माणिक अमर वर्मा यांचा जन्म १६ मे १९२६ रोजी पुणे येथे झाला. त्यांचे माहेरचे नांव माणिक दादरकर होते. त्यांच्या आई गायिका होत्या त्यांचे नांव होते हिराबाई दादरकर . त्यांचे बालपण सुरांच्या सानिध्यात गेले. भारत गायन समाजातील अप्पासाहेब भोपे आणि नंतर भास्करबुवा बखले यांचे शिष्य बापूराव केतकर, बागलकोटकर बुवा यांच्याकडे प्रारंभीचे शिक्षण झाले. तानरस घराण्याचे इनायत ख़ाँ , हैदराबादचे बशीर ख़ाँ यांचेही मार्गदर्शन त्यांनी घेतले. वयाच्या अकराव्या वर्षी सुरत येथे झालेल्या त्यांच्या मैफलीतील गाण्याने ओकारनाथ ठाकूर यांच्यासारख्या गायकाने त्यांची प्रशंसा केली. त्यानंतर माणिकताईनी सुरेशबाबूं माने आणि हिराबाई बडोदेकर त्यांच्याकडे किराणा घरण्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर आग्रा घराण्याचे पं. जगन्नाथबुवा पुरोहित ‘ गुणिदास ‘ यांच्याकडूनही तालीम घेतली. तर अलाहाबादच्या भोलानाथ भट्ट यांच्याकडून त्यांनी काही बंदिशी आणि ठुमरी दादऱ्याच्या रचना घेतल्या. अनेक दिग्ग्ज गायकांकडून त्यांनी ज्ञान गोळा केले , अशा चौफेर शिक्षणामुळे त्या सर्व प्रकारच्या गाण्यात निपुण झाल्या उदाहरणार्थ ख्याल, ठुमरी-दादरा , भावगीत आणि भजन . भास्करबुवा , हिराबाई , सुरेशबाबू ,भोलानाथ , बालगंधर्व या सर्वांकडून त्यांना खूप काही शिकता आले. त्यांच्या आवाजात विलक्षण गोडवा होता. . माणिकताई दिपकेदार , देवगिरी बिलावत समर्थपणे पेश करत. त्यांनी आपली परंपरा जपून नवतेचाही स्वीकार केला. त्यांनी त्यांचे गाणे पांडित्यपूर्ण किंवा जाड केले नाही. अगदी सहजसोपी वाटावी अशी गायकी बनवली. सर्व प्रकारच्या गानप्रकारावर त्यांची सारखीच हुकूमत होती. माणिक वर्मा ह्या खऱ्या अर्थाने गायिका होत्या ज्याचे गाणे घराघरात गेले , अगदी सामान्य माणूसदेखील त्यांच्या गाण्याचा आनंद घेत असे. माणिक वर्मा यांनी संगीतकार सुधीर फडके यांनी संगीत दिलेल्या ‘ पुढचं पाऊल ‘ या चित्रपटातील लावण्यादेखील गायल्या आहेत.
जेव्हा एच . एम. व्ही. ने त्यांच्या मालकंस , भटियार , श्यामकल्याण , देस , मारवा या आणि अन्य रागातील ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्यावर त्यांची ख्यालगायिका म्ह्णून कीर्ती देशभर पोहोचली. माणिक वर्मा यांचे ‘ बालगंधर्व ‘ हे दैवतच होते. त्यांनी त्यांचीच गायकी अनुसरली.
माणिक वर्मा यांनी वयाच्या अकराव्या वर्षी म्हणजे १९३९ साली दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेली चार भावगीते गायली आणि दोन ध्वनिमुद्रिकामध्ये गाऊन ह्या क्षेत्रात त्या आल्या. अर्थात चित्रपटगीतांच्या बाबतीतही त्यांचे महत्वाचे स्थान आहे. प्रभात कंपनीच्या हिंदी ‘ गोकुल ‘ या चित्रपटात सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेले गीत त्यांनी प्रथम गायले. परंतु त्यांनी जास्त गाणी हिंदीपेक्षा मराठी चित्रपटांसाठी गायली. माणिक वर्मा यांनी असंख्य भावगीते , भक्तिगीते , चित्रगीते गायली आणि ती सर्व गाणी आजही आपल्या संस्कृतिक जीवनाचा भाग बनून राहिली आहेत. उदाहरणार्थ ‘ सावळाच रंग तुझा ‘ , ‘ गळ्याची शपथ तुला ‘, ‘ शरदाचे चादणे ‘, ‘ घननीळा लडिवाळा ‘, ‘ बहरला पारिजात अंगणी ‘, जाळीमंदी पिकली करवंद ‘ , ‘ गोकुळीचा राजा ‘ , ‘ सगुण निर्गुण ‘, ‘ अंगणी गुलमोहर फुलला ‘ , कौसल्येचा राम बाई ‘, ‘ जा मुली शकुंतले सासरी ‘ , ‘ अमृताहुनी गोड ‘,’ जनी नामयाची रंगली कीर्तनी’, ‘ विजयपताका श्रीरामाची ‘ ,’ चांदण्या रात्रीतले ‘ , ‘ क्षणभर उघड नयन देवा ‘ अशी असंख्य गाणी गायली अगदी दत्ता डावजेकर यांच्यापासून अशोक पत्की पर्यंत अनेक संगीतकरांची गाणी गायली.
पुढे कवी अमर वर्मा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांनी आपले गाणे साभाळून संसारही नेटका केला . कितीही घरचे काम असले तरी त्या गाण्यासाठी वेळ काढत. गाण्याशिवाय एकही दिवस त्यांनी काढला नाही . हिराबाई बडोदेकर यांच्यानंतर माणिक वर्मा यांचे नाव आदर्श गायिका म्ह्णून घेतले जात असे. त्यांनी त्यांच्या शिष्याना मुक्तहस्ते शिकवले. आशा खाडिलकर , शुभा जोशी , अर्चना कान्हेरे , शैला दातार यांच्यासारख्या अनेक शिष्या त्यांनी तयार केला.
माणिक वर्मा यांना चार मुली आहेत त्यांची नांवे भारती आचरेकर, अरुणा जयप्रकाश , वंदना गुप्ते , राणी वर्मा अशी आहेत . गजानन दिगंबर माडगूळकर यांनी लिहिलेल्या आणि सुधीर फडके यांनी चाली बांधलेल्या गीतरामायणातील काही गाणी माणिक वर्मांच्या आवाजात होती. पुणे आकाशवाणी केंद्रावरून इ.स. १९५५ साली प्रसारित झालेल्या या साप्ताहिक संगीतकार्यक्रमात त्यांच्यासह सुधीर फडके, बबनराव नावडीकर, योगिनी जोगळेकर इत्यादी गायकांचा सहभाग होता.
माणिकताईची गाणी खूप वेळा प्रत्यक्ष मला ऐकायला मिळाली म्ह्णून मी स्वतःला आणि आमच्या पिढीला भाग्यवान समजतो. एक वेगळे सात्विक गाणे , सात्विक व्यक्तिमत्व होते . आजही त्यांचे गाणे ऐकू आले तर त्यांची गाणे गाणारी त्यांची सात्विक मूर्ती नजरेसमोर, मनासमोर येते.
१९७३ मध्ये त्या मेंदूमधील तापाने अंथरुणाला खिळल्या परंतु त्या दुखण्यातून त्या जिद्दीने बाहेर आल्या आणि परत गाणे गाऊ लागल्या.
माणिक वर्मा यांना भारत सरकारने १९७४ साली ‘ पद्मश्री ‘ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांना संगीत अकादमी पुरस्कार , त्याचप्रमाणे आय. टी .सी. संगीत रिसर्च अकादमी ‘ पुरस्कार , ग.दि.मा. पुरस्कार १९९५ मध्ये मिळाला.
त्याना अंजायनाचा विकार जडला आणि त्यांचे 10 नोव्हेंबर १९९६ रोजी निधन झाले.
– सतीश चाफेकर.
Leave a Reply