आज पाच वर्षांनी ती पुन्हा त्याला बसस्टॉपवर दिसली. गळ्यातील मंगळसूत्रावरून कळत होतं की तिचं लग्न झालंय. पाच वर्षानंतरसुद्धा ती तितकीच सुंदर दिसत होती. तिच्याशी बोलण्यासाठी तो तिच्याजवळ जातो आणि तिला विचारतो, “ओळखलंस?” त्याला पाहताच तिचे मन पुन्हा पाच वर्ष मागे जाते. काही वेळ तसंच त्याला बघितल्यानंतर ती म्हणते, “हो, न ओळखायला काय झालं”
तिचे हे उत्तर ऐकून तो तिला म्हणतो, “पण त्यावेळेस मी तुला ओळखण्यात चूक केली प्रतीक्षा . मला वाटलं नव्हतं की तू मला प्रेमाची स्वप्नं दाखवून दुसऱ्याच मुलाबरोबर पळून जाऊन सुखाचा संसार थाटशील. काय कमी होती माझ्यात? का माझ्या प्रेमाचा असा अपमान केलास? मी असं काय चुकीचं वागलो होतो प्रतीक्षा, ज्याची तू मला इतकी मोठी शिक्षा दिलीस?
शिक्षा? प्रतीक शिक्षा मी तुला दिली? अरे उलट शिक्षा मला मिळाली होती. त्यादिवशी ऑफिसमधून घरी परतत असताना तुझा ‘आय लव्ह यू चा’ व्हाट्सअप मेसेज आल्यावर तो वाचून मला खूप आनंद झाला. त्याला मी रिप्लाय देणार तेवढ्यात ४ – ५ जण कुठून तरी आले, माझं तोंड दाबून मला गाडीत बसवलं, माझा मोबाईल हिसकावून घेतला आणि एका सुनसान अंधाऱ्या खोलीमध्ये नेऊन मला डांबून ठेवलं. १५ दिवस मला तिथे ठेवल्यानंतर एक दिवस मला ते घेऊन जायला आले. पुन्हा मला एका गाडीत टाकलं,एका निर्जन रस्त्यावर आणून तिथे थांबलेल्या एका माणसाकडून पैसे घेऊन त्यांनी मला विकलं. तो माणूस मला त्याच्या कारमधून नेत असताना एका ढाब्यावर गाडी थांबल्यावर त्याची नजर चुकवून मी पळ काढला. खूप लांबपर्यंत पळाल्यावर एका दुकानातल्या फोनवरून मी माझ्या घरी फोन लावला. तुला माहितीये की लहानपणी आईबाबा गेल्यानंतर काकाकाकूंनीच मला सांभाळलं. मी घरी फोन केल्यावर काकू मला म्हणाली की, आता तिकडेच तोंड काळं कर, पंधरा दिवस कुणालाही न सांगता घराबाहेर राहिलेल्या मुलीशी आमचा काही संबंध नाही, आमच्यासाठी तू आता मेलीस. ते ऐकून माझं सगळं अवसानच गळून गेलं. तेव्हा मला तुझी आठवण आली. मी तुला फोन लावला. पहिल्यांदा फोन लावल्यावर तो कट झाला. पुन्हा केल्यावर तुझ्या आईने फोन उचलला आणि मला सांगितलं की तुझं लग्न ठरलं आहे, त्यामुळे इथून पुढे या नंबरवर पुन्हा कॉल करू नकोस.
हे ऐकल्यानंतर आपल्या आयुष्यातली सगळी दारं आता बंद झाली आहेत आणि आता आपल्या जगण्यात काही अर्थ नाही हा विचार करून मी रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करायला निघाले होते. मी रेल्वेखाली उडी मारणार तेवढ्यात त्या माऊलीने मला मागे ओढून माझे प्राण वाचवले. मला त्यांच्या घरी घेऊन गेली. महिनाभर त्यांच्या डॉक्टर मुलाने आणि त्यांनी मला समजावून, माझ्यावर औषधोपचार करून माझी मानसिक स्थिती सुधरवली. महिन्याभरानंतर मी त्यांच्या घरातून जायला निघाले तेव्हा त्यांनी मला विचारलं कुठे जाशील बाळा? अशी एकटीच किती दिवस घराबाहेर राहशील? त्यांच्या त्या प्रश्नाला त्यावेळेस माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. तेव्हा त्यांनी मला त्यांच्या मुलासाठी लग्नाची मागणी घातली. त्यांनी माझ्यावर इतके उपकार केले होते, त्यांच्या मुलाने पण महिनाभर माझी खूप काळजी घेतली होती, इतकं सगळं त्यांनी माझ्यासाठी काही ओळख नसताना केले असल्यामुळे मला नकार देणं शक्यच नव्हतं, मी लग्नाला होकार दिला आणि पुन्हा माझ्या आयुष्याला नवा अर्थ मिळाला.
प्रतीक, माझी बाजू न ऐकताच तू माझ्यावर बेछूट आरोप करत सुटलास? एकेकाळी जिच्यावर आपण जीवापाड प्रेम केलं तिच्यावर असे आरोप करण्याआधी तू थोडासुद्धा विचार केला नाहीस?
सॉरी प्रतीक्षा, मी तुला समजून घ्यायला चुकलो, तू मला सोडून निघून गेलीस या दुःखात मी इतका वाहवत गेलो की तुझी बाजू ऐकून न घेताच मी तुझ्यावर आरोप करत सुटलो त्याबद्दल एक्सट्रिमली सॉरी.
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात प्रतीक, पण नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा आपण कधी विचारच करत नाही आणि त्यामुळेच अनेक नाती फक्त गैरसमजामुळे, दुसऱ्याची बाजू समजून न घेतल्यामुळे तुटतात. आपण थोडा जरी दुसऱ्याच्या मनाचा, परिस्थितीचा विचार केला तर अनेक नात्यांमधलं प्रेम टिकून राहील आणि आपलं आयुष्य खूप आनंदी होईल. पण आपल्या अहंकारामुळे आयुष्यातल्या अनेक आनंदी क्षणांना आपण मुकत आहोत हे माणसाच्या कधी लक्षातच येत नाही हीच सर्वांत वाईट गोष्ट आहे.
तितक्यात तिची बस येते, ती बसमध्ये बसून निघून जाते आणि तो आपण आयुष्यभरासाठी एका मोठ्या आनंदाला मुकलो असल्याच्या दुःखी नजरेने एकटक त्या बसकडे बघत राहतो.
–छोट्याशा कथा By Sandip.
(तुम्हांला जर ही माझी “छोटीशी कथा” आवडली असेल तर पेज लाईक आणि शेअर करायला विसरू नका.)
Leave a Reply