नवीन लेखन...

गायिका मुबारक बेगम

३०-३५ वर्षापूवीची गोष्ट असेल, ठाण्यात आमच्या दीपक बिल्डिंग मधील माझ्या घराच्या दारात ती उभी होती, मला स्वाक्षरी देत होती, मी तिच्याकडे फक्त बघत होते आणि कानात गाणे घुमत होते, ‘ कभी तनहाईयोमे यू हमारी याद आयेगी…’ आमच्याच बाजूला राहणाऱ्या मेहमूद खाकीयांनी यांच्याकडे ती आली होती एका कार्यक्रमाला जाणयासाठी..तिचे नाव होते मुबारक बेगम. त्याच्याबरोबर सुप्रसिद्ध संगीतकार एन. दत्ता पण होते.

मुबारक बेगम म्हटले की ‘ मुझको अपने गेले लागलो ए मेरे हमराही..’ हे गाणे अनेक गाणी आठवणारच. त्यांचा जन्म १९३५-३६ सालचा होता निश्चित साल आणि तारीख उपल्बध नाही. ती मूळची राजस्थानची त्यांची दादी नवलगड येथे राहणारी होती तर त्यांची आई झुनझुनु येथे राहणारी होती. मुबारक बेगम यांचा जन्म राजस्थानमधील झुनझुनु येथे झाला. त्यांच्या आईचे नाव चांदबीबी असे होते. त्यांचे वडील लॉरी चालवायचे. लहान मुबारकला चित्रपट बघण्याची खूप आवड होती. तिला पहिल्यांदा चित्रपट बघायला त्याच्या वडिलांनी नेले होते परंतु ती तिथे झोपून गेली. दुसऱ्या वेळी मुबारक ने सांगितले मला सिनेमा बघायचा आहे, तेच तिचे वडील तिला म्हणाले तू सिनेमा बघायला येतेस आणि झोपतेस तेव्हा मुबारक म्हणाली, मी सिनेमा बघेन झोपणार नाही. तिला सुरय्या, नूरजहाँची गाणी आवडायची आणि ती गाणी ती चांगली म्हण्याची. तिचे वडील म्हणाले आपण मुबारकला मुबंईला नेऊ परंतु त्याआधी ते तिला बडोदा, अहमदाबादला घेऊन आले. तिच्या वडिलांना कुणीतरी सांगितले ह्या मुलीला थोडे गाण्याचे शिक्षण द्या म्ह्णून अहमदाबादला खांसाहेब अब्दुल करीम साहेबांचे भाचे रिआउजुद्दिन आणि समद खान ह्या दोघांनी मिळून मुबारक बेगम यांना दोन वर्षे गाणे शिकवले. मुबंईत आल्यावर त्यांची गाणी ऑल इंडिया रेडिओवर गाणी व्ह्यायची. त्यांचे गाणे रफिक गजनवी यांनी ऐकले आणि त्यांना मेहबूब स्टुडिओमध्ये बोलवले परंतु तेथे त्या गाणे गाऊ शकल्या नाहीत कारण तेथे अनेक लोक जमले होते त्या नर्व्हस झाल्या होत्या. पुढे कमाल साहेब एक चित्रपट बनवत होते त्यांचे नाव होते ‘ दायरा ‘. त्यांना लगेच गाणी हवी होती. त्यांनी त्यांच्या गाण्याचे रेकॉर्डिंग केले.

कमाल साहेबखुष झाले त्यातले, ‘ देवता तुम हो मेरा सहारा, मैने थामा है दामन तुम्हारा..’ त्यातील सर्व गाणी हिट झाली. एकदा त्या एस.डी.बर्मन यांच्याकडे गाण्यासाठी गेल्या, त्यांनी त्यांना गाणे ऐकवले तेच बर्मनदादा म्हणाले, ‘ ठीक है, ठीक है, आवाज को पालिश करो ‘. परंतु दोन-चार वर्षांनी बर्मनदादांनी त्यांना बोलवले ‘ ते देवदाससाठी. देवदाससाठी मुबारक बेगम यांनी गाणे गायले, तेव्हा त्यांनी विचारले बर्मनदादा गाणे कसे झाले तेव्हा ते म्हणले गाणे खूप चांगले झाले. तेव्हा मुबारक बेगम म्हणल्या तीन-चार वर्षांपूर्वी तुम्हीच म्हणाला होतात ‘ आवाज पॉलीश करो ‘. तेव्हा ते खुष होऊन हसले.

मुबारक बेगम यांनी माष्टर कृष्णराव, खेमचंद्र प्रकाश, वसंत देसाई, सी. रामचंद्र, अनिल विश्वास, मदनमोहन यांच्याकडे गाणी गायली. १८५८ मध्ये त्यांचे सलील चौधरी यांनी संगीत दिलेले ‘ हम हाल-ए -सुनायेंगे, सुनिये की न सुनिये..’ हे गाणे खूप गाजले. दुसरीकडे त्यांची धाकटी बहीण मुमताज बेगम ही पण चित्रपटात कामे करू लागली. तिचे चित्रपटातले नाव ठेवले होते ‘ विजयबाला ‘. तिने पृथ्वीराज कपूर यांच्या ‘ पैसा ‘ या चित्रपटात काम केले. आपल्या बहिणीलाच त्या चित्रपटात मुबारक बेगम यांनी आवाज दिला होता. त्याचप्रमाणे तिने चंगेजखान, गृहस्ती अशा अनेक चित्रपटातून तिने काम केले. त्यानंतर मुबारक बेगम यांचे गाजलेले गाणे निर्माण झाले ते ‘ हमारी याद आएगी ‘ हा चित्रपट आला आणि त्यातील ‘ कभी तनहाईयोमे यू हमारी याद आयेगी..’ हे त्यांचे गाणे मी ३०-३५ वर्षांपूर्वी त्यांच्या तोडून प्रत्यक्ष एकले होते….खूप वेळा एकले पण कान अतृप्तच राहिले. केदार शर्मा यांचा तो चित्रपट होता आणि त्याचे संगीत दिले होते व्ही. जी. भाटकर म्हणजे स्न्हेलं भाटकर यांनी. त्यांचे ‘ मुझको अपने गले लगाओ ऐ मेरे हमराही…’ हे गाणे आणि त्यांची अनके गाणी कुणीही विसरू शकत नाही. सुमारे तीन वर्षांपूर्वी त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला मुबंईत गेलो होतो त्यावेळी त्याच्याबरोबर गायिका ‘ शारदा ‘ ही आली होती. मुबारक बेगम गाणे गात होत्या त्यांच्या तब्येतीमुळे गाण्यामध्ये त्यांना ठसका लागला, गाणे थांबले परंतु ते गाणे ‘ शारदा ‘ यांनी पुरे केले आणि शेवटच्या ओळी परत मुबारक बेगम म्हणूं लागल्या.

त्यांची खूप गाणी सांगता येतील की ती गाजली. ‘ बेमुरवत, बेवफा, बेगाना दिल आप है..’ हे गाणे गाजले हे गाणे लिहिले होते मशहूर शायर जान निस्सार अख़्तर म्हणजे जावेद अख़्तर यांचे वडील. त्याची गाणी लोकांना खूप आवडायची, अनेक संगीतकरांनी त्यांना गाणी दिली परंतु पुढे संगीतकार मुबारक बेगम यांना त्यांच्या मनात गाणी देण्याचे असे परंतु हळूहळू मुबारक बेगम याचा पत्ता कट होऊ लागला ह्याच्या मागे कोणाचे राजकारण होते ते सर्वश्रुत आहेच. जब जब फुल खिले मधील ‘ परदेसी अखिया मिलाना..’ फेमसमध्ये रेकॉर्डिंग झालेले गाणे, मुबारक बेगम यांनी गायले परंतु ते कट झाले कारण दिले की ते गाणे डूएट आहे म्हणून परंतु ते गाणे सोलोपण स्त्रीच्या आवाजात आहेच त्या चित्रपटात. दिवसाला त्यांची तीन-चार रेकॉर्डिंग्ज असायची परंतु १९६५ नंतर ती कमीकमी होऊन बंद झाली, आवाज चांगला असूनदेखील. या असल्या घाणेरड्या राजकारणामुळे मुबारक बेगम अक्षरशः अज्ञातवासात गेल्यासारख्या झाल्या. संपूर्ण आयुष्यावर त्याचा परिणाम झाला. आकाशवाणीवर त्यांना मधूनमधून बोलवायचे त्यामुळे पैसे मिळायचे पण ते तरी किती मिळणार. अनेक लोकांना तिने फोन केले पण अनेकजण ते फोन टाळत, हे सर्व कुणामुळे होत आहे याची तिलाच काय सर्वाना कल्पना होती. त्यामुळे ती दुःखी झाली होती, हताश झाली होती. तिचा साधा सरळ स्वभावच तिला नडला होता. आपण जसे असतो तसे सर्व असतातच असे तिला वाटत होते आणि त्यामुळेच तिची अशी अवस्था झाली.

राहण्याच्या जागेपासून, खाण्याच्या पैशाची चिंता भेडसावू लागली. सरकारी कलाकार म्ह्णून भत्ता मिळत होता अवघा ७०० रुपये महिना म्हणजे फक्त १२ डॉलर महिन्याला. पुढे पाच-सातशे रुपये वाढले. परंतु अशी वेळ का आली हे माहित असून देखील निर्दयी इंडस्ट्रीमधून फारच थोडे लोक पुढे आले. पुढे त्यांची मुलगी वारली जी त्यांची देखभाल करत होती, मुलगा टँक्सी चालवून पैसे कमवत होता ते अपुरेच पडत होते.

मुबारक बेगम यांनी आईए, बसेरा, दायरा, औलाद, चांदणी चौक, देवदास, बादल और बिजली, मधुमती, आरजू, सिस्टर, एक बेचारा अशा अनेक चित्रपटातून त्यांनी गाणी गायली त्यांचा शेवटचा चित्रपट होता नयी इमारत तो 1958 साली आला.

मला आठवतंय माझं रेकॉर्डिंग आकाशवाणीला होते. ते झाल्यावर समोरच्याच हॉटेलमध्ये चहा पीत होतो. लांबूनच मी एका स्त्री ला कॉउंटरवर पाहिले. ती चिल्लर मोजून देत होती, बरीच चिल्लर होती. मी सहजपणे त्या वेटरला म्हणालो, त्या बाईना ओळखतॊस तर तो म्हणाला ये औरत हमेशा आती है, बहुत चिल्लर देती है, कुपन के लिये. मी त्याला नीट सांगितले ती कोण आहे ते आणि उसको जो मगता है वो दो, मी कॉउंटरवर तिला भेटल्यासाठी जाणार तेवढ्यात ती गेली होती. मी माझ्या परीने कॉउंटरच्या माणसाला सांगून ठेवले त्या माणसाची माझी ओळख नसताना देखील. पुढे काही दिसली नाही निदान मला तरी.

मुबारक बेगम यांनी सुमारे ११५ चित्रपटात १७८ गाणी गायली होती. शेवटच्या दिवसात त्यांची तब्येत खूप बिघडली होती, पैसे नव्हते. सलमान खान आणि अनेकांनी त्यांना आजरपणात मदत केली.

कवी सुरेश भट यांच्या शब्दात सांगायचे झाले तर, ‘ मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते…’ अशी त्यांची अवस्था होती.

आखिर मुबारक चली गयी,
जब थी तब बहुत सताया
जिंदगीने
अब उसकी
आवाजही
हमे मजबूर करेगी
सोचनेसे……

मुबारक बेगम यांचे १८ जुलै २०१६ रोजी मुंबईत जोगेश्वरी येथे त्यांचे निधन झाले.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..