दोन दिवसांपूर्वी व्हॉटसअॅपवरुन एक पोस्ट फिरत होती ती वाचनात आली. दिल्लीच्या कोणी भक्ताने म्हणे सिद्धिविनायकाला २ कोटींच्या फुलांनी मढवले होते. कारण काय.. तर त्याची इच्छा सिद्धिविनायकाने पूर्ण केली..
त्या पोस्टवर अनेक प्रतिक्रियासुद्धा आलेल्या वाचायला मिळाल्या. काही प्रतिक्रिया फारच बोलक्या पण तितक्याच कडवट होत्या. त्यातल्या काही खाली दिल्या आहेत.
१. या फुलांपेक्षा ते २ कोटी गरिबांसाठी वापरले असते तर ते बाप्पाला आवडले असते.
२. अशी एक-दोन दिवसांसाठी फुलांवर उधळपट्टी करण्यापेक्षा ट्रस्टने तेच पैसे महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधण्यासाठी वापरले असते तर?
३. दोन कोटींच्या फुलांचा चुराडा करणार्याकडे आणखी किती कोटींचा काळा पैसा असेल ?
४. मुळात अशा प्रकारचे नवस फेडायला मंदिर व्यवस्थापनानेच बंदी आणली पाहिजे.
५. स्वत:च्या श्रीमंतीचं इतकं ओंगळ प्रदर्शन बाप्पांसमोर केले त्याने बाप्पांना खरंच आनंद होईल?
मन्नत… इच्छा… नवस.. ही सगळी एकाच शब्दाची अनेक रुपं. हे नवस बोलले जातात.. फेडलेही जातात. बोलणार्या आणि फेडणार्यांकडे अफाट पैसा असतो… त्यांना त्याचे प्रदर्शन करायचे असते. पण इन्कम टॅक्स भरायची वेळ आली की त्यांना तोच पैसा लपवायचाही असतो. अनेक “मन्नत”वाले असेही असतील की ते म्हणत असतील.. “बाप्पा… माझे २०० कोटी इन्कमटॅक्सवाल्यांपासून वाचव.. मी तुला २ कोटींचे दागिने देतो”. यात अतिशयोक्ती मुळीच नाही. तिरुपती बालाजीला आपल्या धंद्यामध्ये २-५ टक्क्याचा भागिदार करुन घेणार्यांच्या आपल्या या महान देशात काहीही होऊ शकतं.
मुळात जिथे नवस बोलले जातात त्या स्थानांना अफाट पैसा हवा असतो.. त्यासाठी ते कोणतेही मार्ग अवलंबतात. बाप्पा नवसाला पावतो अशा जाहिरातीही करतात. मिडियाला हाताशी धरुन स्थानमहात्म्य वाढवतात हे आपण काही दिवसांपूर्वीच “लालबागच्या राजा”च्या वादात बघितलं. त्या वादाच्या पोस्ट आजही सोशल मिडियावर फिरत आहेत.
सिद्धिविनायकापुरतं बोलायचं तर हे मुंबईकरांचं आद्य दैवत. मुंबईकरांचं अतोनात प्रेम सिद्धिविनायकावर आहे. चतुर्थी आणि मंगळवारच्या दिवशी मुंबईकर अक्षरश: रात्रीपासून दर्शनासाठी रांगेत उभं राहून प्रतिक्षा करत असतो. अशा प्रकारे उधळपट्टी करुन पूर्ण केलेली “मन्नत” “सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट”च्या संमतीनंतरच केली असणार.. निदान सिद्धिविनायक ट्रस्टने अशा प्रकारच्या उधळपट्टीला थारा देऊ नये. “मन्नत” वाल्याला तेच पैसे ट्रस्टच्या माध्यमातून एखाद्या चांगल्या कार्यासाठी देण्याची विनंती करावी. एवढीच गणेशभक्तांची अपेक्षा असणार. किमान तेवढी अपेक्षा ट्रस्टने पुरवावी. अर्थात ट्रस्टने पुरवली नाही तरी बाप्पा ही अपेक्षा नक्कीच पुरवेल.
— निनाद अरविंद प्रधान
Leave a Reply