
लोकसंगीताच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या गायक नंदेश उमप यांचा जन्म २० डिसेंबर १९७५ रोजी झाला.
दिवगंत लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी आपल्या घरात जी लोकसंगीताची गायकी रुजवली आणि जोपासली, तीच त्यांच्या पश्चात नंदेश सांभाळतो आहे. लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्याबरोबर वयाच्या आठव्या वर्षी नंदेश रंगमंचावर गायला उभा राहिला. तेव्हापासून जवळजवळ पंचवीस-तीस वर्षं नंदेश त्यांच्याबरोबर, त्यांच्या साथसंगतीने गात होता, घडत होता. परिणामी ‘ये दादा आवार ये…’ म्हणणाऱ्या कोळणीपासून ते ‘नाय बा किस्ना असून उपकाल, संगत तुजी नाई बली ले’ म्हणणाऱ्या पेंद्याच्या बोबड्या गवळणीपर्यंत लोकशाहिरांची गायकी नंदेशने सहीसही उचलली.
घराणंच लोकसंगीतकारांचं असल्यामुळे त्यासाठी लागणारा खुल्या आवाजाचा बाज नंदेशकडे जन्मतःच होता. पण शाहिरांच्या म्हणजे विठ्ठल उमपांच्या अस्सल गावरान गायकीचा वारसा त्याला मिळाला आणि त्याची गायकी उजळून निघाली. केवळ गायकीच नाही, तर लोककलावंतांसाठी आवश्यक असलेला लवचीक अभिनयाचा वारसाही त्याला मिळाला. त्यामुळेच लोकशाहिरांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या ‘जांभूळ आख्याना’चं काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला असताना, नंदेश खंबीरपणे पुढे आला. लोकशाहिरांचा ४३ मीटरचा पायघोळ अंगरखा अंगावर चढवत, थेट त्यांच्याच थाटात ‘द्रोपदीचं मन पाकुळलं’ म्हणत रंगभूमीवर उभा राहिला. मात्र वडिलांबरोबर सावलीसारखं वावरतानाही, नंदेशने स्वतःचं स्वातंत्र्य जपलं. वेगळेपण अधोरखित केलं. त्याचमुळे नाटक-सिनेमांपासून ते दूरदर्शन मालिकांपर्यंत त्याने आपल्या गाण्याचा ठसा उमटवला आहे.
नाटकाच्या क्षेत्रात त्याला पहिला मोठा ब्रेक दिला तो प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे यांनी. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या रणागंण नाटकात नंदेशने गायक-निवेदकाची भूमिका साकारली होती. तर कान्स फेस्टिवलमध्ये हजेरी लावलेल्या नंदू माधव यांच्या ‘श्वेत अंगार’ या लघुपटातली गाणी नंदेशने गायली होती. त्यानंतर आतापर्यंत नंदेशने अनेक नाटक-सिनेमा-मालिकांसाठी गाणी गायली. पण विशेष म्हणजे ‘कोक स्टुडिओ’वर गाणं म्हणणारा तो पहिला मराठी गायक होता. ते गाणं त्याने लेस्ली लुइसबरोबर गायलं होतं.
याशिवाय ‘आमी सुभाषबाबू बोलशे’ या बंगाली चित्रपटात सुभाषबाबूंवरचा बंगाली पोवाडाही गायला आहे. परंतु नाटक-सिनेमा-मालिकांत गाणी गाताना किंवा अभिनय करतानाही आपलं मूळपीठ लोककलाकाराचं आहे, ते नंदेश विसरलेला नाही. आपले लोकसंगीताचे कार्यक्रम त्याने सुरूच ठेवलेत.
नंदेश उमपला २०१२ साली बिस्मिल्लाखाँ युवा पुरस्कार देऊन संगीत नाटक अकादमीने गौरवलं होते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply