद्या खंडाच्या संपादनकार्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. महाराष्ट्रात ऋग्वेदविषयक अध्ययनाचा पाया घालून त्यांनी संपूर्ण ऋक्संहितेचे मराठी भाषांतर प्रथम प्रकाशित केले (१९२८). ‘भारतीय चरित्रकोश मंडळ’ या संस्थेचे ते संस्थापक व अध्यक्ष आहेत. ह्या संस्थेतर्फे त्यांनी भारतवर्षातील प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन काळातील प्रसिद्ध व्यक्तींचे तीन कोश संपादून ते प्रसिद्ध केले (१९३२, १९३७, १९४६). त्यातील भारत वर्षीय प्राचीन चरित्रकोशाच्या सुधारलेल्या हिंदी आवृत्तीस (१९६४) अहिंदी प्रांतांत प्रकाशित झालेला सर्वोत्कृष्ट हिंदी ग्रंथ म्हणून मध्य प्रदेश सरकारचे पारितोषिक मिळाले (१९६७). अथर्ववेदाचे मराठी भाषांतरही त्यांनी केले आहे. यांशिवाय पतंजलीच्या महाभाष्याचा महाभाष्यशब्दकोश, पाणिनीच्या अष्टाध्यायीचा व गणपाठाचा शब्दकोश हे ही ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले आहेत. प्राचीन भारतीय स्थलकोश ते संपादित असून त्याचा प्रथम खंड प्रकाशित झाला आहे (१९६९). पुरीच्या श्री शंकराचार्यांकडून ‘महामहोपाध्याय’ (१९५७) व चिदंबरम्च्या शंकराचार्यांकडून ‘विद्यानिधि’ अशा उपाध्याही त्यांना प्राप्त झाल्या आहेत. एक मान्यवर संस्कृत पंडित म्हणून राष्ट्रपतींचे संस्कृत सन्मानपत्र त्यांना मिळाले (१९६५). त्यांच्या विद्वत्कार्याच्या गौरवार्थ रिव्ह्यू ऑफ इंडॉलॉजिकल रिसर्च इन लास्ट सेव्हंटी फाइव्ह यीअर्स हा इंग्रजी ग्रंथ राष्ट्रपतींच्याच हस्ते त्यांना अर्पण करण्यात आला (१९६७). पुणे विद्यापीठाने डी. लिट्. ही सन्मानपदवी त्यांस दिली (१९६९). १९७१ मध्ये भारत सरकारने ‘पद्मश्री’ देऊन त्यांचा गौरव केला. प्राच्यविद्यांच्या प्रसारार्थ त्यांनी केलेले ज्ञानकार्य चिरंतन स्वरूपाचे असून ते सर्व अभ्यासकांना प्रेरक ठरणारे आहे. सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव यांचे ६ जानेवारी १९८४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ विश्व कोष
Leave a Reply