गायिका गौरी पाठारे यांचा जन्म ११ जूनला पुण्यात झाला.
पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या शिष्या असलेल्या गौरी पाठारे यांनी पद्मा तळवलकर आणि पं. गंगाधर पिंपळखरे यांच्याकडे गायनाचे धडे घेतले असून सध्या त्या पं. अरुण द्रविड यांच्याकडे जयपूर घराण्याची गायकी शिकत आहेत. गौरी पाठारे यांचे बालपण पुण्यात गेलं. सर्व शिक्षणही पुण्यातच झालं. गौरी पाठारे यांना लहान पणा पासून गाण्याची आवड होती,त्या मुळे लहानपणी रेडिओवरील आशाताई, लतादीदी यांची गाणी हुबेहूब म्हणणं हाच त्यांचा छंद होता. सिने संगीताएवढी त्यांना शास्त्रीय संगीताची ओढही नव्हती. साधारणतः वयाच्या ११ व्या वर्षी गौरी पाठारे यांनी पं.गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडं गाणं शिकायला सुरवात केली. पिंपळखरे गुरुजींकडं त्यांनी पाच वर्षं शिक्षण घेतले. एके दिवशी त्यांच्या शाळेतले संगीतशिक्षक शरद करमरकर सर यांनी गौरी पाठारे यांचा आवाज ऐकून त्यांच्या आई-बाबांना शाळेत बोलावलं व हिला खूप गाणं शिकवा असं सांगून खूप प्रोत्साहित केलं. मग त्याच शिक्षकांनी शाळेच्याच वेळात चार-पाच वर्षं गौरी पाठारे यांच्यावर मेहनत घेऊन बहुतेक सर्व आंतरशालेय स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लावला. त्यात त्यांनी अनेक बक्षिसं मिळवली. त्या दहावी ते बारावीच्या परीक्षांच्या काळात गाण्याचा क्लाेस थांबवून खूप अभ्यास करू लागल्या. गुरुजीही वयोमानानुसार थकले होते व तालमीत खंड पडू लागला.
त्यांनी दहावीत असताना अभ्यासामुळे गाण्याची तालीम थांबवली तालीम, पण गाण्याची आंतरिक ओढ व पं. जितेंद्र अभिषेकी बुवांच्या गाण्याचं मनावर पडलेलं गारूड यातून मग त्या गुरुपौर्णिमा, सणवार इत्यादींच्या निमित्तानं जितेंद्र अभिषेकी यांच्या घरी जाऊ लागल्या. पुढील तीन वर्षं मग अभ्यास सांभाळून बुवांच्याच शिष्या माधुरीताई जोशींकडं अधूनमधून जाऊ गाणे शिकू लागल्या.
बारावीनंतर त्यांनी अभिषेकी बुवांकडं नेमानं जायला सुरवात केलीच. मग पदवीधर होईपर्यंतची तीन वर्षं त्यांना त्यांच्या घरी दररोज दुपारी तालीम मिळू लागली. बारावीपर्यंत वाया गेलेला रियाजाचा वेळ भरून काढण्यासाठी सात-आठ तास रियाज करू लागल्या. परिणामी, व्हायचं तेच झालं. त्यांचा आवाज सपाटून बसू लागला. मग अभिषेकी बुवांच्या सल्ल्यानुसार त्यांनी एक वर्ष उस्ताद सईदुद्दीन डागर यांच्याकडं कंठसाधनेचा अभ्यास केला. त्यासुमारास बुवा अत्यंत आजारी होते व त्या वेळी त्यांच्या आईनं सुचवलं, की त्यांनी आता दुसरीकडं शिकावं. एकतर बुवांच्या प्रकृतिअस्वास्थ्यामुळे व बाईनं बाईकडंच शिकावं म्हणजे आवाज घडतो व आवाजाचे त्रास होत नाहीत, असं त्यांच्या आईचे म्हणणं होतं. त्या पद्माताई तळवलकर यांना भेटून आले. त्यांनी बुवांशी चर्चा केली व त्या मुंबईला शिकण्यास गेल्या. पुढील १९९४ ते १९९८ गौरी पाठारे या पद्माताई तळवलकर व अभिषेकी बुवा यांच्याकडं गाणे शिकत होत्या. यावर “दोन गुरू करते’ म्हणून खूप लोकांनी आक्षेप घेतला होता.
आवाज, रियाज यांची बैठक आणि आवर्तनातली शिस्त पद्माताईंकडं, तर रागविचार, भाषेची हाताळणी व केहेन यांचे संस्कार अभिषेकी बुवांकडं असं एकमेकांस पूरक असं त्यांनी शिक्षण घेतले. पुढे मुंबईच्या आणि गाण्याची आवड असलेल्या स्थळास होकार देऊन लग्न करून फेब्रुवारी १९९९ मध्ये त्या कायमच्या मुंबईस आल्या.
२०१९ मध्ये स्वरानंद प्रतिष्ठानचा माणिक वर्मा पुरस्कार गौरी पाठारे यांना मिळाला आहे. या बरोबरच गौरी पाठारे यांना अनेक पुरस्कार, मान-सन्मान, कौतुक मिळाले आहे. त्यांच्या गाण्याला लोकांनी भरभरून प्रेम व संधी दिली. गौरी पाठारे यांनी देश विदेशात अनेक मैफिली केल्या आहेत.
https://www.youtube.com/watch?v=WDNFyQl_pn8
https://www.youtube.com/watch?v=p2WXY6B12FY
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply