नवीन लेखन...

गायक महेश काळे

महेश काळे यांचा जन्म १२ जानेवारी १९७६ रोजी झाला.

शास्त्रीय संगीताच्या रसिकांसाठी महेश काळे हे सुपरिचित नाव. ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटातील गाण्यांमुळं हे नाव सर्वदूर पोहोचलं. विशेषत: तरुणाईच्या गळ्यातला ताईत म्हणून ओळखलं जाऊ लागलं. महेशचा गेल्या एक तपाचा हा प्रवास, हो तपच! तपश्चर्या, साधना या खेरीज दुसरा कुठलाही शब्द योजता येणार नाही अशी मेहनत करूनच महेशने हे यश मिळवलं आहे. महेशच्या गाण्याने लोकांना वेड लावलेलं आहे. कुठल्याही प्रकारांतलं गाणं असो, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, भावगीत, गजल, कव्वाली किंवा एखादं पाश्चिमात्य गाणे प्रत्येक प्रकार संपूर्ण ताकदीने, तो ऊर्जेने परिपूर्ण असतो. वयाच्या अवघ्या तीन वर्षाचे असतानाच महेशने आपला गायनाचा पहिला सार्वजानिक प्रयोग गोंदवले येथे केला होता. महेशने, हजारों लोकांना “पाय तुझे गुरुराया, देवपूजा देवपूजा” ऐकवून मंत्रमुग्ध केलं होते.

महेशने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून गाणं शिकण्यास सुरुवात केली. त्याची आई मीनल काळे शास्त्रीय संगीताचे क्लासेस घेत असे, वीणा सहस्त्रबुद्धे यांच्याकडे मीनल काळे संगीत शिकल्या होत्या. जेव्हा त्याची आई या शास्त्रीय संगीताचे तास घेत असत, तेव्हा महेश आलापावरून नोटेशन तयार करायचा. याच काळामध्ये त्याला संगीताबद्दल ओढ निर्माण झाली. यानंतर रवींद्र धांगुर्डे यांच्याकडे त्याने काहीकाळ शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले; पण खऱ्या अर्थाने त्याच्यातील गायक श्रोत्यांसमोर आला तो अभिषेकीबुवांमुळे. दहावीच्या सुट्टीमध्ये महेशने अभिषेकीबुवांकडून संगीताचा रियाज केला.

बुवांबरोबर कायम राहून तो त्यांचा पट्टशिष्यच झाला. या पट्टशिष्यावर बुवांनी भरपूर मेहनत घेतली. यानंतर शौनक अभिषेकींनीसुद्धा त्याला मार्गदर्शन केले. बुवांच्या सहवासामुळे महेशला शास्त्रीय संगीतातील बारकावे कळून आले. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतानासुद्धा महेश पहाटे चार वाजता उठून अभिषेकीबुवांकडे रियाजासाठी जात असे. पुणे विश्वविद्यालयातून बी.ई. इलेक्ट्रॉनिक्सची पदवी पूर्ण करताना सुद्धा फिरोदिया करंडक स्पर्धेमध्ये त्यांनी आपली छाप उमटवली आणि इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर महेश उच्च शिक्षणाकरिता अमेरिकेमध्ये गेला. अमेरिकेतील सँटा क्लारा विश्वविद्यालयातून इंजीनियरिंग मेनेजमेंट मधून मास्टर्स डिग्री संपादन केली. तसेच अमेरिकेत त्याने संगीतामध्ये (डबल) एम.एस. केले. अर्थातच नोकरीच्या पुष्कळ संधी महेशसमोर चालून आल्या. परंतु, शास्त्रीय संगीतामध्ये असलेली ओढ महेशला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून वडिलांची परवानगी घेऊन महेशने सुरवातीला नोकरी सांभाळून अमेरिकेच्या कॅलिफोनिर्यातील सनीवेल या ठिकाणी विद्यार्थ्यांकरिता शास्त्रीय संगीताचे क्लासेस सुरू केले. बघता बघता ३०० हून अधिक विद्यार्थी या क्लासला दाखल झाले. तेथे गेली १५ वर्षे तो या विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देत आहे. त्याची पत्नी सौ पूर्वा काळेची मोलाची साथ त्यांला मिळते. पाश्चिमात्य देशांत भारतीय अभिजात संगीताचं महत्व वाढवण्यामध्ये त्यांनी उपयुक्त भर घातली आहे.

भारतीय, पाकिस्तानी, अफगाणी, अमेरिकन, युरोपीयन अशी सर्व वंशांची मुले भारतीय शास्त्रीय संगीत शिकतात.जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सनीवेलमध्ये होते, तेव्हा महेशला राष्ट्रगीत गाण्याकरिता सांगण्यात आले. त्यानुसार अमेरिकेमध्ये वास्तव्य करण्याऱ्या विद्यार्थ्यांसह त्याने आपल्या भारताचे राष्ट्रगीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादर केले. लॉस एंजेलिसमध्ये प्रसिद्ध विंडप्लेअर पेद्रो युस्ताच यांच्या सोबत ‘रागाजॅझ’ बॅण्डमध्ये परफॉर्म केलंय. प्रख्यात कीबोर्ड आर्टिस्ट फ्रँक मार्टिन आणि प्रसिद्ध सॅक्सोफोनिस्ट जॉर्ज ब्रुक्स यांच्यासोबत परफॉर्म केलंय. हरिहरन, विक्कू विनायकम, झाकीर हुसेन अशा दिग्गजांबरोबर कोलॅबरेशन केलंय. प्रख्यात तालवाद्य कलाकार शिवमणींबरोबर आणि त्रिलोक गुर्टू यांच्यासोबतही परफॉर्म केलंय. प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णीनी रागमालेवर आधारित गाणं रचलं आहे. या डय़ुएटचं रेकॉर्डिग प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवतीसोबत महेशनी केलं. ‘सूर निरागस हो’ या कार्यक्रमात त्यांनी परीक्षकाची भूमिका महेशने उत्तम रीतीने निभावली होती. देशविदेशातील तरुणवर्गाशी महेश संवाद साधतो सुरांच्या भाषेत. महेश काळेनी भारत, अमेरिका व्यतिरिक्त कुवैत, यूके, इत्यादी देशांतून हजारों मैफली आपल्या जादुई आवाजात रंगावल्या आहेत.

कट्ट्यार या नाटकासाठी भारतात महेशला पुन्हा भारतात आणण्याची संधी राहुल देशपांडे यांनी शोधून काढली. त्यांनी कट्यार काळजात घुसली हे संगीत नाटक सुरू करण्याचा निर्णय घेतला यावेळी सदाशिवच्या भूमिकेकरिता महेश काळे याला निवडले. त्याच्याशी अमेरिकेमध्ये संपर्क करून त्याला या संगीत नाटकाची स्क्रीप्ट पाठवली. महेश काळे यांनी अमेरिकेतच या स्क्रिप्टवर काम केले. तिथं तालमी करूनच तो भारतात आला. भारतात आल्याआल्या तो तत्काळ प्रयोगात सहभागी झाला. आज या नाटकाचे १०० हून अधिक प्रयोग पूर्ण झाले आहेत.

‘स्टार प्रवाह’वर ‘नकुशी..तरीही हवीहवीशी’ या मालिकेचं टायटल साँग महेशनं संगीतबद्ध केलं आहे. महेश काळेने २०११ मध्ये सवाई गंधर्व कार्यक्रमात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

२०१५ मध्ये, सुबोध भावे यांनी दिग्दर्शित केलेल्या “कट्यार काळजात घुसली”ह्या फिल्ममध्ये महेश काळेचा आवाज ‘सदाशिव’च्या महत्वपूर्ण भूमिकेच्या पार्श्वगायनासाठी वापरला. या चित्रपटात महेश काळेला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..