‘पर्सनल डिजिटल असिस्टन्ट’ या मूळ तंत्रज्ञानापासून सुरू झालेल्या ‘आय. टी. ‘क्रांतीमधूनच पुढे ‘सेलफोन’ चा ‘स्मार्टफोन’ बनला.
(‘मराठी विज्ञान परिषद – पत्रिका’ या मासिकात श्री प्रभाकर देवधर यांनी लिहिलेला हा लेख)
स्मार्टफोन म्हणजे हातातला पर्सनल कॉम्प्यूटर होय. या स्मार्टफोनचे मूळ हे टेलीफोन आणि कॉम्प्यूटर तंत्रज्ञान यांच्या एकमेकांशी संलग्न होण्यात दडलेले आहे. १९७३ साली टेलीफोन आणि कॉम्प्यूटर तंत्रज्ञान एकमेकांजवळ येऊ लागले आणि १९९४ मध्ये सेलफोन बाजारात आला. त्यानंतर १९९७ मध्ये बाजारात आलेला, एरिक्सन कंपनीचा ‘पेनेलोप’ हा पहिला स्मार्टफोन असे म्हणता येईल. त्यात कॉम्प्यूटरसारखी ‘ऑपरेटिंग सिस्टिम’ (संगणकाचा गाभा असणारी प्रणाली) वापरून संभाषणाव्यतिरिक्त इतर काही सेवाही देण्याची सोय होती. सेलफोनमध्ये एल. सी. डी. स्क्रीन आला आणि शब्द उमटू लागले. नंतर ‘टच स्क्रीन’ आला.
१९९७ मध्येच नोकियाने त्यांचा अतिशय नावाजलेला स्मार्टफोन बाजारात आणला. काही जण पामटॉप कॉम्प्यूटर म्हणत. यावरील बहुउद्देशीय ऑपरेटिंग सिस्टिममुळे ( ओ. एस. ) त्यावरून इ-मेल आणि एस. एम. एस. करणे शक्य झाले होते. ब्लॅकबेरी आणि मायक्रोसॉफ्ट यांनीही स्वत:च्या ऑपरेटिंग सिस्टिम्स काढल्या. आज अनेक मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिम्स अस्तित्वात मायक्रोसॉफ्टची विंडोज फोन, आहेत; सॅमसंगची बाडा, नोकियाची सिम्बियान, आयफोनची आय. ओ. एस. वगैरे. त्यानंतर स्मार्टफोनचे पेवच फुटले. एरिक्सन, मोटोरोला, सॅमसंग, सोनी आदींचे स्मार्टफोन बाजारात आले. आताही दरसाल त्यांची नवीनवी अधिक कार्यक्षम मॉडेल्स बाजारात येत आहेत.
२००७ साली स्टीव जॉब्जच्या ‘अॅपल’ कंपनीने आपला, या धंद्याला नवी दिशा देणारा, आकर्षक ‘आयफोन’ मोठ्या थाटात बाजारात आणला आणि स्मार्टफोन क्षेत्रात एक मोठी वावटळ निर्माण केली. अतिशय कल्पकतेने निर्मिलेल्या या वेगळ्या स्वरूपाच्या आयफोनमध्ये अनेकांच्या प्रयत्नांतून विकसित झालेली विविध प्रकारची नवीन ‘अॅप्लिकेशन्स’अॅपलने सामावली; टचस्क्रीन वापरण्यात कल्पक सुधारणा आल्या, आयट्यूनद्वारा सुगम संगीत आले, डिजिटल कॅमेरा आला, कॅलेंडर, डायरी, रेडिओ, नकाशे, नोटपॅड अशा अनेक सोयी आल्या . इतरांनीही लवकरच त्यांच्या फोनमध्येही या साऱ्या सुविधा दिल्या. हे सारे घडत होते तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे.
या सर्व आय. टी. क्रांतीमागे कोणते आधुनिक तंत्रज्ञान होते?
स्मार्टफोनचे मूळ होते पर्सनल डिजिटल असिस्टंट (पी. डी. ए.) या सुरुवातीच्या अवतारात. पर्सनल डिजिटल असिस्टंट आणि सेलफोन एकत्र करून त्याचा बनला पहिला स्मार्टफोन. पाठोपाठ सेलफोनमध्ये कीबोर्डच्या सोबत आला एल. सी. डी. स्क्रीन, मग तो झाला रंगीत आणि आता टचस्क्रीन ! स्मार्टफोन हा कॉम्प्यूटरप्रमाणेच वापरता येतो, कारण त्यातील मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिमसह इतर सॉफ्टवेअर एका बाजूने अधिक शक्तिमान होत गेले आणि दुसऱ्या बाजूने हार्डवेअर हेही आकाराने लहान आणि वापरायला सुलभ होत गेले.
स्मार्टफोनमधील अतिशय उच्च तंत्रज्ञान वापरून बनवलेल्या चिप्समध्ये एका चौरस सें.मी. मध्ये सेकंदाला कोट्यवधी गणिते होत असतात. याद्वारे आवाज आणि चलत्चित्रे यांचे डिजिटल स्वरूप वापरून त्याचे योग्य प्रदर्शन स्मार्टफोनच्या एल. सी. डी. पडद्यावर केले जाते. वापरणाऱ्या व्यक्तीने कीबोर्ड व टचस्क्रीन वापरून दिलेल्या संकेतानुसार अपेक्षित माहिती, चित्र, चलत्चित्र तो पाहू शकतो, इ-मेल तयार करून पाठवू शकतो, वगैरे. या मायक्रोचिप्सची कार्यक्षमता गेल्या काही वर्षांत सतत वाढते आहे.
माहितीच्या देवाणघेवाणीच्या तंत्रज्ञानाचा सतत विकास होत असल्याने या तंत्रज्ञानातील १- जी, २-जी, ३- जी, ४- जी अशा नवनव्या पिढ्या अस्तित्वात येत आहेत. याम धील ‘जी’म्हणजे ‘जनरेशन’ किंवा पिढी ! स्मार्टफोनची प्रत्येक नवी पिढी जास्त कार्यक्षम, अधिक विश्वासू असते. प्रत्येक पिढीनुसार या प्रसारणाचे स्वरूप पुढीलप्रमाणे बदलत गेले:
१-जी: सुरुवातीचा सेलफोन हा या पहिल्या पिढीचा म्हणता येईल. (‘१-जी’ या शब्दाची जरूर भासली ती २- जी चा शोध लागल्यावर.)
२-जी: एस.एम.एस. पाठवण्याची सुविधा असलेले, आणि घड्याळ, कॅलेंडर उपलब्ध केलेले सेलफोन हे झाले दुसऱ्या पिढीचे.
३- जी: : या तिसऱ्या पिढीतील फोन हे खऱ्या अर्थाने स्मार्टफोन म्हणता येतील. या पिढीत उच्च स्तरातील बिनतारी संपर्कव्यवस्था फोनवर उपलब्ध झाली. ३- जी फोनवर इंटरनेट सेवा, इ-मेल, व्हिडिओ डाउनलोड, फोटो देवाणघेवाण या सुविधा कार्यक्षम स्वरूपात उपलब्ध आहेत. दर सेकंदाला दोन मेगाबीट वेगाने ३- जी फोन चालतो. (बीट हे माहितीच्या देवाणघेवाणीसाठी वापरले जाणारे एकक आहे. दहा लाख बीट म्हणजे एक मेगाबीट.)
४-जी: या फोनसाठी बिनतारी संपर्कव्यवस्थेचा वेग कमीतकमी दर सेकंदाला शंभर मेगाबीट तरी असावा लागतो. हाय डेफिनेशन टेलीव्हिजनवर मिळणाऱ्या दर्जाचा रंगीत चित्रपट ४-जीद्वारा आपण बघू शकतो. फोन भारतात येण्यासाठी अजून काही अवधी लागेल.
या सर्व तंत्रज्ञानाच्या विकासामागचा खर्च नक्कीच प्रचंड असतो; पण हे तंत्रज्ञान वापरून निर्मिलेल्या उत्पादनांचा खपही वारेमाप वाढत असतो. म्हणूनच दरवर्षी अनेक कोटी खपणाऱ्या स्मार्टफोनमुळे शोधकार्याचा दरडोई खर्चही परवडणारा ठरतो आहे. त्यामुळे स्मार्टफोनचे भावही झपाट्याने खाली येत आहेत. (भाव खाली आले की त्याचा परिणाम स्मार्टफोनचा खप वाढण्यात होतो.) या सगळ्या परिस्थितीमुळे सामान्य व्यक्तीला परवडतील असे सेलफोन आज उपलब्ध होऊ लागले आहेत. परिणामी, कॉम्प्यूटर, टेलीकम्युनिकेशन, मायक्रोचिप्स आणि सॉफ्टवेअर या चार मूलभूत तंत्रज्ञानांच्या संगमातून निर्माण झालेली ही नवी आय.टी. शक्ती जागतिक समाजाचे रोजचे जीवन अतिशय जलद गतीने बदलत आहे.
(‘मराठी विज्ञान परिषद-पत्रिका’ च्या सौजन्याने)
प्रभाकर देवधर
Leave a Reply