सध्या मोबाईलच्या वापरात भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या साधनाने अप्रत्यक्षपणे अनेकांना रोजगारही मिळवून दिला आहे. मोबाईल म्हटले की, ज्याच्या त्याच्या तोंडी एक शब्द नेहमी असतो तो म्हणजे सिमकार्ड. सिमकार्ड याचा अर्थ सबस्क्रायबर आयडेंटिटी मोड्युल. ही एक प्रकारची मेमरी चिप असते.
मोबाईलच्या पाठीमागच्या बाजूला असलेली एक सरकती पट्टी बाजूला करून सहजपणे सिमकार्ड आत बसवले जाते. सिमकार्डवरून मोबाईल वापरणाऱ्याची ओळख पटत असते त्यामुळे जेव्हा एखादा मोबाईल फोन चोरीस जातो तेव्हा पहिल्यांदा चोरणारा त्यातील सिमकार्ड काढून टाकतो, पण तरीही मोबाईल सेटचा एक विशिष्ट नंबर असतो त्यावरून मोबाईल चोराला पकडता येते. सिमकार्डमध्ये मोबाईलधारकाची व्यक्तीगत माहिती असते, फोन नंबर्स, फोन बुक, टेक्स्टमेसेजेस व इतर माहिती असते.
एक प्रकारे ही चिप संगणकाच्या हार्डडिस्कसारखेच काम करीत असते. सिमकार्ड टाकताच मोबाईल फोनचे काम सुरू होते. सिमकार्ड हाताळण्यासही अगदी सोपे असते. कुठल्याही देशात आपण गेलो तर तिथले सिमकार्ड खरेदी करून आपण कॉल्स करू शकतो त्यामुळे खर्च वाचतो. सिमकार्डचे काम हे ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन नेटवर्कच्या मदतीने चालते ज्याला जीएसएम म्हणतात.
त्याच प्रकारची कोड डिव्हिजन मल्टीपल अॅक्सेस (सीडीएमए) प्रणाली अमेरिकेतील एका कंपनीने तयार केली आहे. सिमकार्डमुळे मोबाईल फोन कंपनीकडून आलेला सिग्नल ग्रहण केला जातो, यात ओळखही पटवली जाते. पहिले सिमकार्ड १९९१ मध्ये म्युनिक येथील सिमकार्ड निर्मात्या जिसेक अँड डेव्हरियंट कंपनीने तयार केले. सिमकार्डचा आकार २५ बाय १५ मि.मी किंवा त्याहूनही लहान असू शकतो. या एवढ्याशा चिपमध्ये सॉफ्टवेअर असते त्याच्या आधारे ते चालत असते. त्याला व्होल्टेजही अगदी कमी लागते १.८ ते ३ व्होल्टमध्येही हे सिमकार्ड काम करू शकते. एकाच मोबाईलवर दोन क्रमांक वापरता यावेत यासाठी ड्युअल सिमकार्ड वापरले जाते.
Leave a Reply