भारतीयांना सिंचनाची कला अनादीकालापासून ज्ञात आहे. जे ज्ञात आहे, त्यात कालमानपरत्वे सुधारणा मात्र झाल्या नाहीत. कधी काळी विकसित झालेल्या पद्धती परंपरेचा भाग बनून अढळ ताऱ्याप्रमाणे निश्चल झाल्या.
एका शेतात सरीची लांबी ३०० मीटर असते, तर त्याच्या बाजूच्या शेतात १५-२० मीटर असते. एक शेतकरी साऱ्याची रुंदी दहा मीटर ठेवतो, तर दुसरा दोन मीटर ठेवतो. असे का केले, त्याला काही आधार नाही, शास्त्र नाही की विचार नाही. लागो, भागो, आंधळ्याची काठी! जग कुठे, आपण कुठे? हाच का आमचा महासत्तेच्या दिशेने प्रवास?
योग्य सिंचन म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. वेगवेगळ्या पिकांच्या कार्यक्षम मुळांची खोली वेगवेगळी असते. पाणी दिल्यानंतर कार्यक्षम मुळांच्या खोलीपर्यंत ओलावा पोहोचला तर ते उत्कृष्ट सिंचन झाले असे समजावे. हे सिंचनशास्त्राचे प्रमुख तत्त्व आहे.
ऊस शेतीबाबत खूप पाणी दिल्यास खूप पीक येते, असा एक गैरसमज अनेकांच्या मनात असतो. ठिबक, तुषार या आधुनिक पद्धतीत पूर्वनिर्धारित खोलीपर्यंत ओलावा नियंत्रित करता येतो. प्रवाही पद्धतीत मात्र हे सहजशक्य नाही. जमिनीचा प्रकार, उतार आणि उपलब्ध पाणीप्रवाह यांचा लांबी-रुंदीशी समन्वय साधून शेताच्या सर्व भागात पाणी विभाजन सारखे होईल, अशी काळजी घ्यावी लागते.
जमिनीच्या पृष्ठभागावर पाणी वाहत असताना ते शोषले जाते. पाणी वाहण्याची वेळ सगळीकडे सारखी असेल तर ओलाव्याची खोलीसुद्धा समान असते.
सिंचन व्यवस्थापनात आमूलाग्र बदल होत असून त्यात कमालीची आधुनिकता येत आहे. स्वयंचलित प्रणाली रूढ झाल्या असून पाण्यासोबत अन्नद्रव्यांचा पुरवठा सुलभ ठरत आहे. आमच्या पारंपरिक पद्धती रानटी अवस्थेत आहेत, आणि आधुनिक पद्धतीसुद्धा अडाणीपणानेच वापरल्या जात आहेत. एक ना धड भाराभर चिंध्या !
मधुमेह्याला क्षय झाल्यावर स्वगीची दोरी झटक्यात तुटलीच म्हणून समजा! तुटीच्या देशात अक्षम्य बेपर्वाई, दैवदुर्विलास आहे.
प्रा. बापू अडकिने, परभणी
मराठी विज्ञान परिषदेच्या कुतुहल या सदरातून साभार
Leave a Reply