तिच्या कॉलेजमध्ये ती एक हुशार मुलगी म्हणून ओळखली जात होती. तिने कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतल्यानंतर लगेचच मी तिच्या principal ना भेटलो होतो. आणि थोडक्यात मिर्झा-कोतवालांचे नाते समजावून सांगितले होते. त्यामुळे इथे तिला फारसा त्रास झाला नाही. बघता बघता तिने M.Sc पूर्ण केले. त्यानंतर माझी आणि रमाची इच्छा होती की तिचे लग्न करावे. परंतु हिने B.Ed करण्याचे ठरवले. व नंतर शाळेत शिक्षिका म्हणून नौकरी पकडली. तिच्या मामाची देखील आमच्या सारखीच इच्छा होती कि तिने लग्न करावे. ह्यासाठी त्याने तिचे मन वळवण्याचे खूप प्रयत्न केले. परंतु तिचे एकच उत्तर होते, “मला लग्न करायचे नाही. माझ्या आईवडिलांनी लग्न करून काय केले? मला टाकूनच दिले ना. त्यापेक्षा मी आहे ती मी आहे ती ठीक आहे.”. नौकरी करत असतानाच तिने M.Ed केले व हा शिक्षकाचा पेश स्वेच्छेने स्वीकारला.
त्याच सुमारास रमा आजारी पडली घरात अशोकचे लग्न होते. ह्या मुलीने रमाची तर सख्ख्या मुलीसारखी सेवा केली आहे. शिवाय मला आणि अशोकला मानसिक आधार दिला. अशोकच्या लग्नाच्या वेळी देखील घरातील मोठी बाई करेल तसे काम तिने केले आहे. एक नक्की सांगतो, तिच्या येण्याने आम्हाला मुलीची उणीव कधीच भासली नाही. तिच्या मामा मामीला तर काय म्हणावे? अगदी लहानपणापासून त्यांनी सितारा इतकेच प्रेम अशोकवर केले. त्याला त्या मामाने कधीच परकेपणा जाणवू दिला नाही. त्याच्या लग्नात देखील जावेद आणि झेलम माझ्यामागे भितीसारखे उभे राहिले होते. रमाच्या निधनानंतर ते आमच्याबरोबर येवून राहिले होते. तिला तिलांजली देण्यापासून सगळ्या विधीमध्ये तो आमच्या बरोबर सहभागी झाला होता.
आम्हीसुद्धा त्याच्याकडच्या चांगल्या वाईट प्रसंगात त्याच्याकडे आजही जात येत असतो. आमच्या दोघांची मुले एकमेकांकडे जातात. इतकेच नाही तर खूपशा नातेवाईकांनीही आता हे नाते accept केले आहे. थोडक्यात काय तर सितारामुळे जावेद आणि आम्ही एकमेकांचे नातेवाईक झालो आहोत. आम्ही रक्ताचे नसलो तरी नशिबाने एकत्र आलेले नातेवाईक आहोत . हे सांगणे सोपे आहे पण यासाठी आम्हाला दोघानाही आपापल्या समाजाच्या विरोधाला सामोरे जावे लागले आहे. पण आम्ही दोघांनीही सिताराच्या बालमनावर ह्याचा काही परिणाम होणार नाही याची दक्षता घेतली होती.
तशी सितारा पहिल्यापासूनच शांत स्वभावाची आहे. नशिबाच्या खेळाने तिला लहानपणीच वयाने मोठी केली आहे. लहान असताना देखील कधीही कसलाही हट्ट सुद्धा केला नाही. कधीही वेडेवाकडे वागणे नाही. आम्हाला तिला कुठल्याही गोष्टीसाठी ह्टकण्याची गरज पडली नाही. रमाचे तर ती जणू शेपूटच होती. ती हुशार तर आहेच, पण ती कुठलेही काम अतिशय तन्मयतेने करत असते. एकाग्रतेचे धडे तर तिच्याकडूनच घ्यायला हवेत. तशी तर काय ती नावाचीच मिर्झा आहे, बाकी सगळे कोतवाली संस्कार आहेत. तिने स्वतःला ह्या शिक्षण क्षेत्रात झोकून घेतले आहे. ह्या शाळेतील जास्तीत जास्त मुले उच्चशिक्षण घेऊन उच्च पदावर पोहचलेली बघण्याचे तिचे स्वप्न आहे. ती मला नेहमी सांगते, “बाबा, तुम्ही बघत रहा, ह्या मुलांना मी इतके शिक्षण देईन, की लोक म्हणतील सिताराला तिच्या आईबाबांनी किती छान संस्कार दिले आहेत.”
तुमच्या शाळेतील शिक्षकच काय हो सर, खूप लोक सुरवातीला तिच्याबद्दल वाट्टेल ते बोलत असत. तिला आता हे सगळं सहन करण्याची सवय झाली आहे. अशा प्रसंगांनी कधीकधी थोडी खचून जाते, पण माझी सून खूप चांगली आहे. ती सिताराला मोठया बहिणीसारखे मार्गदर्शन करत असते.
सर, तुम्हाला सांगतो, सितारा सारखी मुलगी तुम्हाला शोधून सापडणार नाही. ती अतिशय दयाळू आहे. आमच्या मोलकरणीरच्या दोनही मुलांचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च ती करते. ती दोन्ही मुले तुमच्याच शाळेत आहेत. एक नवव्या इयत्तेत आणि दुसरी मुलगी सातव्या इयत्तेत. तिच्या पगारातील काही भाग ती मशिदितील फकीरांसाठी खर्च करते. आता तिचा मामा वयोमानामुळे तिला भेटायला येऊ शकत नाही. परन्तु ही दर दोन महिन्यांनी त्याच्याकडे जातेच. ती आपले कर्तव्य व्यस्थित समजून आहे. आम्ही एक मात्र केले, तिला तिच्या धर्मापासून कधीही तोडले नाही. बाकी तर काय, लहानपणापासूनच आमच्या बरोबर देवळात येणे , संध्याकाळच्या वेळी शभंकरोती म्हणणे हे तर ती आमच्या घरात राहून शिकलीच आहे. अहो अथर्वशीर्ष तर स्पष्ट आणि सुंदर म्हणते. एकदा तिच्या तोंडून ऐकाच. फार गोड वाटेल ऐकायला.
अती गुणी मुलगी आहे पण आपला हा समाज तिला शांततेत जगू देत नाही बघा. आईवडील जिवंत असून देखील बिचारी पोरकी झालेली मुलगी आहे. एखाद्याचे विधिलिखित काय असते हे ते लिहिणाऱ्या परमेश्वरालाच माहित. दिसायला सुद्धा काय छान आहे बघा. तो राशीद असाच देखणा होता.
त्याच्यासारखीच दिसते ही. रमाला शेवटी तिचीच खूप काळजी होती. नेहमी म्हणायची, ‘आपल्या मागे ह्या मुलीला कोण सांभाळेल हो?’ परन्तु माझा मुलगा आणि सून दोघेही तिच्याकडे व्यवस्थित लक्ष देतात. तिला खूप प्रेमाने वागवतात. सुनेने तर सिताराला रमाची उणीव कधीही भासून दिली नाही. मुलाचे तर ठीक आहे त्याच्यासाठी ती लहानपणापासूनच बहीण आहे. परंतु सून तर दुसऱ्या घरातून आली आहे, तरीही तिने किंवा तिच्या घरच्या लोकांनी सितारावरून कुठलेही प्रश्न उठवले नाहीत. तशी आम्ही त्यांना लग्नापूर्वीच आमच्या आणि सिताराच्या नात्याची कल्पना दिली होती. जावेद व झेलमची भेटही घालून दिली होती. असे, की नंतर काही problem नको. परन्तु त्या लोकांनीही सिताराला मुलीचाच मान दिला आहे आजपर्यंत. माझ्या नातवाचे तर विचारूच नका. आत्याशिवाय पान हलत नाही. रात्री दोघे एकत्रच जेवतात.
बोलता बोलता कोतवाल साहेब गप्प झाले. बोलून बोलून थकले होते . आम्ही घड्याळात पाहिले, चार वाजून गेले होते. त्यांच्या सूनबाईने चहा आणून ठेवला व म्हणाली, गेला आठवडाभर सितारा खूप नाराज आहे. आणि खूप थकलेली दिसत होती. तिची सवय आहे संध्याकाळी येऊन बाबांजवळ बसायचे आणि दिवसभराच्या सगळ्या गोष्टी सांगायच्या, परंतु गेला आठवडाभर ती नेहमीसारखी नक्कीच नव्हती. मी तिला विचारले सुद्धा होते की, “ सितारा तुला बरे वाटत नाही का? अलीकडे शाळेतून पण लवकर येतेस. काही problem आहे का?” तर म्हणाली, “ नाही वहिनी सगळे छान आहे, आता मी रोजच लवकर येईन.” तिच्या अशा वागण्याचा अर्थ आता माझ्या ध्यानात येतो आहे. कदाचित बाबांना वाईट वाटू नये म्हणून बोलली नसावी. तिला माहित आहे, कोणीही तिला दुखावले तर बाबांना ते सहन होत नाही, त्यांना त्याचा खूप त्रास होतो. आईबाबांनी तिच्यासाठी जगाचे खूप टप्पेटोणपे खाल्ले आहेत याची तिला पुरती जाणीव आहे. त्यामुळे बाबांना त्रास होणार नाही याची ती खूप दक्षता घेते.
कोतवाल आमच्याकडे बघून हसले. त्यांच्या त्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावरचे हसणे खूप काही सांगून गेले. सकाळचा त्यांचा तो चिडलेला चेहरा आणि आत्ताचा शांत चेहरा ह्याच्यात ‘जमीन आसमानाचा’ फरक होता. आपल्या मनात इतके दिवस साठून ठेवलेले सुखदुःखाचे क्षण आपण कोणासमोर तरी बोलू शकलो ह्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. ते हसत म्हणाले, “सर, हे आहे सिताराचे सत्य. सगळ्या जगाला काय सांगत फिरायचे? लोक काहीही बोलतात, प्रत्येक बोलणाऱ्या माणसाची जीभ आपण कशी धरणार? परंतु ती एक निष्पाप मुलगी आहे. लहानपणापासूनच प्रेम शोधत ती आमच्याकडे आली . काही वेळेस असे वाटते की लहानपणीच हिच्या दत्तक विधीचे पेपर्स कोर्टात करून टाकले असते तर बरे झाले असते. पुढचे हे सगळे प्रश्न उभेच नसते राहिले. परंतु त्यावेळेस मी विचार केला होता की कदाचित ही मोठी झाल्यावर तिला आपल्या आईकडे किंवा वडिलांकडे जाण्याची इच्छा झालीच तर दत्तक घेऊन आपण तिचा हा मार्ग कायमचा बंद करू. आणि मला ते करायचे नव्हते. मला तिने तिच्या आईवडिलांपासून कायमचे दूर व्हावे हे पटत नव्हते. म्हणून तो विचार मी मनातून काढून टाकला होता.
आता तर ती मोठी झाली आहे. ती तिचा विचार करण्यास सक्षम आहे. ती जो मार्ग निवडेल त्या मार्गावर आम्ही तिची साथ देऊ. आत्तातरी तिला खूप चांगली शिक्षिका होऊन खूप मुलांचे कल्याण करण्याची इच्छा आहे. तो तिचा मार्ग बंद करू नकोस असे परमेश्वराजवळ मागणे आहे”. कोतवालांचे डोळे भरून आले होते. ह्या वयातही त्यांनी त्यांच्या हसण्यामागे डोळ्यातील अश्रूंना दडवून ठेवले होते.
“कोतवाल साहेब, तुम्ही निश्चिंत राहा. आम्ही inquiry चा योग्य तोच निर्णय देऊ. तिच्यावर अन्याय होऊ देणार नाही. आता ती फक्त कोतवालांची मुलगी आणि जबाबदारी नसून आमची देखील आहे.” मी त्यांना आश्वासन दिले. “आम्ही तिला पूर्ण सहकार्य देऊ” असा ठाकूरांनी त्यांना शब्द दिला. आणि त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. आता मात्र कोतवाल आपल्या अश्रूंना थोपवू शकले नाहीत. खूप दिवसानंतर ते एवढावेळ बोलले होते आणि wheel-chair वर बसले होते. असे त्यांची सून सांगत होती.
आम्ही त्या दोघांचाही निरोप घेऊन परत निघालो. सकाळी असा विचारही केला नव्हता की आमचा संपूर्ण दिवस इथे निघून जाईल. निघताना त्यांना आम्ही एक विनंती केली होती, की त्यांच्यापैकी कोणीही सिताराला आम्ही त्यांच्या घरी येऊन काही तपास करून गेलो हे सांगू नका. त्यांनीही ती मान्य केली होती. निघता निघता मी परत माघारी फिरलो. त्यांना विचारले, “ कोतवाल साहेब तुमच्याकडे राशीदचा एखादा फोटो आहे का? कारण मी देखील सुरतला होतो तेंव्हा मिर्झा नावाचा माझा एक विद्यार्थी होता. त्याचे नाव मला आठवत नाही. परन्तु तुम्ही म्हणता तसाच तो दिसायला देखणा होता.
कोतवालांनी सुनेला फोटो आणायला सांगितले. तिने काही जुने फोटो आणले. कोतवालांनी त्या सगळ्या फोटोंमधून एक दोन माझ्या हातात ठेवले. फोटो हातात घेतल्याबरोबर मी आश्चर्याने जवळजवळ ओरडलोच “अहो हाच तो. दुबईला जाण्यापूर्वी तो बायकोला व मुलीला म्हणजेच सिताराला घेऊन मला भेटायला आला होता. परन्तु त्या वेळेस सितारा खूप लहान होती.” काय योगायोग आहे, world is very small. हसत हसत आम्ही तिथून निघालो.
Leave a Reply