सुप्रसिद्ध गायिका धोंडूताई गणपत कुलकर्णी यांचा जन्म 23 जुलै 1937 रोजी कोल्हापूर येथील येथे कलाप्रेमी कुटूंबात झाला. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते आणि ते ग्वाल्हेर घराण्याची गायकी शिकलेले होते. त्यांच्या आईचे नाव सोनाताई असे होते. ते कोल्हापूर येथे रहात असल्यामुळे त्यांचा खूप फायदा झाला कारण ज्या काळात पांढरपेशा समाजात गायनाचे शिक्षण घ्यायला अजिबात मान्यता नव्हती तर गायनाला अजिबात प्रतिष्ठा नव्हती. त्याच काळात त्यांच्या वडलांनी म्हणजे गणपतरावांनी त्यांना गायनाचे शिक्षण देण्याचे धाडस दाखवले आणि अर्थात धोंडूताई यांनी परिश्रम करून वडीलांच्या योग्य निर्णयाचे सार्थकही करून दाखवले. धोंडुताई यांनी सुरवातीला जयपूर घराण्याचे उस्ताद अल्लदिया ख़ाँ साहेब यांचे भाचे नथ्थन ख़ाँ यांच्याकडे तीन वर्ष शिकल्या. त्यानंतर याच घराण्याची तालीम त्यांनी आयुष्यभर घेतली.
धोंडुताई त्यांच्या वयाच्या ८ व्या वर्षांपासून आकाशवाणीवर गाऊ लागल्या. त्यानंतर त्यांनी उस्ताद अल्लदिया ख़ाँ साहेब यांचा मुलगा भुर्जी ख़ाँ साहेबांकडून १९४० ते १९५० अशी दहा वर्षे त्यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले .
धोंडुताई जयपूर-अत्रौली घराण्याच्या होत्या.
धोंडुताई कुलकर्णी १९५७ पासून बडोद्याच्या दरबारच्या गायिका लक्ष्मीबाई जाधव आणि अल्लादिया ख़ाँ साहेबांचे नातू अजिजुद्दिन कझान उर्फ बाबा यांच्याकडे सरकारी शिष्यवृत्ती घेऊन शिकल्या. त्यावेळी त्यांना केसरबाई केरकर यांची तालीम मिळावी म्हणून त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी खूप प्रयत्न केले. शेवटी त्यांनी मुंबईला येण्यासाठी कोल्हापूरचे घर विकले आणि ते मुंबईला रहावयास आले. त्यांनी ज्या गोष्टीसाठी कोल्हापूरमधले घर विकले ते त्यांना मिळाले. धोंडुताईना केसरबाई यांची तालीम १९६१ ते १९७१ या काळात लाभली त्या केसरबाई यांच्या एकमेव शिष्या होत्या.
धोंडुताई यांच्या गाण्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत ती म्हणजे जयपूर घराण्यामधील गाण्याचा खुला आकार , वक्रगतीची तानप्रक्रिया , अनवट आणि जोडराग , त्याचप्रमाणे पेचदार , आलापचारी आणि बोलतान ही त्यांच्या गाण्याची वैशिष्ट्ये होती. त्यांनी कधीही लोकप्रिय होण्यासाठी तडजोड स्वीकरली नाही. आपल्या कलामूल्यांबद्दल त्या सतत जागरूक असत. काही जण घराण्याची परंपरा सोडून वेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात तसे काही धोंडुताई कुलकर्णी यांनी केले नाही. त्यांचे असे मत होते की गाणाऱ्याने आपल्या ‘ गायकीची खोली आणि गांभीर्य ‘ जपले पाहिजे.
त्यांनी कधीही तडजोडी केल्या नाहीत तर आपली विशुद्ध संगीतकला जोपासण्यासाठी त्या संसारविन्मुख झाल्या आणि व्रतस्थ राहिल्या. त्या नेहमी म्हणत माझे आयुष्य संगीताशिवाय अपूर्ण आहे. त्यांनी स्वतःच्या लग्नापेक्षा संगीताला महत्व दिले कारण त्या संगीताशिवाय राहू शकत नव्हत्या. खरे तर त्यांचे विचार आणि कर्तृत्व काळाच्या पुढे होते.
आकाशवाणीच्याच्या कलाकार म्हणून धोंडुताई यांनी अनेक वर्षे म्हणजे ५० वर्षाहून अधिक काळ गायन केले . केसरबाई केरकर संमेलनात त्यांचे प्रतिवर्षी गायन होत होते आणि अखेरच्या गाण्याचा मान त्यांना असे. त्यांच्या ध्वनिमुद्रिकाही निघाल्या .
१९९० साली त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार , २००४ साली आय. टी . सी . संगीत रिसर्च अकादमी पुरस्कार , २०१० साली ‘ देवगंधर्व पुररस्कार , महाराष्ट्र गौरव पुरस्कार असे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.
नमिता देवीलाल या त्यांच्या शिष्येने धोंडुताई , केसरबाई आणि अल्लादिया खा साहेब यांच्या संगीत परंपरेवर ‘ म्युझिक रूम ‘ नावाचे पुस्तकही लिहिले आहे.
धोंडुताई कुलकर्णी यांचे गाणे मला शेवटी शेवटी ऐकायला मिळाले. त्यांना बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की त्यांचे आयुष्य खरोखर संगीताला समर्पित असेच होते , त्यांच्या वावरण्यात , बोलण्यात कुठेही दिखावा नव्हता की नाटकीपणा, त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण सात्विक तेज दिसत होते.
अशा धोंडुताई कुलकर्णी यांचे मुंबईमधील बोरिवली येथे १ जून २०१४ रोजी ८६ व्या वर्षी निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply