एकाच वेळी मराठी आणि इंग्रजी भाषेत दर्जेदार लिखाण करणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये अरुण साधू यांचे नाव घेतले जाते. त्यांचा जन्म १७ जुन १९४१ रोजी झाला. त्यांच्या ‘सिंहासन’ आणि ‘मुंबई दिनांक’ या दोन कादंबऱ्या मराठी साहित्यविश्वात प्रचंड लोकप्रिय ठरल्या. यावर आधारित ‘सिंहासन’ हा चित्रपटही अजराअमर ठरला. या सिनेमातील ‘दिगू टिपणीस’ हे अभिनेते निळू फुले यांनी साकारलेले पात्र अरूण साधू यांच्यावरच बेतलेले होते, अशीही चर्चा त्यावेळी झाली.
‘सिंहासन’ या सिनेमात अरूण सरनाईक, श्रीराम लागू, निळू फुले, मधुकर तोरडमल, मोहन आगाशे, दत्ता भट, सतीष दुभाषी, रिमा लागू, लालन सारंग, जयराम हर्डीकर, नाना पाटेकर या आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या भूमिका होत्या. मराठी सिनेसृष्टीतला ‘मास्टरपीस’ म्हणून या सिनेमाकडे आजही पाहिले जाते. ३० वर्ष त्यांनी पत्रकारिता केली. टाईम्स ऑफ इंडीया, स्टेटसमन, फ्री प्रेस जर्नल,केसरी, माणूस, इंडीयन एक्सप्रेससाठी त्यांनी काम पाहीलं होतं.त्रिशंकू, बहिष्कृत, स्फोट या कादंबऱ्याही प्रचंड गाजल्या.यातील बहिष्कृत ही कादंबरी जवळपास ४ दिवसांत त्यांनी लिहून पूर्ण केली होती.६ वर्ष ते पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहीलं.
२००० साली आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवरील आधारीत चित्रपटामध्येही साधू यांचे योगदान होते, या चित्रपटासाठी त्यांनी सहलेखक म्हणून भूमिका बजावली होती. काकासाहेब गाडगीळ हे पुस्तक त्यांनी इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये आणलं होतं ‘ मुंबई दिनांक’ ही कादंबरी हिंदीमध्ये ‘ बंबई दिनांक’ नावाने प्रसिद्ध करण्यात आली होती. सगळ्या पिढीचे लेखक म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली.अमेरिकेमध्ये महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ८० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. आणि ड्रॅगन जागा झाला, शापित, शुभमंगल, मुखवटा या कादंबऱ्यांचेही लेखन केले.
झिपऱ्या, तडजोड, शोधयात्रा या ही कादंबऱ्यांचे लेखन केले आहे. बेचका,एक माणूस उडतो त्याची गोष्टी, बिनपावसाचा दिवस,मुक्ति, ग्लानिर्भवती भारत हे कथा संग्रह प्रसिद्ध झाले. अरुण साधू यांचे २५ सप्टेंबर २०१७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply