१८ नोव्हेंबर २०१६ रोजी बाजार बंद होताना आपल्या मुम्बई शेअर – बाजाराचा निर्देशांक ( SENSEX ) २६१५० होता . अगदी आत्ता आत्ता तो २८००० अंशांच्या पातळीला स्पर्श करत होता . अगदी ” लाजते , पुढे सरते , फिरते ” अशातली गत होती . त्यामुळे सारेच मोहरलेले होते . पण मग गाडी बिनसली . आणि बघता बघता या लोकप्रिय निर्देशांकाने २००० अंशाने मार खाल्ला . जणू काही मातम झाल्यागत त्याची चर्चा सुरू झाली . आधी हाच निर्देशांक वाढत असताना त्यामागची कारणे शोधावी असे कोणालाही वाटत नव्हते . पण याच निर्देशांकाचे दक्षिणायन सुरू झाल्यावर मात्र झोप पार उडाली . निर्देशांक २७५०० आणि पुढे असताना तो तसा असावा का हे विचारात नाही कधीच घेतले , पण तो २६५०० अंशांच्या खाली येताच मात्र सगळे एकदम विचारमग्न . मग काय ? सायरस मिस्त्रीची उचलबांगडी , अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल ( अनपेक्षित ? ) , मोदी सरकारचा नोटा – बदलिचा निर्णय असे सगळे मुद्दे सुचायला लागले . आपल्या सगळ्यांनाच . ही कारणे कि सबबी ? हे समर्थन कि सारवासारव ? ही आपणच आपली घालून घेतलेली समजूत कि आपल्याच व्रुत्तीचे लंगडेपण ? हे सगळे जसे एकच आहे ना ; अगदी तसेच या निर्देशांकाच्या चढ – उताराचे आहे हो !
हे सगळे अनुभवत असताना मला अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ” ऐ दिल हैं मुश्किल ” या सिनेमातला एक संवाद सारखा आठवत होता . त्यात अलिजे ( अनुश्का शर्मा ) आयन ( रणबीर कपूर ) ला सांगते कि ” ( तुम्हारा ) सिर्फ खिलौना छीना हैं ; कोई दिल नही टूटा हैं ” .
या संवादाला असणारी या सिनेमातील पार्श्वभूमी ही इथे आवर्जून लक्षात घेण्याजोगी आहे . रणबीर कपूरची मैत्रीण आणि अनुश्का शर्माचा तिच्या घरच्यानी ठरवलेला नवरा ( दोन्ही या सिनेमातले हो ) यांना हे दोघं नको त्या अवस्थेत बघतात . त्यावर फारच अतिरन्जित आणि नाटकी पद्धतीत रनबिर प्रतिक्रिया व्यक्त करतो . तेंव्हा आयुष्याकडे मोकळ्या , रोखठोकपणे पाहानारी अनुश्का त्याला त्याची जाणीव करून देत इतक काहीही झालेले नाही किंवा असे काहीतरी , कधीतरी होणारच होते असे सांगताना म्हणते कि ” तुम्हारा सिर्फ खिलौना छीना हैं ; कोई दिल नही टूटा हैं ” .
हे विधान वेगळ्या संदर्भात , वेगळ्या अर्थाने आपल्या शेअर – बाजारांच्या निर्देशांकाबाबतही लागू पडते कि ! ! निर्देशांक १५०० – २००० अंशांनी जरूर कमी झाला आहे . पण आपल्या देशांच्या आर्थिक परिस्थितीत खूप मोठी घसरण झाली आहे असे काही निर्देशान्काच्या अधोगतीचे कारण नाही ना ! झाले असले तर फक्त इतकेच झाले आहे की ” सिर्फ खिलौना छीना हैं ; दिल नही टूटा हैं ”
असं लिहीत असताना सहजच असा विचार मनात आला कि असं काही लिहिण्याचा मला नैतिक आधिकार आहे का ? पण मग वाटले कि असा आधिकार मला आहे . कारण बाजाराकडे पाहण्याचा असाही एक द्रुष्टीकोन असू शकतो कि ! आणि दुसरे म्हणजे या काळात , टप्प्याटप्प्याने पण मोठ्या रकमेची प्रत्यक्ष गुंतवणूक मी केली आहे कि ! मला आर्थिक द्रुष्टीने सक्षम वाटणार्या कंपन्याचे शेअर्स मी या काळात खरेदी केले आहेत आणि होता होइतो ती दीर्घकालिक गुंतवणूक म्हणून केली आहे .
पैशांची असो नाहीतर भावनांची , तुमच्या – माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांची गुंतवणूक आपसूकच , अगदी सवयीने दीर्घकालिक च असते .
एकंदरीत काय , आपली राष्ट्रीय अर्थव्यवस्था आपण भारतीय नागरिकांना , आणि पर्यायाने निर्देशांकाच्या माध्यमातून जगभर सर्वानाच , हेच सांगत आहे कि झाले आहे इतकेच कि ” सिर्फ खिलौना छीना हैं ; कोई दिल नही टूटा हैं ”
असा विचार करत असतानाच एकंदरीतच शेअर – बाजार आणि ” ऐ दिल हैं मुश्किल ” या दोन गोष्टीत असणारी अनेक साम्यस्थळ लक्षात यायला लागली . या सिनेमातील दोन पाकिस्तानी कलाकारांच्या सहभागामुळे या सिनेमाच्या वितरणाबाबत वादंग झाले . दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ते अनावश्यक नक्कीच नव्हते . यातल्या एका पाकिस्तानी कलाकाराचे सिनेमातील भुमिकेचे नाव ” अली ” . अलिजे ( अनुश्का शर्मा ) त्याच्या प्रेमात . पूढे त्याच्याशी ती लग्न ही करते . पण तो अनुभव काही फारसा सुखद नसतो आणि म्हणून ती त्याच्यापासून दूर होते असे या सिनेमात दाखवले आहे . हे कीती सांकेतिक आहे ? पाकिस्तान ला कितीही चान्गुलपनाने वागवा , ते वाईटच अनुभव देणार हे या सिनेमात आहे ही गंमतच आहे . पाकिस्तानी कलाकारांच्या सहभागामुळे वादग्रस्त बनलेल्या सिनेमातच अस असाव अशा अर्थाने विरोधाभासी गंमत . असा प्रकार गुंतवणूक क्षेत्रातही वेगळ्या प्रकारे घडू शकतो कि !
तसेही गुंतवणूक क्षेत्र बदनाम आहे हे एक साम्य .
त्याशिवाय गुंतवणूक आणि करमणूक ही दोन्ही क्षेत्रे अशी आहेत की एरवी या दोन्ही क्षेत्रांना सरकारी हस्तक्षेप नको असतो ; पण हे अडचणीत आले की सरकार ने आपण हून यांना मदत करावी अशीच यांची अपेक्षा असते .
गुंतवणूक आणि करमणूक या दोन क्षेत्रातील तिसरे साम्य म्हणजे काळा पैसा आणि अवैध मार्गाचा पैसा या दोन क्षेत्रात येत असतो अशी कुजबूज सुरु असते .
” ऐ दिल हैं मुश्किल ” या सिनेमाचा हवाला देत सांगायचे तर गुंतवणूक आणि करमणूक या दोन क्षेत्रात असणारे एक अजून साम्य म्हणजे Flop आणि Blockbusters या दोन्ही शक्यता असणे .
पण त्याचवेळी हीही गोष्ट सांगितली पाहिजे की ( पुन्हा या सिनेमातलाच संवाद आधाराला घेत ) ” रोने और हँसने के बीचवाला रास्ता ” असं मानवी आयुष्याचे वर्णन करता येते . आणि अशा आयुष्याला अत्यावश्यक असणाऱ्या गुंतवणूक क्षेत्रात , विशेषतः शेअर – बाजारातही अशा संधी , पद्धती ( strategies ) ही नक्कीच उपलब्ध असतात . कारण कोणत्याही बाजारात ” . . . . दिल नही टूटा हैं ” असं असतेच .
” असन्गाशी संग , प्राणांशी गाठ ” अशी सर्वसाधारण सर्वत्र परिस्थिती असताना शेअर – बाजार मात्र आपला चुकलेला निर्णय सुधारण्यास संधी देत असतो . आपल्या आयुष्यात , आपल्या गुंतवणुकीत असे जे काही ” पाकिस्तान ” असेल ते बाजूला करण्यास , सिनेमात जे धाडस अनुश्काची अलिजे दाखवते ते आपण दाखवणार कि तो भावनेचा प्रश्न करत निश्कारणच स्वतःच स्वतःचीच ” ऐ दिल हैं मुश्किल ” अशी परिस्थिती करून घेणार हा प्रश्नच असतो . कारण त्यासाठी ” सिर्फ खिलौना छीना हैं ” कि ” दिल टूटा हैं ” या प्रश्नाचे आपलेच आपल्यालाच उत्तर द्यावे लागते . देत राहावे लागते .
याचे सोपे , साधे स्वरूप म्हणजे आकर्षक आणि कुचकामि विरुद्ध कदाचित कधी अनाकर्शक पण भक्कम यांत फरक असतो हे समजून घेत तसेच सातत्याने वागणे आपण अंगवळणी पाडून घ्यायला हवी . या सिनेमातील संवाद तोंडी लावायला घेत सांगायचे झाले तर ” अमीर – रईस ” , ” इजाजत – जसबात ” , ” मोहोब्बत – आदत ” यातला फरक समजून घेणं गरजेचे असते . कारण ” सिर्फ खिलौना छीना हैं ; दिल नही टूटा हैं ” .
अशा वेळी या सिनेमात अनुश्का शर्मा ( अलिजे ) रणबीर कपूर ( आयन ) ला त्याच्या घरी येताना निवडुंग भेट म्हणून देतांना किंवा ती फूल का देत नाही जे सांगते ते इथे वेगळ्या अर्थाने समजून घेतले तर ! ” फूलों के रंग बिखर जाते हैं , खुशबू निकल जाती हैं ” ह्या तिच्या वाक्याप्रमाने गुंतवणूकीच्या संधी कोणत्या आणि टिकाऊ स्वरूपाच्या कोणत्या हा विचारी विवेक कधीही अनाठायी नसतो .
हा सिनेमा काय किंवा आपली भावनिक – आर्थिक गुंतवणूक काय , अतिशय गाभ्याचे काय यावर लक्ष देणे महत्वाचे असते . या सिनेमाचाच दाखला देत सांगायचे तर ” वो मेरा शोहर ( नवरा ) हैं ; मेरा वजूद ( अस्तित्व ) नही हो सकता ” हे आपण निक्शून बजावत अंमलात आणले तर आपली कोणतीही गुंतवणूक अयशस्वी होणे कठीण होईल . मात्र त्यासाठी ” सिर्फ खिलौना छीना हैं . . . . . ” या निकषांवर तपासणी होणे आवश्यक आहे . ( जाता जाता , वजूद या शब्दाचा एक अर्थ जसा अस्तित्व आहे ; तसे या शब्दाचे देह , स्रुशटी , प्रकट होणे असॆ इतरही अर्थ आहेतच कि आणि यातल्या कोणत्याही अर्थाने . . . . . . )
नवरा , लग्न असा संदर्भ सुरू आहे म्हणून याच सिनेमातील अजून एका विधानाची आठवण झाली . सबाह ( ऐश्वर्या राय बच्चन ) अयान (रणबीर कपूर ) ला सांगते कि ” कवीने लग्न केलेच पाहिजे . कारण साथीदार चांगला मिळाला तर आयुष्य चांगले जाते ; साथीदार वाईट मिळाला तर साहित्य चांगले होते ” . या दोन्ही प्रकारचा अनुभव तुम्हांला एक माणूस म्हणून सम्रुद्ध करत असतो . कवि म्हणून ही ते महत्वाचे असते आणि गुंतवणूकदार म्हणूनही . त्यातही आपण गुंतवणूक केलेल्या साधनाशी आपण सर्वच इतके भावूक असतो कि जणु काही आपण कवि म्हणून केलेली ती एक कविताच . शिवाय तसेही आपण आपल्या गुंतवणुकीत इतके सर्वार्थाने गुंतलेले असतो कि जणु काही आपले आपल्या गुंतवणुकीशी लग्नच लागलेले आहे . याच सिनेमातील संवादात सांगायचे झाले तर ” रिश्तोंकी गीली जमीन पर फिसलना ” तर होतच राहाते . हे टाळण्यासाठी एक लिटमस चाचणी म्हणजे ” सिर्फ खिलौना छीना हैं ” कि ” दिल टूटा हैं ” ?
तसे आपले आपल्या गुंतवणुकीवर एकतर्फी प्रेम असतेच कि ! आपले आपल्या गुंतवणूकीवर प्रेम नक्कीच असते ; आपल्या गुंतवणूकीचे आपल्यावर असते का ? . पण आपण या एकतर्फी प्रेमातच इतके मशगूल असतो कि काही विचारू नका आणि काही सांगू नका ! ” ऐ दिल हैं मुश्किल ” या सिनेमात कवि सबाह ( ऐश्वर्या राय बच्चन ) चा स्वखुशीने वेगळा झालेला नवरा तारिक ( शाहरुख खान ) म्हणतो कि असं एकतर्फी प्रेम सोपे नसले तरी सोयीचे असते . कारण ” एकतरफ़ा प्यार कि ताकद मेरे अकेले पे निर्भर होती हैं ” . पण असॆ एकतर्फी प्रेम सुफल संपूर्ण होत नाही ना ! गुंतवणूक तर तशी सुफल संपूर्ण करावीच लागते . नव्हे ; ती तशीच असण्यासाठीच करायची असते . आणि तसेच होण्यासाठीचा एकमेव मार्ग म्हणजे ” सिर्फ खिलौना छीना हैं ” कि ” दिल टूटा हैं ” या प्रश्नाचा चक्रव्यूह .
या प्रश्नाला चक्रव्यूह अशासाठी म्हणले कि यात अभिमन्यु होण्याचीच शक्यता जास्त असते . कारण ” मी अपूर्ण आहे हे मला पूर्णपणे माहीत आहे ” हा अनुभव प्रेमात पडणे आणि गुंतवणूक करणे यातला समान धागा आहे .
पण हा चक्रव्यूह हवाहवासा वाटणारा आहे . कारण प्रेम आणि गुंतवणूक ही दोन्ही क्षेत्रे ” तुझे नसणे मला अजमावत राहते ” अशी अनुभूती देणारी .
कोण कोणाला हे मात्र विचारायचं नाही ?
नसणे की नडण हे तर नाहीच नाही .
” ऐ दिल हैं मुश्किल ” या सिनेमातील एक वाक्य अगदी सुरुवातीपासूनच्या जाहिराती पासून खूप प्रसिद्ध झाले आहे . त्यानुसार ऐश्वर्या राय रणबीर कपूर ला सांगते की ” मै किसिकि ज़रूरत नही ; ख्वाइश बनना चाहती हूँ . ”
आजमितिला गुंतवणूक ही आपली ख्वाइश झाली आहे . ती ज़रूरत बनली पाहिजे . जरूरत म्हणले तर फार रुक्ष होते का ? मग ” ऐ दिल हैं मुश्किल ” चा हवाला देत सांगायचे तर असं वागणे ” अधूरे इश्क का जिक्र ” , ” प्यार मे जुनून ( वेडेपणा ) ” , ” दोस्ती मे सुकून ( दिलासा ) ” असं आपण आपल्या गुंतवणुकीबाबत विचार करताना वागायला शिकावे लागेल . शिकत राहावे लागेल . लागेलच . तशी प्रत्यक्षात क्रुति करणे गरजेचे असते . नुसते तसं बोलून काहिच होत नाही . ” गुफ्तगू बेचारोन की आदत होती हैं ” हेच खरं ! झालेल्या चुका विसरता येत नाहीत हे कितीही खरे असले , ” जख्मों के कर्ज अदा नही होते ” हे सत्य असले तरी त्यातून बाहेर येण्यासाठी आपले दुःख , आपले अश्रू यांवर आवर घालता यावाच लागतो . . . . आयुष्यातही आणि गुंतवणुकीतही . हे अगदीच अशक्यच नसले तरी फारसे सोपे ही नसते ना ! म्हणून तर या सिनेमात ऐश्वर्या राय रणबीरला म्हणते ना . . . . ” तुम्हारे आँसू भी कितने वफादार हैं ! तुम्हारे इजाजत के बिना बाहर भी नही आते ! ” . आपली गुंतवणूक आपल्याला असं म्हणेल तो खरा आपला दिवस ! ! ! !
तोपर्यंत आणि नंतरही आपण स्वतःला सतत हेच सांगत राहीले पाहिजे की ” आज जाने की जिद ना करो ” . कारण
” सिर्फ खिलौना छीना हैं ; दिल नही टूटा हैं ”
चंद्रशेखर टिळक
C – 402 . राज पार्क, मढवि बंगल्या जवळ, राजाजी पथ, डोम्बिवलि ( पूर्व ) ४२१२०१ .
मोबाईल – ९८२०२९२३७६
Email – tilakc@nsdl.co.in
Leave a Reply