आग्रा, ग्वाल्हेर, जयपूर घराण्याचे गायक पं. वसंतराव चांदोरकर यांचा जन्म २० जून १९२० रोजी धुळे येथे झाला.
जन्माने जरी वसंतराव धुळ्याचे होते तरी त्यांची कर्मभूमी जळगांव होती. बालपणापासूनच त्यांच्यावर सांगितिक संस्कार सुरू झाले होते. १९२५-२६ या कालावधीत धुळ्यात एका कार्यक्रमास इंदूरच्या राणीसाहेब आल्या होत्या. त्यावेळी वसंतराव बंधूंनी रचलेले स्वागतगीत सादर करण्याची संधी त्यांच्यासह त्यांच्या मित्रांना मिळाली. यावेळी पाठीवर पडलेली कौतुकाची थाप संगीत क्षेत्रात भरारी घेण्यास कामात आली. यानंतर त्यांचा कै. विष्णूबुवा बखले यांच्या गायन विद्या प्रसारक समाज संस्थेत प्रवेश झाला. पं. रंगनाथ करकरे व पं. दिनकर खानवाले यांच्यासारखे दिग्गज गुरुंचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. खांन्देश स्पिनिंग ॲन्ड विव्हिंग मिल्स लि. येथे त्यांनी प्रदीर्घ म्हणजे सुमारे ४५ वर्षे सेवा करत करत करत त्यांनी भारतीय अभिजात संगीताची सेवा केली. अनेक संगीत नाटकात भूमिका व संगीत दिग्दर्शन केले. अनेक पारितोषिके व पुरस्कारांचे ते मानकरी होते.
२९ मार्च १९४९ रोजी आकाशवाणीवरून त्यांचा पहिला कार्यक्रम प्रसारीत झाला होता. १९४९ पासून पं. वसंतराव आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलावंत होते. मुंबई, पुणे व १९७६ नंतर जळगांव केंद्रावरून त्यांचे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम सादर होत होते. शास्त्रीय संगीताबरोबरच नाट्य संगीत, सुगम संगीत, ठुमरी, दादरा, टप्पा, अभंग यावरहि त्यांचे प्रभुत्व होते. संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावरील संगीत रुपक आजी सोनियाचा दिनु त्यांनी संगीतबध्द करून सुमारे ५०० कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात केले.
शासनच्या संगीत नाट्य स्पर्धा तसेच रंगायन, नवी दिल्ली येथील बृहन्महाराष्ट्र संगीत नाट्य स्पर्धेचे ते अनेकदा परीक्षक म्हणून त्यांनी रंगभूमीची सेवा त्यांनी केली आहे. त्याच्या या सांगितिक कार्यांचे संवर्धन व्हावे म्हणून स्व.वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठानाची स्थापना झाली. या प्रतिष्ठान तर्फे बालगंधर्व संगीत महोत्सव, पाडवा पहाट, वसंतोत्सव, बोलावा विठ्ठल, मल्हार महोत्सव असे कार्यक्रम आयोजित केले जातात.
वसंतराव चांदोरकर यांचे ८ जुलै २००१ रोजी निधन झाले.
२०२० हे साल हे वसंतराव चांदोरकरांचे जनशताब्दी वर्ष होते त्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनाच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन त्यांची कर्मभूमी जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता.
Leave a Reply