ग्वाल्हेर परंपरेचे गायक पं.दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर यांचा जन्म २८ मे १९२१ रोजी नाशिक येथे झाला.
पं. दत्तात्रय विष्णू पलुसकर यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातले पलुस. प्रसिद्ध गायक पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर ह्यांचे ते चिरंजीव होत. विनायकराव पटवर्धन हे पलुसकर यांचे गायनगुरू होत. वयाच्या चौदाव्या वर्षी द. वि. पलुसकर यांचे गाणे जालंधरला झाले होते. छोट्या अवधीमध्ये एखादा राग उत्कृष्ट प्रकारे सादर करण्यामध्ये त्यांची विलक्षण हातोटी होती. दुर्दैवाने केवळ ३४ वर्षांचे अल्पायुष्य त्यांना लाभले. पण याही छोट्या आयुष्यात पलुस्करांनी पुणे, नाशिक, कुरुंदवाड, कलकत्ता, लखनौ, बनारस, पतियाळा, जालंधर, अमृतसर अशा भारतभरांतील शहरांत शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम केले.
त्यांची गायकी देशभर लोकप्रिय होती. ’पायोजी मैने रामरतन धन पायो’, ’ठुमक चलत रामचंद्र’, ’चलो मन गंगा जमुनातीर’ ही त्यांनी गायलेली काही अत्यंत लोकप्रिय गाणी आहेत. ’सुध मुद्रा, सुध बानी’ हे गायकासंबंधी सांगितलेले कलागुण त्यांच्यात प्रकर्षाने दिसत असत.
नामवंत गायक पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर यांचे जीवनचरित्र अंजली कीर्तने यांनी लिहिले आहे. त्यासाठी पलुस्करांनी लिहिलेल्या १२ वर्षांच्या रोजनिशीचा अभ्यास कीर्तने यांनी केला होता.पुस्तकाच्या मुखपृष्ठावर जरी “गानयोगी पं.द.वि.पलुस्कर” एवढाच उल्लेख असला तरी प्रत्यक्षात पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्या सुमारे दोनशे पृष्ठांवर पार्श्वभूमीदाखल संगीताच्या “सुवर्णयुगा’ची माहिती असून, दुसऱ्या भागात (सुमारे तीनशे पृष्ठे) बापूरावांची जीवनकहाणी आहे. दोन्ही भागांतील बहुतांश मजकूर ललित शैलीत आहे. त्यात भाषेतील नाट्यमयता आणि तपशीलवार वातावरणनिर्मिती या गोष्टी विशेष जाणवतात.
बापूराव पलुस्कर आणि संगीताचे सुवर्णयुग या विषयावर लेखिका कीर्तने यांनी लघुपटही काढले आहेत.
बापूराव पलुसकर यांचे २५ ऑक्टोबर १९५५ रोजी निधन झाले. आपल्या समूहातर्फे बापूराव पलुसकर यांना आदरांजली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply