मराठी चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री व वृत्तनिवेदिका, निर्मात्या आणि दिग्दर्शक स्मिता तळवलकर यांचा जन्म ५ सप्टेंबर १९५५ रोजी झाला.
स्मिता तळवलकर या माहेरच्या स्मिता गोविलकर. स्मिता तळवलकर यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या हुजुरपागा शाळेत झाले. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र हे विषय घेऊन बी. ए. झाल्यावर स्मिता तळवलकर यांनी मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमही केले होते. त्यांनी १९७२ साली मुंबई दूरदर्शनवरून वृत्तनिवेदिका म्हणून कारकीर्द सुरू केली होती. तब्बल सतरा वर्षे त्यांनी वृत्तनिवेदिका म्हणून काम केले होते. १९८३ साली त्यांनी मराठी रंगभूमीवर पाऊल ठेवले. तेव्हापासून त्यांनी आपल्या सुरेख अभिनयाने मराठी रसिकांवर मोहिनी घातली होती. अनेक मराठी चित्रपटांतील दर्जेदार अभिनयासाठी त्या रसिकांना परिचित होत्या. त्यांनी मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवला होता. निव्वळ अभिनयातच नव्हे तर चित्रपट आणि टीव्हीच्या अनेक मराठी मालिकांच्या निर्मात्या व दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
१९८६ मध्ये त्यांनी “गडबड घोटाळा’ व “तू सौभाग्यवती हो’ या चित्रपटांद्वारे मराठी सिनेसृष्टीत पाय रोवले. त्यांनी “अस्मिता चित्र’ या निर्मिती संस्थेची स्थापना करून अनेक चित्रपट व मालिकांची निर्मिती-दिग्दर्शन केले. “कळत नकळत’ व “तू तिथे मी’ या चित्रपटांमधील अभिनयाने त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले. “अस्मिता चित्र’चा “चौकट राजा’ या चित्रपटामुळे १९९१ चे वर्ष स्मिता तळवलकर यांच्यासाठी खास ठरले. हा चित्रपट गतिमंद मुलाच्या आयुष्यावर बेतलेला होता. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर हे प्रमुख भूमिकेत होते. त्यामध्ये स्मिता तळवलकर यांनी “मीनल’ म्हणजे या मुलाच्या बालपणापासूनच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती.
संजय सूरकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाच्या यशानंतर सूरकर-तळवलकर जोडीने “तू तिथे मी’, “सातच्या आत घरात’, ‘आनंदाचे झाड’ असे यशस्वी चित्रपट दिले. “सवत माझी लाडकी’ हा स्मिता तळवलकर यांचे दिग्दर्शन असलेला पहिला चित्रपट होता. “अस्मिता चित्र’ या बॅनरखाली त्यांनी सहा चित्रपट आणि २५ दूरदर्शन मालिकांची निर्मिती केली. पेशवाई, अवंतिका, सुवासिनी, उंच माझा झोका, अशा त्यांच्या काही गाजलेल्या मालिका आहेत.
स्मिता तळवलकर यांनी चित्रपट शिक्षणासाठी “अस्मिता चित्र अकादमी’ स्थापन केली होती. या अकादमीच्या पुणे, मुंबई आणि ठाणे येथे शाखा असून या अकादमीतून अनेक कलावंत घडले आहेत. ‘स्मिताची गोष्ट ‘हे पुस्तक त्यांचे अनेक वर्षांचे मित्र योगेश्वर गंधे यांनी लिहिले आहे. पहिल्या २६ पानात चरित्र /आठवणी आहेत तर पुढील ४५ पानांत त्यांच्या कथा आणि लेख आहेत. स्मिता तळवलकर यांचे निधन ६ ऑगस्ट २०१४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
स्मिता तळवलकर यांचे चित्रपट : तू सौभाग्यवती हो, गडबड घोटाळा (१९८६), कळत नकळत (१९८९), चौकट राजा (१९९१), सवत माझी लाडकी (१९९३), शिवरायाची सून ताराराणी (भूमिका : येसूबाई) (१९९३), तू तिथे मी (१९९८), सातच्या आत घरात (२००४), आनंदाचे झाड (२००६), चेकमेट (२००८), टोपी घाला रे (२०१०), अडगुळं मडगुळं (२०११), एक होती वाडी (२०११), जन्म (२०११), श्यामचे वडील (२०१२), या गोल गोल डब्यातला (२०१२), प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं (२०१३)
मालिका : घरकुल, पेशवाई, अवंतिका, ऊनपाऊस, कथा एक आनंदीची, अर्धांगिनी, सुवासिनी, उंच माझा झोका.
नाटके : कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या (भूमिका : जनाबाई), दुर्गाबाई जरा जपून.
पुरस्कार : कळत नकळत (राष्ट्रीय पुरस्कार), तू तिथे मी (राष्ट्रीय पुरस्कार व महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा गदिमा पुरस्कार), सवत माझी लाडकी (महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार), महाराष्ट्र शासनाचा व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार (2010).
Leave a Reply