आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार
जगण्यासाठी औषधं काम करत नाही – अंतिम भाग बारा
आयुर्वेदात एवढी ताकद आहे तर काही रोग कायमस्वरुपी का बरे होत नाहीत ? या आयुर्वेद शास्त्राच्या मर्यादा नव्हेत काय ? असं काही जणांच्या मनात येतं.
औषधालासुद्धा काही मर्यादा असतात. म्हणून तर सर्व रोग औषधाने बरे होत नाहीत. पण कोणते रोग कायमस्वरुपी बरे होत नाहीत, याचे सविस्तर वर्णन देखील ग्रंथकारानी करून ठेवले आहे.
ज्या ठिकाणी आपल्या, किंवा आपल्या शास्त्राच्या मर्यादा संपतात, ती वेळ पेशंटला, दुसऱ्या शास्त्राकडे ” रेफर ” करण्याची असते, हे ज्या वैद्याला किंवा डाॅक्टरला समजते, तो यशस्वी !
ज्याला आपल्या मर्यादा समजतात, ते शास्त्र महान असे मला वाटते.
केवळ औषधांनीच रोग बरे होत नाहीत, ही दृष्टी शिकवणाऱ्या आयुर्वेद शास्त्राला त्रिवार वंदन !!!
लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे, ती म्हणजे इथे औषधांच्या मर्यादा शास्त्रकारांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत. जे व्याधी औषधांनी बरे होत नाहीत तिथे क्षारकर्म, अग्निकर्म, शस्त्रकर्म करावे लागते. चरकाचार्य देखील स्पष्टपणे म्हणतात, इति नास्ति मम अधिकारः । शस्त्राधिकारः ।। अमुक व्याधी हा केवळ औषधांनी बरा होणारा नाही.
प्रमेहासारखा आजारच घ्या ना ! त्याचे एकुण वीस प्रकार. त्यातील कफापासून होणारे दहा प्रकार सहज साध्य सांगितले आहेत. पित्तामुळे होणारे सहा प्रकार औषध घेतलं तर साध्य, याला याप्य असा शब्द ग्रंथकार वापरतात. तर वातामुळे निर्माण होणारे चार प्रकार, किंवा पहिल्या वर्णन केलेल्या सोळा प्रकारांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर होणारे मधुमेहासारखे व्याधी औषध घेतले तरी सुद्धा पूर्ण नष्ट होत नाहीत. त्यांना असाध्य म्हणतात.
आयुर्वेदात शस्त्रसाध्य व्याधी, ग्रहचिकित्सा वर्णन केल्या आहेत, कारण औषधांच्या मर्यादा ग्रंथकाराना माहिती होत्या. मोतीबिंदूचे शस्त्रकर्म, अॅपेंडिक्स, हर्निया यांची शस्त्रकर्मे एवढेच नव्हे तर ह्रदयाच्या शस्त्रकर्मामधे उपयोगी ठरणारे, आणि तर्जनी या बोटावर टोपीसारखे बसणारे, एक अति सूक्ष्म यंत्र देखील ग्रंथात वर्णन केलेले आहे, जे आजही अगदी तसेच, तेवढ्याच कामासाठी सर्जनमंडळी वापरतात.
मध्यंतरीच्या कालावधीत यवनांनी केलेल्या प्रचंड विध्वंसामुळे, केलेल्या जाळपोळीमुळे, राजकीय अनास्थेमुळे, अहिंसात्मक जीवनाचा अतिरेक झाल्यामुळे, आयुर्वेदातील काही महत्त्वपूर्ण विषयाच्या अभ्यासापासून, पुढील काही पिढ्या वंचित राहिल्या, हे सत्य आहे.
औषधाला जसा गुण आहे, तसाच अवगुण पण त्याच्यातच दडलेला असतो, याचाही अभ्यास देखील ग्रंथकार सांगतात, ( वैद्याला याची जाण असते, बोगस डाॅक्टरला नसते. ) यासाठी औषध देणारा वैद्य हा ज्ञानी, अभ्यासू, दृष्टकर्मा, हवा. केवळ पुस्तकी किडा नको. आणि धनाभिसर पण नको. (ग्रंथात वैद्यांचे दोन प्रकार सांगितलेले आहेत, एक रोगाभिसर म्हणजे रोगाला दूर करणारा, आणि दुसरा प्राणाभिसर, म्हणजे प्राणाला दूर नेणारा, म्हणजे अज्ञानाने चुकीची औषधे वापरून, रोगापेक्षा प्राण हरण करणारा, म्हणून प्राणाभिसर ! ) तिसरा धनाभिसर हा नवीन प्रकार आज अस्तित्वात दिसतो.
आज स्टिराॅईड सारखी औषधे जास्त काल घेतल्याने त्याचे प्रचंड दोष उत्पन्न ( आजच्या भाषेत “साईडइफेक्ट” ) होतात. हे माहिती असून सुद्धा ती वापरली जातात.
आयुर्वेदात देखील क्षारांसारखी काही औषधे काही कालावधीनंतर बंद करावीत, हे स्पष्टपणे लिहिलेले आहे.
म्हणजे आयुर्वेदीय औषधांना पण साईड इफेक्ट असतात ?
हो असतातच !
अहो,
ज्या औषधांना “इफेक्ट” आहे, त्याला “साईडइफेक्ट” असणारच ना !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
30.04.2017
Leave a Reply