“”ज्यात शंभर अब्ज मज्जा पेशी आहेत असा माणसाचा मेंदू म्हणजे जगातले सर्वांत विस्मयकारक, व्यामिश्र (गुंतागुंतीचे), समजण्यास गहनतम असे विद्युत्-रासायनिक यंत्र आहे. शब्द वा ध्वनीसंकेत यातून आपण घरातल्या अजाण बालकाच्या प्राथमिक स्मृती तयार करत असतो. त्याच स्मृतीच्या आधारे बालक आसपासच्या जगाचे अनुभव घेऊ लागते. त्यातुन आपल्या स्वत:च्या स्मृती तयार करून मेंदूला कार्यान्वित करू लागते. त्याच्या त्याच कामात त्याला मदत करणे म्हणजे बालकाला शिकवणे असते कारण जेवढे अनुभव व त्यांच्या समृद्ध स्मृती, तेवढा त्याचा मेंदू तल्लख व कुशल होत असतो आणि इथे मानवी मेंदूची स्मरणशक्ती लाखो नव्हेतर अब्जावधी संगणकांच्या क्षमतेपेक्षा अधिक असते. जेवढी माहिती जमा केली जाईल, तेवढी स्मरणशक्ती वाढत असते.””
▪
मी लेखाची सुरूवात वरील अवतरणाने केली आहे याचा अर्थ मी मेंदूबद्दल शास्त्रीय माहिती देणार म्हणून घाबरू नका. मला फक्त एवढचं सांगायचं आहे की प्रत्येक माणसाच्या मेंदूची क्षमता प्रचंड असते आणि प्रत्येकाची स्मरणशक्ती खूप वाढू शकते. माझ्या लेखांवरून माझ्या स्मरणशक्तीचे कांहीना आश्चर्य वाटते म्हणून हा लेखनप्रपंच. एकतर हे लहानपणीच व्हावं लागतं आणि नंतर तसे प्रयत्न चालू ठेवावे लागतात. शाळेंत चौथीपासून मला ह्या स्मृतीचा उपयोग होऊ लागला. पाढे, इतिहासांतल्या सनावळ्या सहज लक्षात रहात. कविता पाठ करण्यासाठी मला वेगळे परिश्रम करावे लागत नसत. ती वर्गात शिकवली जात असतानाच पाठ होई. पुढे आठवीपासून संस्कृत व्याकरण आणि श्लोक यांचे पाठांतर मला विनासायास जमे. एकदा, दोनदा नजरेखालून घातलेला धडा, त्यावरील उत्तरे देण्याइतपत लक्षात राही.ह्या सगळ्याचा परिणाम उलट झाला.अभ्यासासाठी मेहनत घेण्याची संवय मला लागली नाही.एक अनाठायी आत्मविश्वास आला.अल्प मेहनतीत मिळणाऱ्या यशावर मी संतुष्ट राहू लागलो.संपूर्ण दिवस खेळ, भटकणे किंवा अवांतर वाचन यांत जाऊ लागला.नववी, दहावीला ह्यामुळे पडणारा फरक जाणवू लागला.एक शिक्षक मला “”वासरांत लंगडी गाय शहाणी”” म्हणून टोंचत असत.तेच शिक्षक मला “”तात्पुरता लोहचुंबक”” असेही म्हणत.विद्युत्-प्रवाह असेपर्यंतच चालणारा लोहचुंबक.चालू असेल तर सर्व पाठ नाहीतर निरूपयोगी.त्यावेळी त्यांचा राग आला नाही.कारण ते सर्वांबद्दलच कांही बाही बडबडत असत, त्यामुळे दुर्लक्ष केलं.त्यांच्या म्हणण्यात तथ्य होतं.परिणामी अंतिम शालेय परीक्षेतलं यश फार सीमीत राहिलं.शाळेंत असतानाच संस्कृत टिळक विद्यापीठाच्या तीन परीक्षा दिल्या.तिसरी परीक्षा देणारा मुंबई उपनगरांतला (कदाचित मुंबईतलाही) मी एकमेव विद्यार्थी होतो.त्यामुळें संस्कृतचं अवांतर वाचन आणि भगवद् गीतेचे बरेचसे अध्याय, गंगालहरी, सुभाषित संग्रह, इ. चे पाठांतरही केले होते.पदवीसाठी आठपैकी दोन पेपर संस्कृतचे होते, तेव्हां मला याचा खूप फायदा झाला.१०० मार्कांच्या एका पेपरसाठी मम्मट कविचं काव्यप्रकाश होतं, ते जवळजवळ पाठ होतं आणि दुसऱ्या पेपरमधे ५० मार्क भगवद् गीतेसाठी होते.पण हे मी सगळं सांगितले ते स्मृतीविषयी.खरं तर माझ्या विसराळूपणाच्या गोष्टी इतक्या आहेत की एक लेख त्याला पुरणार नाही.त्यातल्या ह्या थोड्या.
▪
मजा बघा. ज्या ज्या गोष्टी मी त्या त्यावेळी विसरलो होतो आणि गडबड केली, त्या सर्व गोष्टी आता विसरू म्हटले तर विसरतां येत नाहीत.शाळेच्या सुरूवातीपासून पुस्तक किंवा वही घरी विसरणे, हे अगदी प्राथमिक होते.पण वही किंवा पुस्तक शाळेंतच हरवलं की कांही वेळा ते परतही मिळत नसे.मग खूप ओरडा मिळे.दुसरी हमखास विसरली जाणारी गोष्ट म्हणजे चपला.दरवर्षी शाळा सुरू होतांना नव्या चपला मिळत असत आणि महिन्याभरांत त्या हरवत असत.मग वर्षभर तसाच शाळेत जात असे.हा प्रकार नववीपर्यंत चालला.नववीत ट्रीपला कोऱ्या करकरीत चपला हरवल्या आणि खूप वाईट वाटलं.माझ्या वर्गमित्रांनी माझ्या नकळत वर्गणी गोळा केली आणि मला नव्या चपला आणून दिल्या.त्या दिवसापासून मी कधी चपला विसरलो नाही.आजही कुठे गेलो तर चपला कुठे काढून ठेवल्या हेही विसरत नाही.हायस्कूलमधे असताना एकदां दहावीच्या फीचे दहा रूपये आईने माझ्याकडे दिले.मी त्यादिवशी ते शाळेंत भरायला विसरलो.नंतर ती दहाची नोट कुठे सांपडेना.खूप शोधली.त्याकाळी दहा रुपये पुन्हां देणं पालकांना खूप कठीण पडलं असेल.सर्वांनी माझं दफ्तर शोधलं.खिसे शोधले.शेवटी दुसरी नोट घेऊन पैसे भरले.पांच सहा दिवसांनी इतिहासाच्या पुस्तकांत दडलेली ती नोट माझ्या नजरेस पडली आणि अमेरीका सांपडल्यावर कोलंबसाला झाला नसेल इतका आनंद मला झाला.
▪
हायस्कूलमधे असताना आम्हाला एक इंग्रजीच्या शिक्षिका होत्या.कुठल्याही गोष्टीसाठी त्यांची शिक्षा ठरलेली असे.ती गोष्ट करणार नाही असं शंभर किंवा दोनशे वेळा वहीत लिहायला लावत.आठवी ते अकरावी ह्या चार वर्षांत मी ही शिक्षा अनेकदा भोगली आहे.माझी चूक असे वही किंवा पुस्तक आणायला विसरल्याची.मग त्या शिक्षा देत,””Write hundred times, ‘I shall not forget to bring my notebook’.””मी यांत्रिकपणे दुसऱ्या रफ वहीमधे ताबडतोब ते वाक्य १००वेळा लिहून काढायचो.पण पुन्हा तेच व्हायचं.पुन्हा तीच शिक्षा.बरं पूर्वीचं लिहिलेलं बघून तेंच परत दाखवतां येऊ नये, म्हणून त्या काळजी घेत.त्या प्रत्येक वेळी सही करून तारीख घालत असत.दुसऱ्यांदा चुकलो की दोनशे वेळा तेच लिहायला लागायचं.त्यामुळे अक्षर थोडं सुधारलं पण विसराळूपणांत काही कमतरता आली नाही.पुढे मी स्वयं-सूचना देण्याबद्दल वाचलं.त्यात म्हटलं होतं की मेंदूला सूचना सकारात्मक द्यायला हव्यात.””नाही”” शब्द जोडून नकारात्मक सूचना दिल्यास मेंदू तो नकारात्मक भागच स्वीकारतो.वरील उदाहरणांत “”I shall not forget my note book”” असं लिहिण्याऐवजी “”I shall remember to bring my note book.””अशी सूचना शंभर वेळा लिहिल्यास कदाचित फरक पडला असता.मुलाला “”अरे, पडशील ना”” असे म्हटल्यावर तो पडण्याची शक्यता कमी न होतां वाढतेच.””सांभाळून जा, सांभाळ स्वतःला”” असं सांगायला हवं.माझ्या “”यश एका पावलावर”” या पुस्तकांत मी नकारात्मक सूचना सकारात्मक करण्यासाठी बरीच वाक्ये दिली आहेत.
▪
बोरीवलीला रहात असताना एकदा मी व माझी पत्नी एका मित्राच्या लग्नाला गेलो.लग्न बोरीवलीतच होतं म्हणून कोटही घातला होता.रांगेत उभे राहून मंचावर गेलो.वधूवरांचे अभिनंदन केले.त्याच्या हातात मी अहेराचे पाकीट ठेवले.फोटो काढणं झालं.जेवण झालं. आम्ही दोघे चालतच परत निघालो.लग्नाच्या कार्यालयापासून तीस चाळीस पावले चालल्यावर मी सहज कोटाच्या खिशांत हात घातला तर हातांत पाकीट आलं.बाहेर काढून पाहिलं तर अहेराचचं पाकीट होतं ते.मग मी त्याला कोणतं पाकीट दिलं ? लक्षात आलं की मी त्याला त्यानेच दिलेली त्याच्या लग्नाची आमंत्रणपत्रिकाच देऊन आलो होतो व अहेर माझ्याकडेच होता.मग मी म्हणालो, “”पाकीटं पहातील तेव्हां त्यांचीच पत्रिका पाहून काय वाटेल त्यांना ?आपण परत जाऊन त्याला हे पाकीट देऊन येऊया.””पत्नीला हंसू आवरेना.माझ्या विसरभोळेपणाचा जास्तीत जास्त त्रास तिलाच भोगावा लागतो ना !आम्ही दोघे परत कार्यालयांत मंचावर गेलो.पुन्हां रांगेत नाही राहिलो.त्याला भेटून खरं ते सांगून अहेराचं पाकीट त्याच्या स्वाधीन केलं.प्रेक्षणीय झालेल्या चेहऱ्यांचे पुन्हां फोटो नाही घेतले.(हा किस्सा मी गृपवर सांगितला होता पण ह्या लेखांत तो परत येणं अपरिहार्य होतं.त्यावेळी अनेकांनी आपलेही अशा गोंधळाचे किस्से सांगितले होते.)माझ्या पत्नीला माझी खिल्ली उडवावी असं वाटलं तर एक विषय मिळाला.
▪
बाजारहाट करायला मी कमीच जातो.पण कधी गेलो तर पत्नीने चार वस्तू आणायला सांगितलेल्या असल्या तर मी तीनच घेऊन येतो.पांच सांगितल्यास चारच घेऊन येतो.एखादी तरी विसरतोच.आतां पत्नी एका कागदावर काय काय आणायचं याची यादीच लिहून देते.मग सर्व वस्तू आणल्या जातात.पण कधी कधी तो कागदच घरी ठेऊन बाजारांत जातो आणि मग परत घरी यावे लागते.आता मोबाईलमुळे बाजारांतूनच फोन करून विचारता येतं, हे फार बरं झालं.आता कधी कधी मोबाईलही घरी रहातोच म्हणा.माझ्या एका मित्राकडेपूजा होती. गुरूजींनी पूजा साहित्य आणायसाठी यादी लिहून दिली होती.पत्नीने यादीतल्या तीन चार वस्तू मित्राला आणायला सांगितल्या.लिहूनच दिल्या.यादीत तिने एक वस्तू लिहिली होती, “”विड्याची पाने””.पठ्ठ्या चक्क विड्यांची पाने घेऊन आला.घरी आल्यावर पत्नीने विष्णुसहस्र नामांच्या आधीच याच्या नावाचा उध्दार केला नसता तरच नवल. ▪
लोकल गाडीचा प्रवास म्हणजे वस्तु विसरणं आलंच.मी गाडीत विसरलेल्या वस्तुंचीही यादी होऊ शकते.एकदा आई कोल्हापुरहून परत आली होती.तिने मला माझ्या एका मावशीकडे पोंचवायसाठी एक छोटी हँडबॅग दिली.त्यांत स्टेनलेसचा मध्यम आकाराचा आंत लाडू भरलेला डबा आणि खणाचे कापड, इ. वस्तु होत्या.सकाळी कॉलेजला जाताना वरच्या फळीवर ठेवलेली ती बॅग घ्यायला मी ग्रँटरोड स्टेशनला उतरलो तेव्हां घ्यायला विसरलो.स्टेशनच्या बाहेर पडण्याच्या आधीच मला आठवण झाली.पण गाडीने तोपर्यंत खूप वेग घेतला होता.मी पाठच्याच गाडीतून चर्चगेटला गेलो.पण आमची गाडी स्टेशनात शिरत असतानाच ती गाडी चर्चगेटच्या बाहेर पडली.मी चर्चगेट स्टेशनवर चौकशी केली तर त्यांनी एके ठिकाणी नुकत्याच गेलेल्या एकदोन गाड्यांतून राहिलेल्या व रेल्वे पोर्टर्सनी जमा केलेल्या खूप वस्तू दाखवल्या.परंतु त्यात माझ्या हातून राहिलेली बॅग नव्हती.त्या वस्तू बघून एकच समाधान वाटलं की असे वस्तू गाडीत विसरणारे आपण एकटेच नव्हतो.गाडीत हमखास रहाणारी दुसरी वस्तू म्हणजे छत्री.एकदा मी रूपारेल कॉलेजमधे मित्राबरोबर कांही कामाला गेलो.तो येण्याआधी मी फलाटाच्या एका बाकावर बसलो होतो.आम्ही भेटताच मी त्याच्याबरोबर निघालो.गडबडीत नवी कोरी छत्री मी बाकावरच विसरलो.कॉलेजमधे जाऊन येत असताना छत्रीची आठवण झाली.छत्री अर्थात तिथे नव्हतीच. माटुंगा स्टेशनवर तेव्हां वर्दळ फारच कमी असे. मी स्टेशनमास्तरांकडे जाऊन चौकशी केली. त्यांनी पोर्टरने बांकावरून उचलून आणून नुकतीच जमा केलेली माझी छत्री दाखवली. पोर्टरचे खूप आभार मानून छत्री घेऊन बाहेर पडलो. पुढे गृपने प्रवास करताना गाडीत कांही विसरण्याचा प्रश्नच येत नसे कारण चर्चगेटला आम्ही सर्वांत शेवटी उतरत असूं आणि एकमेकांच्या वस्तूंची आठवण देत असू.कधी कधी आम्हालाच विसरलेल्या वस्तू मिळत. त्यात पत्ता असल्यास आम्ही संपर्क साधून वस्तू ज्याची त्याला देत असू.एकदा एका बॅगेत मालकाचा पत्ता मिळाला, तो माझ्याच बाजूच्या बिल्डिंगमधला होता. बॅग परत मिळाल्याचा त्याला खूप आनंद झाला. तो फार काळजीत होता कारण त्याचे रायफलचे लायसन्स त्या बॅगेत होते. बाजूच्याच सोसायटीत रहात असल्याने त्याची माझी बऱ्यापैकी मैत्री झाली. आणखीही एकदा बॅग मिळाली, कधी दुसरं कांही मिळालं आणि आम्ही युक्ती प्रयुक्तीने मालक शोधून सर्व वस्तू मालकापर्यंत पोहोचवल्या.
▪
आजकालच्या सर्व मालिकांमधे, व्हॉटसॲप वरील पोस्टमधे, एक गोष्ट विनोद अथवा हकीकत म्हणून हमखास येते. ती म्हणजे नवऱ्याने बायकोचा वाढदिवस विसरणे किंवा नवऱ्याने लग्नाचा वाढदिवस विसरणे पण पत्नीचा वाढदिवस विसरणे हा विनोदाचा विषय नाही. ती एक वैवाहिक जीवनांतील कायम ऐतिहासिक घटना होऊन रहाते आणि कधीही ती संदर्भसहित पुढे येते. मी लग्नाचा वाढदिवस कधी विसरलो नाही. परंतु पत्नीचा वाढदिवस पहिल्याच वर्षी विसरलो. २६जानेवारीला विवाह झाला.रजा संपून मी कामावर जाईपर्यंत फेब्रूवारीचा शेवटचा आठवडा आला होता. फेब्रूवारी त्या वर्षी २९ दिवसांचा होता. तो संपला आणि एक तारखेला मी नेहमीप्रमाणे गडबडीने तयार होऊन ऑफीसमधे गेलो. संध्याकालळी बाहेर भटकून आलो. पत्नीही ऑफीसमधेूनआली. तिचं माहेर जवळच होतं. येतांनाच माहेरी जाऊन आली. जेवण झाल्यावर मात्र पत्नीच्या चेहऱ्याकडे पाहून वाटलं की आपलं काही तरी चुकलय पण खूप प्रयत्न करूनही कांही आठवेना. शेवटी तिनेच काय विसरलोय त्याची आठवण करून दिली.आमचा प्रेमविवाह होता.लग्नाआधी कांही वर्षांची ओळख होती.त्या काळांत न चुकता एक मार्चला तिला शुभेच्छा देण्याची संधी मी सोडत नसे पण लग्न झाल्यावर पहिल्याच वर्षी विसरलो आणि आता ५३ वर्षे ते निमूटपणे ऐकून घेतोय.
▪
पण ती तरी किती गोष्टींबद्दल बोलणार? लग्नाआधी भेटायचं ठरवलं तर विसरणं शक्यच नसे.पण नंतरच्या भेटीही महत्त्वाच्याच कीं ! एकदा संध्याकाळी ऑफीस सुटल्यावर आम्ही भेटायचं ठरवलं.पत्नी सहा वाजतां चर्चगेटला ठरल्या जागी येऊन उभी राहिली आणि मी त्याच सुमारास गाडी पकडून कांही मित्रांबरोबर अंधेरीला आलो. घरी पोहोचलो आणि पत्नी आलेली नाही हे लक्षात आल्यावर आठवले की ती तर वाट पहात थांबली असेल. अंधेरीहून परत चर्चगेटला जाईपर्यंत ती तिथेच थांबण शक्य नव्हतं. म्हणून घरीच वाट पहात बसलो. ती पाऊण तास वाट बघून निघून आली होती. त्या काळांत मोबाईल नव्हते. घराघरात फोनही नव्हते. त्या दिवशीही ती खूप रागावली. आता मात्र तिला संवय झाली. वाढत्या वयांत स्मरणशक्ती कमी कमी होते. हल्ली कपाट उघडतो आणि मग ते कशासाठी उघडलं हेंच आठवत नाही.मग पुन्हा कपाट बंद करून बाहेर आल्यावर ध्यानांत येत की आपण बूट घालत होतो आणि मोजे आणायला कपाट उघडलं होतं.मोबाईल कुठे ठेवला ते न आठवणं, बाहेर जाताना घराच्या चाव्या घ्यायला विसरणं आणि पत्नी त्याच वेळी बाहेर गेली असेल तर बाहेरच अडकणं. (अर्थात शेजारी मित्रांना अशावेळी भेट देऊन उपकृत करतां येतं, हे तुम्हाला ठाऊक आहेच) थोडक्यात यामुळे विसरणं हा आता सततचा उद्योग झालाय.म्हणजे मी विसरणं आणि तिने आठवण करून देणं. जितका मी विसराळू तितकीच माझी पत्नी गोष्टी न विसरता न चुकता वेळेवर करणारी. ५३ वर्षात ती कधी भाजी किंवा आमटीत मीठ घालायचं सुध्दा विसरली नाही.त्यामुळे माझा विसराळूपणा खपून जातो. तरीही तिला एका गोष्टीचं नेहमी खूप आश्चर्य वाटतं की अशा विसराळू नवऱ्याने ऑफीसमधे विसराळूपणामुळे घोटाळे कसे घातले नाहीत? मलाही आश्चर्य वाटतं की ऑफीसमधे कसा मी कांही विसरलो नाही.मी कधी डायरीही वापरली नाही. मला वाटतय माझ्या सीनीयर आणि ज्युनीयर सहकाऱ्यांनी मला सांभाळून घेतलं हेच खरं. अजून माझ्या विस्मृतीच्या आणखी कांही गोष्टी आणि कळसाध्याय सांगायचा राहिलाच आहे. तो आता पुढल्या भागांत.
— अरविंद खानोलकर.
Leave a Reply