स्वातंत्र्योत्तर काळात, लोकांना सहज करता येत असलेले परंतु आकडेमोडीसाठी अत्यंत किचकट आर्थिक व्यवहार सुलभतेने व्हावेत, म्हणून १ एप्रिल १९५७ रोजी दशमान पद्धत आणि नवीन नाणी व्यवहारात आली. या ” नव्या ” म्हटल्या गेलेल्या पैशांची आता ” षष्ठ्यब्दीपूर्ती ” साजरी होत आहे. त्या निमित्ताने हे थोडे स्मरणरंजन !! ” नवाकाळ” वृत्तपत्राने माझा हा लेख प्रसिद्ध केला आहे.
नुकतेच भारतातील नोटबंदीचे एक प्रचंड वादळ देशविदेशात घोंगावुन आता हळूहळू शांत होते आहे. असाच एक अत्यंत क्रांतिकारक निर्णय १ एप्रिल १९५७ मध्ये भारतात अंमलात आला. तेव्हां आर्थिक व्यवहारात दशमान पद्धती आणि त्यासाठी नवीन नाणी व्यवहारात आली. या सर्व नाण्यांना ” नये पैसे ” असे संबोधण्यात आले. यावर्षी १ एप्रिलला हे “नये पैसे “आपली चक्क षष्ठयब्दीपूर्ती साजरी करीत आहेत. त्यावेळी देश स्वतंत्र होऊन फक्त १० वर्षेच होत होती. माध्यमांचे जाळेही फारसे मोठे नव्हते. त्यामुळे आजच्या इतका गदारोळ झाला नाही तरीही साधकबाधक चर्चा होत होती.
या आधी प्रत्येक रक्कम ही रुपये, आणे, पैसे आणि पै अशा स्वरूपात लिहिली जाई. ३ पैंचा एक पैसा, ४ पैशांचा १ आणा आणि १६ आण्यांचा एक रुपया असे कोष्टकच पाठ करविले जात असे. रक्कम लिहिण्याची आणखी एक पद्धत मोडीमध्ये अस्तित्वात होती. उदा.- रु. १।।= . यातील १ चा अर्थ १ रुपया . अशा ।।। तीन उभ्या रेघा म्हणजे चार – आठ- किंवा बारा आणे. त्यापुढे सुटे आणे अंकांमध्ये आणि १ ते ३ आडव्या रेघा म्हणजे तेवढ्या पै. परंतु रक्कम जर फक्त रुपया आणि पै मध्येच असेल , उदा. १ रुपया आणि २ पै तर ही रक्कम १6= अशी लिहिली जाई. यातील इंग्रजी 6 म्हणजे आळे आणि त्याचा अर्थ निरंक किंवा nil.
रकमांची बेरीज वजाबाकीची फार किचकट पद्धत होती. बँका आणि मोठी आस्थापने येथे रोज अनेक रकमांच्या बेरजा केल्या जात. तेव्हा कॅलक्युलेटर / ऍडिंग मशीन अस्तित्वातच नव्हते. पै या रकान्यांमधील रकमांची तोंडी बेरीज करून ती वेगळी लिहिली जाई. त्याला ३ ने भागून जेवढे पैसे होतील तेवढे पैशांच्या रकान्यात , पॆशांच्या बेरजेला ४ ने भागून आण्यांच्या रकान्यांमधील रकमेत मिळविले जात असत. पुन्हा आण्यांच्या रकान्यातील रकमांची बेरीज करून त्याला १६ ने भागून तेवढे रुपये, रुपयाच्या रकान्यासाठी हातचे धरून मिळविले जात. क्लिष्ट आणि चुकांना भरपूर वाव असलेली ही पद्धत, त्यावेळची मंडळी मात्र लीलया वापरत असत.भारतात दशमान पद्धत लागू झाल्यावर या सर्व गोष्टी तशा सुकर झाल्या. पैंचे पैसे, पैशांचे आणे आणि आण्यांचे रुपये करण्यासाठी भागाकाराची गरज उरली नाही. रकान्याची बेरीज केल्यावर, हातचे अंक धरणे सोपे झाले.
याच अनुषंगाने १ एप्रिल १९५७ रोजी हे ” नये पैसे ” अस्तित्वात आले. १, २, ५, १०, २५, ५० पैसे आणि १०० पैसे म्हणजे १ रुपया अशी केवळ ७ नाणी व्यवहारात आली आणि त्यानंतर जुनी व नवीन नाणी एकत्रित पणे सुमारे ३ वर्षे अस्तित्वात होती. या नवीन नाण्यांच्या कडा अंध व्यक्तींनाही सहज कळतील अशा गोल ( लहान, माध्यम, मोठा ), अष्टकोनी, चौकोनी होत्या.
जुन्या ठशठशीत नाण्यांपेक्षा ही नाणी हलकी आणि छोटी होती. यावर टीकाही खूप होत असे. ” ब्रिटिश गेले, आता काँग्रेसच्या राज्यात हे असेच पत्र्याचे पैसे दिसणार , खिशात सापडतात तरी कुठे, भिकारीसुद्धा घेणार नाही, देवापुढे ठेवताना लाज वाटते इत्यादी वाक्ये रोजच ऐकायला मिळत असत.
एक आण्याचे ६ नवे पैसे, दोन आण्यांचे १२, तीन आण्यांचे १९ पैसे, चार आण्यांचे २५ पैसे हे कोष्टक डोक्यात शिरायला कठीण जात होते. कारण दोन आण्यांचा माल घेतला आणि दुकानदाराला चार आणे दिले तर त्याला १३ पैसे परत करावे लागत असत. त्याला वाटे मलाही जर दोन आणे परत करायचे आहेत तर मी १३ पैसे का द्यायचे ? १२ का नकोत ? यासाठी सरकारने त्यावेळी सर्वत्र ही कोष्टके दर्शविणारे फलक लावले होते. सोबतच्या चित्रात त्यावेळचा मराठी फलक पहिला की तत्कालीन व्याकरणाप्रमाणे शुद्ध मराठी भाषा वाचायला गंमत वाटते. या ३ पैशांच्या आणि अन्य व्यवहाराची गरज लक्षात घेऊन सरकारने १९६४ साली ३ पैसे आणि २० पैशांची नवीन नाणी आणली. तांब्याच्या १ पैशाची वाढणारी अव्यवहार्य किंमत लक्षात घेऊन एक पैशाचे, कापराच्या वडीएवढे नाणे आणले गेले. ही सर्व हलक्या अल्युमिनियमची होती आणि त्यावरून ” नये ” हा शब्द हटवून ” पैसे ” हा रूढ
शब्द कायम झाला.
१ एप्रिल १९५७ रोजी बँक खात्यात, रुपये, आणे आणि पै अशा स्वरूपात लिहिलेली जमा रक्कम पुन्हा रुपये आणि नये पैसे अशा नव्या स्वरूपात पासबुकात नोंद करून दिली जाई.
अनेक देवळात तांदुळाबरोबरच पैसेही ठेवले जातात.ही अगदी छोटी नाणी, वर्गीकरण करताना सापडत नसत. त्यासाठी काही देवस्थानांनी खास चाळण्या बनवून घेतल्या होत्या. अनेक वस्तूंवर जुनी आणि नवी किंमत छापली जात असे.
महागाईच्या ओघात १ पैशापासून ५० पैशांपर्यंत सर्व नाणी व्यवहारातून बाद झाली. ५० पैशांचे नाणेही कुणी स्वीकारत नाही. पैसे हा रकाना फक्त कागदोपत्री उरला आहे. आज ६० वर्षांनंतर दशमान पद्धतीऐवजी नकळत ” शतमान पद्धती ” लागू आहे. आपण श्रीमंत होतोय ?
मकरंद करंदीकर , अंधेरी ( पूर्व), मुंबई.
Leave a Reply