दुसऱ्या दिवशी दुपारी 1.30 वाजता स्टाफ रूम मध्ये मिटिंग बोलविण्यात आली. मुख्याध्यापकांनी आमची ट्रस्टी म्हणून ओळख करून दिली. तसे ठाकूरांना बराच स्टाफ ओळखत होता. ते जुने ट्रस्टी होते. मी मात्र नवीन होतो त्यांच्यासाठी. इनामदारांनी त्यांना सांगितले की आम्ही दोघे काही वैयक्तिक कामासाठी बलसाड येथे आलो आहोत. आमचा तीनचार दिवस सर्किट हाऊस मध्ये मुक्काम आहे. अशी ठरल्याप्रमाणे आमची थोडक्यात ओळख करून दिली. मी व ठाकूरांनी आमच्या छोट्याश्या औपचारिक भाषणामध्ये आम्ही शाळा व शाळेतील शिस्त पाहून फार खुश झालो आहोत असे सांगितले त्यामुळे त्या स्टाफ रूममधील गंभीर वातावरण थोडे निवळले. नंतर सर्व शिक्षकांनी एका नंतर एकाने स्वतःची ओळख करून दिली. ते स्वतःचे नाव सांगत होते व स्वतःबद्दल थोडी माहिती देत होते. मी आणि ठाकूर सगळ्यांचे बारकाईने निरीक्षण करत होतो व प्रत्येकाच्या बोलण्यावरून व हावभाववरून त्या व्यक्तीविषयी काही निष्कर्ष स्वतःशीच बांधण्याचा प्रयत्न करत होतो.असे क्रमाने चालत असताना पुढील क्रमावरची शिक्षिका उभी राहिली. तिने स्वतःची ओळख सांगितली “नमस्कार मी सितारा मिर्झा”
मी तिच्याकडे बघताच राहिलो. बेताचीच ऊंची, पातळसर बांधा आणि गोरीपान, निळे निळे डोळे, कुरळे केस. माझ्या आठवणीत मिर्झाची मुलगी जशी आली होती तशीच.मला थोडासा आश्चर्याचा धक्काच बसला. परन्तु मी स्वतःवर संयम ठेवला. माझे आश्चर्य कोणाच्या लक्षात येणार नाही ह्याची पूर्ण दक्षता घेतली.तिने पांढऱ्या रंगाच्या साडीला लाल किनारी असलेली साडी परिधान केली होती. मिर्झा असून कपाळावर व्यवस्थित कुंकू लावलेले होते. तिने स्वतःचा दोन वाक्यात परिचय करून दिला होता. प्रथम दर्शनी ती शांत व सालस असावी असे आमचे तीच्या बद्दल मत निर्माण झाले होते. जवळ जवळ दीड तास मीटिंग झाली. नंतर इनामदारांनी त्यांचा सगळ्याच स्टाफला सांगितले की “कोणाचेही काही काम असेल किंवा काही विचार असतील तर त्यांनी ते ट्रस्टींसमोर ठेवावे” परंतु कुठल्याही शिक्षकाने काहीच सांगितले नाही किंवा कसलीही तक्रार केली नाही.
दिवसभराचे काम संपवुन मी व ठाकूर आमच्या निवासाच्या स्थळी पोहोचलो. रात्रीचे जेवण झाले. आणि आम्ही दोघे शतपावली करीत फिरत होतो. त्या वेळेस मी ठाकुरना म्हणालो, “ ठाकूर माझ्या लक्षात आले आहे, ह्या सगळ्याचा सूत्रधार कोण असावा ते. ह्या शिक्षकांमध्ये एक देशमुख होता. कदाचित त्याने मला ओळखले नाही, परन्तु मी त्याला चांगला ओळखतो.
हा देशमुख, वीस बावीस वर्षापूर्वी माझ्याबरोबर डहाणूला नौकरीला होता . तेंव्हा तो मला खूप junior होता. त्या काळी त्याचे नुकतेच शिक्षण संपले होते व तो शाळेत नौकरीला लागला होता. त्याच्याकडे कसलाही अनुभव नव्हता. त्याची ही पहिलीच नोकरी होती. विद्यार्थयांबरोबर कसे वर्तन करावे हे देखील त्याला माहीत नव्हते. साधारणपणे मोठ्या शहरात तरी विद्यार्थी जरा समजून घेतात. परंतु छोट्या गावातले विद्यार्थी थोडे उडाण टप्पू असतात.एक तर गाव छोटे असते त्यामुळे त्यांच्यात एकी खूप असते आणि एकदा जर त्यांच्या लक्षात आले कि शाळेत नवीन आलेल्या शिक्षकाला थोडी माहिती कमी आहे किंवा ते नीट शिकवू शकत नाहीत तर मग त्या शिक्षकाला ही मुले ‘सळो कि पळो’ करून टाकतात. ह्या देशमुखच्या बाबतीत ही असेच काही झाले होते. ह्याची अगदी नोकरी जाण्याची वेळ आली होती. परंतु त्या वेळेस आमच्या शाळेत जोशी नावाचे मुख्याध्यापक होते.
जोशी अतिशय सज्जन माणूस होता.स्वभावाने फारच चांगले होते. दुसऱ्यांना मदत करणे हा तर त्यांचा विशेष स्वभावगुण होता. थोडे जास्त शिस्तप्रिय होते इतकेच. ह्या बिचाऱ्या जोशी सरांनी मुलांना समजावले होते. ह्या देशमुखला स्वतःच्या घरी नेऊन मुलांना कसे शिकवावे त्यांच्याशी कसे वागावे ह्याचे धडे दिले होते आणि ह्याची नोकरी टिकवण्यासाठी त्यांनी मदत केली होती.
परंतु हा देशमुख कसला? दोनतीन वर्षात चांगला तयार झाला आणि एकदा काही कारणावरून जोशी सर त्याला काहीतरी बोलले असतील तर ह्याचा चार लोकात अपमान झाला म्हणे. त्याचा त्याने जोशी सरांवर राग ठेवला. त्यांच्याविरुद्ध वरच्या ऑफिसात खोटी तक्रार नोंदवली. ह्या गोष्टीचा जोशी सरांना खूप त्रास झाला होता.त्यांच्यावर inquiry झाली होती.मला चांगले आठवते आहे त्यावेळेसही ह्याने असेच २-४ शिक्षक स्वतःच्या बाजूचे करून सगळे खोटे थोतांड उभे केले होते.ठाकूर मी तुम्हाला एक नक्की सांगतो बघा हा जर सगळ्याचा सूत्रधार असेल तर हा आपल्याला भेटायला नक्कीच येईल. ह्याला ह्या असल्या गोष्टी करण्याची सवय आहे”.
अजून माझे वाक्य पूर्ण झालेही नव्हते कि शिपाई सांगायला आला “सर आपल्याला भेटायला ३-४ व्यक्ती आल्या आहेत”.
मी व ठाकूरने एकमेकांकडे पहिले आणि हसलो. माझा अंदाज बहुतेक खरा ठरला होता. तांडव करणारी मंडळी आली होती. ठाकूर शिपायाला म्हणाले, “त्यांना बाहेरच्या हॉलमध्ये बसायला सांग, आम्ही येतोच’.
Leave a Reply