ज्या भौतिक वस्तुच्या निर्मितीशास्त्राला इंग्रजीत “ इंजिनिअरिंग” म्हणतात त्याला शिल्पशास्त्र असे व्यापक अर्थ असलेले भारतीय नांव आहे. शिल्पशास्त्र मनुष्य जन्मापासून विकसित होत गेले. आधुनिक अभियांत्रिकी शास्त्रांत अंतर्भाव असलेली अनेक शास्त्रे प्राचीन भारतांत विद्यमान होती. भृगु ऋषींनी या शिल्पशास्त्र विषयाचे दहा उपशास्त्रे, बत्तीस विद्या व चौसष्ठ कला या मध्ये विभागणी केली. वास्तुशास्त्र हे सातवे उपशास्त्र.
वास्तुशास्त्र म्हणजे निवारा निर्मितीचे शास्त्र. वास्तु या शब्दाचा उगम “वस” या संस्कृत धातुपासून झालेला आहे. या शास्त्रात तंबु, झोपडी, घरे राजवाडे अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. वास्तुज्योतिष्य हा अगदीच वेगळा विषय आहे. वास्तुशास्त्र विज्ञाननिष्ठ आहे तर वास्तुज्योतिष्य आज अप्रासंगिक झाले आहे. पण कांही लोक (विशेषत: बांधकाम व्यवसायिक) या दोन्ही एकच दाखवण्याचा प्रयत्न करतात.
वास्तुशास्त्रात “ एक खोलीचा निवारा- म्हणजे शाला” . या विषयावर ऋग्वेदात कांही सुक्ते आहेत, शिल्पवेद हा वेदांचा एक उपवेद समजला जातो. या विषयावर यामलाष्टक तंत्र नावाचा हस्तलिखित ग्रंथ उपलबध आहे. त्यात दोन ते चार खोली असलेल्या घरांचे वर्णन आहे.
वास्तुशात्रावर पाच हजाराहून ग्रंथ असावेत. त्यातील एक हजार ग्रंथाची नावे आज ज्ञात आहेत. बरेचसे ग्रंथ नष्ट झाले आहेत. (यापैकी अंदाजे १२५ ग्रंथ माझे संग्रही आहेत.)
प्राचीन काली नियोजित वास्तुचा स्वामी (यजमान) हा स्वत: स्थपतीकडे ( मुख्य अभियंता किंवा वास्तु रचनाकार) जाऊन, नियोजित वास्तुसंबधी त्याच्या काय अपेक्षा आहेत व आर्थिक मर्यादा काय आहेत याची त्याला कल्पना देता असे.
स्थपतीने वास्तु रचना करतेवेळी कोणती सहा सुत्रे लक्षात ठेवावी याचे वर्णन खाली देत आहे.
१-यजमानाची आर्थिक क्षमता लक्षात घेऊन वास्तुमधिल सुखसोयींचे नियोजन करावे.
१.भोगो यज्ञानुसारी स्याद्।
वास्तु किमान ५ व्यक्तींसाठी असावी. या ५ व्यक्ती म्हणजे अतिथी, माता,पिता, पत्नी व मुले.
अतिथीबालिक: पत्नि जननी जनक: तथा: ।
पर्यंते गृहिण:पोल्या इतरे च स्वशक्तित: ॥
२ -काळ नेहमी बदलत असतो. म्हणून वास्तु सर्व ऋतुत सौख्यादायी असावी.
२-कालस्य कुटिला गति:
३-वास्तु सामुग्री वापरतांना ती निसर्गात जशी होती तशी वापरावी. झाडाचा बुंधा हा लाकडी खांबाचा खालचा भाग असावा.
३-धाता यथा पुबमकल्पयत्।
४- पूर्वी झालेल्या चूकांची कारणे लक्षात ठेवून, योग्य ती सुधारणा करावी.
४- शुभाशुभ परिग्रह ।
५- वास्तु निर्माण करतांना भविष्यात काय बदल करावे लागतील याचा विचार करावा.
५- संवर्धनं च वास्तुनां तथा संवरणानि च ।
मानहीन न कर्तव्यं मानवर्धनं ॥
६ –कोणतेच कार्य निर्दोष नसते तेव्हा उपलब्ध सामुग्री व परिस्थिती यांचा सारासार विचार करून शक्यतो वास्तु निर्दोष निर्माण करण्याचा प्रयत्नकरावा.
६- अल्पदोषं बहुगुणं कार्य कर्म प्रयत्नत: ।
वास्तुनिर्माण हे सांघिक काम असते अशा कामात जे भाग घेतात त्यांचे नावे अशी
• स्थपती – मुख्य अभियंता/ वास्तुरचनाकार
• सुत्रग्राही –कनिष्ठ अभियंता
• तक्षक –सुतार
• वर्धकी – गवंडी
• कर्मी – मजूर कुशल / अकुशल
• कर्मी -कर्मीने कोणतेही आवश्यक शिक्षण घेतलेले नसते ना त्याचे जवळ स्वत:ची अवजारे असतात. अशी व्यक्ती फक्त सांगितलेले काम करते.
• वर्धकी – याला गवंडीकामाचा अनुभव असतो व स्वत:ची अवजारे असतात .
• तक्षक– सुतार याला सुतारकामाचा अनुभव असतो व स्वत:ची अवजारे असतात .
• सुत्रग्राही –याला इतर लोकांकडून कामे कशी करून घ्यावी याचे ज्ञान असते. योग्य अयोग्य कर्मचा-याची पारख असते.
• स्थपती – हा सर्व शिल्पकर्माचा ज्ञाता असावा लागतो, आदर्श स्थपती कसा असावा याचे वर्णन वास्तुग्रंथात दिले आहे ते असे,
स्थपती:स्थापनार्ह: स्यात् सर्वशास्त्र विशारद: ।
न हीनांगोऽतिरिक्तांगो धार्मिकश्च दयापर:॥
अमात्सर्योनसुयशाच्यातंद्रितस्त्वभिजातवान्।
गणितज्ञ: पुराणज्ञ: सत्यवादी जितेंद्रिय: ॥
स्थपतीचे आवश्यक गुण
त्याला सर्व शिल्पा विद्या व कलांचे ज्ञान असावे, तो घार्मिक असावा, दयावान, गणितज्ञ असावा दुस-याबद्दल द्वेष किंवा ईर्षा नसावी,तो निर्व्यसनी असावा. तसेच पैशाचा गैरव्यवहार करणारा नसावा.
वास्तु समारंभ- वास्तु निर्मितीच्या कालात काही समारंभ करवयाचे असतात ते असे;
१- आवश्यक गोष्टींसाठी अनुज्ञापत्रे मिळवणे ( जमिनीचे मालकी हक्क, वांधकामासाठी परवानगी , घराचे मानचित्र (प्लन) याची पृष्टी इत्यादि) .
२- नियोजित जागेची संयुक्त पहाणी- यजमान, स्थपती सूत्रधार वगैरे द्वारा.
३- भूमीपुजन – पाया खोदणे
४- घराच्या प्रवेश व्दाराची चौकट उभी करणे
५- वास्तुशांती- शेजारी व्यक्तींचा परिचय, सर्व कारागिरांचा यथोचित सन्मान
या व्यतिरिक्त अनेक गोष्टींचा वास्तुशास्त्रात समावेश आहे जसे वास्तु द्रव्याचे (बिल्डिंग मटेरिअल) चयन, वास्तु जवळची अशुभ व शुभ झाडे कोणती इत्यादिचा विचार. पण त्याची संपूर्ण माहिती अनेक वास्तुग्रंथात दिली आहे ती वाचावी.
— प्रा. अशोक नेने
भ्रमण ध्वनी 8329509522
वाचकांच्या सोयीसाठी पुनर्प्रकाशित.
मूळ प्रकाशन दिनांक : 20 जुलै 2020
Leave a Reply