अनेकदा विद्युत उपकरणे किंवा सिगरेट यामुळे घरात आग लागून प्राणहानी व वित्तहानी होण्याचा धोका असतो. जिथे धूर आहे तिथे आग आहे असे म्हटले जाते, त्यामुळे धूर शोधणे ही आग रोखण्यातील एक महत्त्वाची पायरी मानली जाते. अमेरिकेतील मूळ रहिवासी हे धुराच्या मदतीने संदेश पाठवित असत, पण आता आपल्याला धुरातून धोक्याचा संदेश मिळू शकतो. धूम्रशोधकाचा शोध १८९० मध्ये एडिसनचा सहकारी फ्रान्सिस थॉमस अपटन यांनी लावला. त्यानंतर घरात बसवता येतील अशी यंत्रे ड्युअन पीअरसॉल व स्टॅन्ले पीटरसन यांनी तयार केली. धूम्रशोधक यंत्र म्हणजे स्मोक डिटेक्टर हे तसे साधे व कमी खर्चाचे यंत्र असते.
ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीवर आधारित असते. इलेक्ट्रॉनिक डोळा व इलेक्ट्रॉनिक नोज या दोन प्रकारात ते उपलब्ध असते. इलेक्ट्रॉनिक डोळा प्रकारात तो ऑप्टिकल स्मोक डिटेक्टर असतो. हा डिटेक्टर घराच्या सिलिंगला बसवलेला असतो. जेव्हा काही जळायला लागते तेव्हा धूर होतो व तो प्रथम सिलिंगच्या दिशेने जात असतो, कारण तो हलका असतो. या डिटेक्टरमध्ये इन्फ्रारेड लाईटचा किरण सोडणारे एक चेंबर असते, फोटोसेल असतो, त्याच्यावर प्रकाश पडताच तो वीजनिर्मिती करतो. जेव्हा धूर नसतो तेव्हा प्रकाश किरण हा एलईडी व डिटेक्टर यांच्यात फिरत राहतो त्यावेळी सगळे आलबेल असते. पण आग लागली, धूर झाला तर तो चेंबरमध्ये जातो व प्रकाश किरणाला अडवतो. त्यामुळे फोटोसेलवर प्रकाश पडत नाही, त्यामुळे विद्युतपुरवठा खंडित होऊन बेल वाजते. त्यामुळे रात्री गाढ झोपेत असतानाही आग लागली तरी तुम्ही जागे होता व पुढचा अनर्थ टळतो. ‘आयनायझेशन स्मोक डिटेक्टर’ हा आणखी एक प्रकार यात असतो. तो ऑप्टिकल स्मोक डिटेक्टर इतका महाग नसतो. त्याला ‘इलेक्ट्रॉनिक नोज'” असेही म्हणतात. या यंत्राने धुरामुळे कुठले रेणू आत येत आहेत ओळखले जाते, त्यामुळे त्यांना आयनायझेशन स्मोक डिटेक्टर असे म्हणतात. डिटेक्टरमध्ये अमेरिकियम नावाचे रसायन असते. त्यातून किरणोत्सारी कण (अल्फा पार्टिकल्स) बाहेर पडत असतात. ते एका छोट्या चेंबरमध्ये जमा होतात, त्यांचा हवेच्या रेणूंशी संपर्क येताच त्यांचे आयनात (विद्युतभारित अणू) रूपांतर होते.
हे आयन दोन इलेक्ट्रोडमध्ये फिरतात, त्यामुळे वीजप्रवाह चालू होतो व डिटेक्टरमधील सर्किटला ऑल इज वेलचा संदेश मिळतो. पण जर आग लागली तर धूर डिटेक्टरमध्ये येतो व चेंबरमध्ये अडथळा निर्माण होतो. धूर आयनांना चिकटतो व वीजप्रवाह खंडित होतो. हा बदल लक्षात येताच धोक्याचा भोंगा वाजू लागतो.
Leave a Reply