चिं. वि. जोशींच्या “वायफळाचा मळा” या पुस्तकांत एक लेख आहे. “स्मरणशक्तीचे प्रोफेसर”.लेखकाला गाडीत एक प्रोफेसर भेटतात. प्रोफेसर साहेब लेखकाला स्मरणशक्ती कशी वाढवावी, लहान सहान गोष्टी कशा लक्षात ठेवाव्यात ह्याबद्दल उदाहरणासहीत लेक्चर देतात. त्यांचे एक उदाहरण पहा.ते म्हणतात, “मला अहमदनगर जायचे आहे.अहमदनगर हे नांव लक्षांत ठेवण्यासाठी मी एक कारिका रचली आहे.ती अशी “दिवस गर्व विष नसे ज्या पुरी” (अह + मद + न गर). पद्यमय कारिका पटकन् लक्षात रहाते आणि गांवाचे नांव लक्षात ठेवणे सोपे जाते. “लेखक त्यांना विचारतो, “आपण अहमदनगरला कोणत्या कामासाठी निघाला आहेत? “तर प्रोफेसर म्हणाले, “अहो, अहमदनगरला माझ्या बहिणीला स्थळासाठी दाखवण्याचा कार्यक्रम आहे.” लेखकांने विचारले, “पण बहिण कुठे दिसली नाही तुमच्या बरोबर.” प्रोफेसर त्या प्रश्नाने गडबडले आणि म्हणाले, “अरेच्चा, म्हणजे ती मनमाड स्टेशनवर गाडी बदलताना तिथेच राहिली वाटते!” असे हे स्मरणशक्तीचे प्रोफेसर.”Absent Minded Professor” हा इंग्रजी सिनेमा फारच मजेदार आहे. पाहिला नसेल तर यु ट्यूबवर जरूर पहा. त्याचाही माझ्या बाबतीत किस्सा आहेच. मला तो सिनेमा पत्नीला दाखवायचा होता. घाईघाईने मी तिला बरोबर घेऊन अंधेरीहून चित्रा टॉकीजच्या तीनच्या शोसाठी पोहोचलो.बाहेर एके ठिकाणी त्या सिनेमाचा बोर्डही पाहिला. पटकन तिकीटे काढून डॉक्युमेंटरी संपत असताना आंत जागेवर पोहोचलो. दोन मिनिटातच सिनेमा सुरू झाला. पहिलेचं टायटल उर्दूतले आले.माझ्या लक्षात आले की हा कांही इंग्रजी सिनेमा नाही. हिंदी चित्रपट फारसे आवडत नसत. आम्ही दोघे परत बाहेर आलो. थिएटर भरलेले होते. आमची तिकीटे घेणारे सहज मिळाले. मग मी इंग्रजी सिनेमाचा बोर्ड परत नीट पाहिला. इंग्रजी सिनेमा दररोज फक्त १२ वाजता होता. माझ्या विस्मरणशक्तीची ऑफीसात कोणाला कल्पना येत नसे.आयडीबीआय मधल्या ९०% स्टाफला मी नांवाने ओळखत असे. आयडीबीआय बँकेतल्या तर प्रत्येकाचा इंटरव्ह्यू मी घेतला होता. त्यामुळे प्रत्येकाला मी नांवाने ओळखत होतो. एखाद्या कार्यक्रमाच्या वेळी भेटताना मी प्रत्येकाला नांवाने संबोधताना बघून सर्वांना आश्चर्य वाटे. चंदीगड ते चेन्नई कुठल्याही ब्रँचला गेलो तरी प्रत्येकाशी मी नांव घेऊन हॕलो करत असे. कधी कधी एखादा दुसऱ्याच ब्रँचचा अधिकारी अचानक समोर उभा राहून माझी परीक्षा घेई पण मला बरोबर त्याचं नांव आठवे. मला गरज नसताना आजही बरेच टेलीफोन नंबर लक्षात रहातात. एका बाजूला कमालीचा विसराळूपणा आणि एका बाजूला स्मरणशक्तीचा नउशे नांव आणि नवे चेहरे लक्षात ठेवण्याचा आविष्कार यांची सांगड घालणं मलाच कठीण जातं.
▪
मागच्या भागात माझ्या विसराळूपणाच्या अनेक गोष्टी सांगितल्या. आठवत बसलो तर अजूनही खूप आठवतील. एक अधूनमधून हमखास घडणारी गोष्ट म्हणजे धुवायला टाकलेल्या कपड्यांच्या खिशांत वस्तू विसरणे. बहुदा चिल्लर खिशांतच रहाते. मागे धुलाई यंत्र दुरूस्तीसाठी आलेल्या मेकॕनीकने यंत्राच्या आंत जाऊन बसलेली पांच-सहा रूपयांची चिल्लर काढली. कागद, बसची तिकीटे ह्या गोष्टीही रहातात. एखाद्या वेळेस तो कागद रंग सोडणारा असतो आणि कपडे खराब करतो पण विसरणं कांही जात नाही. आणखी एक वारंवार विसरली जाणारी गोष्ट म्हणजे बाजारांत कांही विकत घेतल्यावर बंदी नोट देऊन बाकीचे सुट्टे पैसे परत न घेणं. एकदा बांद्रा टॉकीजला खिडकीवर दहा रूपये देऊन अडीच रूपयांची दोन तिकीटे काढली. (किती स्वस्त!) बाकीचे पाच रूपये घेतलेच नाहीत. सिनेमाला वेळ होता म्हणून दोघे फिरायला गेलो आणि थोड्या वेळाने आठवण झाली की बाकीचे पाच रूपये घ्यायचे राहिले.परत थिएटरला आलो तेव्हा “आता ते पैसे परत मिळणार नाहीत पण विचारायला काय हरकत आहे ?” असा विचार करून खिडकीवर परत जाऊन पाच रूपये घ्यायचे राहिल्याचे सांगितले. ती व्यक्ती खूप प्रामाणिक आणि सज्जन असली पाहिजे. काही न बोलता जवळच बाजूला काढून ठेवलेली पांच रूपयांची नोट त्याने माझ्यापुढे सरकवली.ह्यावर उपाय म्हणून बरेचदां खरेदी ठराविक दुकानातच करतो. ओळख असल्यामुळे ते दुकानदार पैसे आठवणीने परत देतात. आता कार्ड आल्याने सुट्टे पैसे परत घेण्याची जबाबदारी कमी झाली पण कार्डच परत घ्यायचं रहाण्याची शक्यता आहेच. आंघोळीला टॉवेल न घेता बाथरूममधे जाणं, हा अनेकांकडून घडणारा विसराळूपणा आहे.लग्न झाल्या झाल्या तर कांही तरूण आठवणीचे पक्के असूनही अगदी ठरवून टॉवेल विसरून अंघोळीला जातात.पण आता सत्तरीत टॉवेल विसरल्यास उध्दारच होणार ना !
▪
ह्या विस्मरणाच्या सर्व गोष्टी फिक्या ठरवणारा विसराळूपणाचा कळसाध्याय झाला तोही मी अगदी तरूण असतानाच.तो सांगितल्याशिवाय हे स्मरणशक्तीचं आख्यान पूर्ण होणारच नाही.कॉलेजच्या पहिल्या वर्षी गणितात नापास झालो आणि वर्ष फुकट गेलं.दुसऱ्या वर्षी गणितात भरपूर मार्क मिळवून मी पास झालो पण तेही वर्ष वाया जाण्याची वेळ माझ्या विसराळूपणामुळे माझ्यावर आली होती.पहिल्या वर्षी गणित सोडून सर्व विषयांत एक्झम्शन होतं असं मी म्हटलं त्यांत सुधारणा करतो.इंग्लिशच्या दोन पेपरपैकी कंपोझिशनमधे एक्झम्शनसाठी एक मार्क कमी पडला होता.त्यामुळे दुसऱ्या वर्षी कंपोझीशनचा ५० मार्कांचा पेपरही परत देणे भाग होते.गणिताचे पेपर झाल्यावर दहा दिवसांनी हा पेपर होता.मी तारीख वहीत लिहून ठेवली होती मार्च बारा.तो मंगळवार असूनही मी मनाशी बुधवारी आपला पेपर आहे असेच समजत होतो आणि अंधेरीतील सायन्स घेणाऱ्या विल्सनच्याच दोघा मित्रानाही तेच सांगितले होते.बारा तारखेला सकाळी सव्वा दहाच्या सुमारास माझ्या विल्सन कॉलेजमधल्या एका मित्राचा फोन आमच्या शेजारच्या वाण्याकडे आला.कॉलेजपासून थोड्या अंतरावर रहाणाऱ्या माझ्या मावशीकडे जाऊन त्या मित्रांनी हा नंबर मिळवला होता.तो मित्र मला म्हणाला,”अरे, तू आज आला कां नाहीस ? आपला पेपर आज आहे. हा तुझा अंधेरीचा मित्र म्हणतो, ‘तुझा समज आहे पेपर उद्या आहे’.लौकर ये. पेपर चालू होईल साडे दहाला”.हा मित्रही माझ्यासारखाच एफ. वाय.ला नापास होऊन पुन्हां परीक्षेला बसला होता.सव्वा दहा वाजले होते.मी अंधेरीला होतो.परीक्षा साडेदहाला चौपाटीवरच्या कॉलेजमधे सुरू होणार होती.पण मी विचार करत बसलो नाही.
▪
मी धांवतच घरी गेलो.पेपर त्याच दिवशी होता हे पाहिले.मी पास आणि पेन घेऊन धांवत सुटलो.साडेदहाच्या आंत मी अंधेरी स्टेशनवर पोंहोचलो.जिने चढून पांच नंबर फलाटावर येत असलेली फास्ट ट्रेन जेमतेम पकडली.११ वाजायला दोन एक मिनिटे असताना मी ग्रँट रोड स्टेशनवर उतरलो.ब्रिज ओलांडून बाहेर आलो.तेव्हां आतासारख्या टॕक्सीज नव्हत्या.खाजगी गाड्या टॕक्सी सारख्या मिळत पण हुज्जत घालावी लागे.पुन्हां एकदा मी पायांवर विश्वास ठेऊन धांवलो.नाना चौक धावतच क्रॉस केला आणि विल्सन कॉलेजपर्यंतही धांवत गेलो.अकरा वाजून पांच/सहा मिनिटे झाली असतांना मी तिथे पोहोचलो.त्या दिवशी कदाचित मी धावण्याचा नवा विक्रम केला असेल.
▪
काॅलेजमधे माझ्या स्वागताला घोळकाच उभा होता.परीक्षा साडेदहाला सुरू झाली होती.अर्धा तास होऊन गेला होता.आता मला परीक्षेला बसायला परवानगी घ्यायला लागणार होती.आमच्या कॉलेजचा खूप लोकप्रिय जनरल सेक्रेटरी आणि पुढे जसलोकच्या रेडीओलॉजी डीपार्टमेंटचा प्रमुख डॉक्टर झालेला सुरेश कर्णिक सर्वांच्या वतीने मला म्हणाला,”तू काळजी करू नकोस. मी तुला प्रवेश मिळवून देतो.”विल्सनला ऑफीस सुपरींटेंडंट अभ्यंकर सर्वेसर्वा होते.प्राध्यापकांची परवानगी मिळवणे सोपे झाले असते.पण धोतर कोट टोपी घालून राज्य चालवणारे, ब्रिटीश शिस्तींत घडलेले, अभ्यंकर खडूस म्हणून प्रसिध्द होते.सुरेश मला घेऊन त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला,”याचे आजोबा अचानक बरेच आजारी झालेत, त्यामुळे त्याला यायला उशीर झाला. तर प्लिज त्याला परीक्षेला बसू द्या.”त्याच्या या बोलण्यावर अभ्यंकरांनी कागदांमधून डोकं वर काढलं आणि रोखून पहात विचारलं,”काय नांव याचं ?”मी म्हणालो,”खानोलकर अरविंद”.”अस्सं काय ?”मग ते सुरेशकडे बघून म्हणाले,”अर्ध्या तासापूर्वी मला एक विद्यार्थी सांगून गेला की ‘खानोलकरला सांताक्रूझ स्टेशनवर चक्कर आली आणि म्हणून त्याला उशीर होणार आहे आणि आता तुम्ही सांगताय, आजोबा आजारी आहेत.काय प्रकार आहे.ह्याला प्रवेश मिळणार नाही.”मी म्हणालो,”माझं ऐकून तर घ्या.”तर ते खेंकसले,”चला आंत. आतां काय ते प्रिन्सिपालना सांगा.”
▪
सगळी वरात प्रिन्सिपाल आयरन यांच्या केबिनमधे पोहोचली.प्रिन्सिपल आयरन शांतपणे बसले होते.अभ्यंकर त्यांना सांगू लागले,”Sir, half an hour is already over, since exam began. Some students have left and brought out paper. He must have all answers. They are giving different excuses. This is planned conspiracy. They must be punished.”मला बोलायची संधी मिळताच मी नम्रपणे प्रिन्सिपालना म्हणालो,”Sir, let me tell you truth. Sir, I had really forgotten that my paper is today. I was thinking it is tomorrow. Upon learning it is today, I have come from Andheri almost running and could reach only now. My friends have advanced different excuses to help me get entry to exam. It is not their fault. They did so for my sake. Please excuse us.”प्रिन्सिपाल आयरन म्हणाले,”We have kept gap of 7/8 days in two papers to help students…..”खरं तर लागोपाठ पेपर असलेले बरे.आपोआप लक्षात रहातात.पण तें सांगण्याची ती वेळ नव्हती.एव्हांना घड्याळाचा मिनिट कांटा सव्वा अकराच्या बाजूस झुकला होता.मी प्रिन्सिपालना म्हणालो,”Sir, I agree but please allow me to appear for exam. This is my second year for F.Y. and if I fail second time, may be my education will be over. There is very little time left now.”त्यावर प्रिन्सिपालनी अभ्यंकरना मला परीक्षा हॉलमधे न्यायला सांगितले.
▪
तो हॉल जवळच होता.मला सुपरवायजरच्या स्वाधीन करून अभ्यंकर व इतर निघून गेले.माझ्या ज्या मित्राने मला फोन केला होता, त्यानेच मला वाटेत चक्कर आल्याचे सांगितले होते.तोही माझ्यासारखाच पहिल्या वर्षाच्या परीक्षेला पुन्हां बसला होता.अभ्यंकरना येताना पाहून त्याच्या काळजाचे भीतीने पाणी पाणी झाले.हे नंतर त्याने मला सांगितले.दीड तासाचा पेपर मला पंधरा मिनिटांत लिहायचा होता.त्या करता मी प्रथम पंधरा मार्काचे ग्रामर सोडवायला घेतले.बरोबर उत्तरे लिहिल्यास पंधरा मार्क पक्के होते.५०पैकी १७मार्क मिळाले तर मी पास होणार होतो.मी ग्रामर सोडवायला लागलो आणि सुपरवायजर माझ्या बाजूला येऊन उभा राहिला.”बरोबर, पहिले ग्रामर सोडव.हं तिथे at लिही, तिथे on लिही.मी म्हणालो “मला येतय”. “असू दे. मी सांगतो तसं लिही.”पांच मिनीटांपेक्षा कमी वेळांत ग्रामरचा प्रश्न झाला.मग मी पंधरा मार्कांच कॉम्प्रीहेन्शन करायला घेतलं.तेही पांच मिनीटांत संपवलं.मग उरलेल्या पांच मिनिटांत निबंधासाठी दिलेल्यापैकी एक विषय निवडून तीन परिच्छेदांचा आणि एक पानाचा निबंध लिहिला.निबंधलेखन चालू असतानाच परीक्षेची वेळ संपल्याची बेल वाजू लागली.
▪
सुपरव्हायजरने इतरांचे पेपर गोळा केले.तेवढ्यांत इंग्रजी विभागाचे प्रमुख रॉड्रीग्ज सर तिथे आले.मला म्हणाले, “चल, माझ्या रूममधे माझ्याबरोबर तुझा पेपर घेऊन ये.”मी पेपर घेऊन त्यांच्यामागै गेलो.पंधरा मिनिटे असतांना मला पेपर लिहायला परवानगी मिळाली, तेव्हां प्रिन्सिपालना मी म्हटलं होतं,”Sir, I hope that while examining my paper, it will be kept in view that I had to write paper in 15 minutes.”ते म्हणाले होते,”I can’t assure you anything.”पण बहुदा त्यानीच प्रो. रॉड्रीग्जना पाठवलं होतं.ते मला त्यांच्या रूममधे गेल्यावर म्हणाले,”You can continue writing your paper in this room.”मी म्हणालो,”Thank you sir. I have finished writing paper.”ते म्हणाले,”No. Check all your answers. Write more if you want. I am giving you time.”मग मी पेपरवरून नजर फिरवली.निबंधामधे थोडी वाढ केली.पाच सहा मिनिटेही लागली नाहीत.मग रॉड्रीग्ज मला म्हणाले,”Today, you were helped and saved because you told the truth without fear. Follow same policy throughout your life.”मी त्याना तसे आश्वासन दिले आणि आभार मानून बाहेर पडलो.त्या पंधरा मिनिटांत लिहिलेल्या पेपरात मला पन्नासपैकी २५ मार्क मिळाले.गणितांतही उत्तम मार्क मिळालेच होते.विसराळूपणामुळे ओढवलेल्या मोठ्या संकटातून मी सहीसलामत पार पडलो.विल्सनचे मित्र अजूनही भेटले की ही आठवण काढून खूप हंसतात.अनेकांनी ती आपल्या मित्रांना एक किस्सा म्हणून ऐकवली आहे.भेटलो की म्हणतात,”पहिले तुझे पाय धरू दे रे बाबा.”पण त्यांच्यातलाच एक माझ्यापेक्षाही भारी निघाला.त्यावेळच्या इंटरमिजीएट परीक्षेत त्याला पेपर कठीण गेले.रिझल्ट नीट न बघताच तो गृहीत धरून चालला की आपण नापास आहोत.ऑक्टोबरमधे परत त्याच परीक्षेला बसण्यासाठी फॉर्म भरायला युनिव्हर्सिटीत गेला.तिथे त्याला सांगण्यात आलं,”तुम्ही इंटर पास आहात आणि फॉर्म कां भरताय”
▪
विस्मरणालाही मानवाच्या आयुष्यात फार महत्त्वाचं स्थान आहे.अनेक अप्रिय गोष्टी विसरणं आवश्यक असतं.गेलेल्या माणसाच्या स्मृतीमुळे होणारा त्रास हा त्यामुळेच कमी कमी होत जातो.इतक्या गोष्टी दिवसागणिक आपल्याला पंचेंद्रीयांमार्फत ज्ञात होतात की त्या सर्व साठवणे मेंदूला अशक्य असतं.त्यामुळे तो त्यांची वर्गवारी करून प्रायॉरीटी ठरवतो.मग त्याने कमी महत्त्वाच्या गोष्टी तो काढून टाकतो.विज्ञान असं सांगत की ‘डोपामाईन’ हे मेंदूत तयार होणार एकच द्रव्य स्मरण आणि विस्मरण या दोन्हीही गोष्टी करतं.शरीराला हानीकारक, वाईट, अप्रिय आणि कमी महत्त्वाच्या (किरकोळ) गोष्टी विसरायला डोपामाईनच मदत करतं.आता एकच रासायनिक द्रव्य दोन्ही काम करतं म्हटल्यावर घोटाळे होणारच.आपल्याला दैनंदिन व्यवहाराच्या पातळीवर महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी स्वयंचलित मेंदूला तितक्या महत्त्वाच्या वाटतीलच असं नाही.माझ्या विसराळूपणाला शास्त्रीय आधार मिळाला की नाही ?विसरणारी व्यक्ती मुद्दाम थोडीच कांही विसरते ?तेव्हा माझ्यासारखेच तुम्हांपैकी कोणी विसराळू असतील, त्यानी आपण विसराळू आहोत, हे विसरून जावे.हा माझा प्रेमाचा सल्ला आहे.
— अरविंद खानोलकर.
Leave a Reply